बोधिसत्व सिंहनाद अवलोकितेश्वर

By Discover Maharashtra Views: 1232 2 Min Read

बोधिसत्व सिंहनाद अवलोकितेश्वर –

भारतीय बौद्ध मूर्तिकलेचा उदय आणि विकास यांचा इतिहास प्रगल्भ आहे. भारतीय बौद्ध मूर्तीकलेने इथल्या कला आणि तत्वज्ञानाला वेगळाच बहर आणला. हीनयान, महायान, वज्रयान या सारखे अनेक पंथ निर्माण झाले. या पंथांच्या वादातूनच बौद्ध मूर्ती कलेची सुरुवात झाली. गांधार शैली, मथुरा शैली, अमरावती शैली अशा विविध शैली निर्माण झाल्या. या प्रत्येक शैलीने बौद्ध मूर्ती कलेत विशेष योगदान दिले आहे. हे विसरून चालणार नाही. प्रस्तुत मूर्तीही बोधिसत्व सिंहनाद अवलोकितेश्वर यांची आहे. सध्या ही दिल्ली येथील राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय आहे.

बौद्ध धम्मातील महायान पंथात बोधिसत्वाला विशेष महत्त्व आहे. अवलोकितेश्वर महायान पंथीयांची आवडती लोकप्रिय देवता मानली जाते. दिल्ली येथील वस्तुसंग्रहालयातील ही मूर्ती द्विभूज असून ती सुखासनात सिंहावर  विराजमान आहे. डोक्यावर जटा मुकुट, गळ्यात यज्ञोपवीत सदृश्य मोत्याच्या माळा ,,कटीसूत्र इत्यादी अलंकार परिधान केलेले आहेत. जटा मुकुटाचा मधोमध ध्यानस्थ बुद्धांची छोटी प्रतिमा अंकित केलेली आहे. कानांची लांबी जास्त असल्याने ते खांद्यापर्यंत टेकलेले आहेत. उजव्या खांद्यावरील वस्त्राची किनार स्पष्ट दिसते. डावा खांदा उघडाच आहे. उजवा हात  उभा केलेल्या पायाच्या गुडघ्यावर स्थिरावलेला असून, तो कोपऱ्यापासून दुभंगलेला आहे.

डावा हात जमिनीवर टेकविला असून शरीराचा संपूर्ण भार त्या हातावर तोलून धरलेला आहे. डाव्या बाजूस पूर्ण विकसित कमलपुष्प असून उजव्या बाजूचे आयुध भंगले असल्याने ते स्पष्ट दिसत नाही. मूर्तीच्या मुकुटाच्या दोन्ही बाजूस ध्यानस्थ भूमी स्पर्श मुद्रेतील बुद्धप्रतिमा अंकित केलेल्या आहेत. मूर्तीचा चेहरा भंगला असला तरी चेहऱ्यावरील दिव्यता  व तेज जराही ढळलेले नाही. पादपीठा खालील सिंहाने जबडा वासलेला आहे. तो डरकाळी (नाद)फोडत आहे .सिंहाच्या पाठीवर कमलपुष्पाकृती असून त्यावर बोधिसत्व सिंहनाद अवलोकितेश्वर विराजमान आहेत. एकंदरीत मूर्तीची निर्मिती संकल्पना पाहता कलाकारांनी आपल्या मनातील भाव या मूर्तीत प्रत्यक्षात उतरवल्याने ही मूर्ती आजही पाहणाऱ्यांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी ठरते.

डॉ. धम्मपाल माशाळकर.
मूर्ती अभ्यासक, मोडीलिपी व धम्म लिपी तज्ञ सोलापूर.

Leave a comment