वीणावादिनी | कोरवलीच्या सुरसुंदरी

वीणावादिनी

वीणावादिनी –

कोरवलीच्या सुरसुंदरी लेख क्र.१६ –

मर्दला या समूहामध्ये समाविष्ट होणारी आणि अतिशय कमनीय बांध्याची एक मनोहारी सुरसुंदरी कोरवलीच्या मंदिराच्या बाह्य भिंतीवर वर्षानुवर्षे कोणा अनामिक कलाकारांची निर्मिती म्हणून उभी आहे. तिच्या हातात असलेल्या वीणा किंवा तंतुवाद्य यावरून तिला वीणावादिनी असे म्हणतात.

वीणा हे  कलाकारांचे आवडते वाद्य असावे, त्यामुळे वेगवेगळ्या आकारातील वीणा घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने उभ्या राहिलेल्या अशाच पद्धतीच्या सुरसुंदरी मार्कंडा, धर्मापुरी, निलंगा आणि होट्टल येथील प्राचीन मंदिरावर आढळतात. त्यांच्या हातातील वीणा भोपळ्याच्या आकारासारखी असून नाजूक, लांब नळीसारखी भासते. भोपळ्याच्या आणि तारांच्या साहाय्याने तयार केलेल्या वाद्यापैकी वीणा हे एक वाद्य असते. अशीच एक वीणा हातात घेऊन सडपातळ बांध्याची सुरसुंदरी येथे अंकित केलेली आहे.ती त्रिभंगा अवस्थेत उभी आहे.

गोलाकार  परंतु किंचितसा उभट वाटणारा तिचा चेहरा भल्यामोठ्या कर्णाभूषणामूळे रेखीव वाटतो. मस्तकावरील आपल्या घनदाट आणि काळ्याभोर कुंतलांना अगदीच व्यवस्थित बसवले आहे .मात्र मानेवरील तिचा भलामोठा अंबाडा भग्न झालेला आहे. रुंद आणि भरदार खांदे तसेच  सुबक असणारे तिचे दोन्ही कर आणि त्यामधून सहजतेने धरून ठेवलेली विना तिचा वादन आणि नृत्य या कलांमधील आत्मविश्वास स्पष्ट करणारी आहे. तिच्या सौंदर्यास उठाव देणारी तिची प्रमाणबद्ध शरीरयष्टी ही महत्त्वपूर्ण आहे. वीणा तिच्या डाव्या खांद्यावरून थेट उजव्या भागा पर्यंत खाली येते. इतर सुरसुंदरी प्रमाणे हिनेदेखील उठावदार आणि ठसठसीत असे अलंकार परिधान केलेले आहेत. त्यामध्ये भलीमोठी कर्णफुले गळ्यातील माळा तसेच नाजूक पावलांमध्ये पादवलय व पादजालक यांचा समावेश आहे.

तिने परिधान केलेल्या वस्त्रांच्या विविध तर्‍हा येथे स्पष्ट लक्षात येतात.कटिसूत्र,उरूद्दाम,मुक्तदाम  यांच्या जोडीला असलेला पण हेलकावणारा  वस्त्राचा सोगा तिच्या मूळच्या सौंदर्यात उठाव देणारा आहे.वाद्य वाजवणाऱ्या अनेक सुरसुंदरी विविध मंदिरावर आढळतात. परंतु कोरवलीच्या या वीणावादिनीची प्रसन्न चित्त देखणी मूर्ती पाहणाऱ्यांची नजर खिळवून ठेवते.कलाकारांने मर्दलेच्या  सौंदर्याबरोबरच मंदिराचेहि बाह्यसौंदर्य वाढविले आहे.या वीणावादिनीने आपल्या दोन्हि करकमलामध्ये पकडलेली वीणा जास्त नाजूक आहे की,त्यावर तरलपणे फिरणारी तिची बोटे नाजूक आहेत का ती स्वतः नाजूक आहे ?असा संभ्रम पडणारे हे शिल्प आहे.

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here