तुळजापूर निवासिनी तुळजाभवानी

2 Min Read

तुळजापूर निवासिनी तुळजाभवानी –

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून देवीची ख्याती आहे. तुळजापूर हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. याच तुळजापूर गावात तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या गर्भगृहात तुळजाभवानी देवीची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. संपूर्ण महाराष्ट्रात चल प्रकारातील ही एकमेव मूर्ती आहे. या ठिकाणी उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीला पालखीत बसवून मंदिराभोवती फिरवले जाते. वर्षातून एकूण तीन वेळा मुर्ती सिंहासनावरून हलवली जाते.

गाभार्‍यात सिंहासनावर विराजमान असणारी ही तुळजाभवानी देवी अष्टभुजा आहे. मूर्ती कळ्या गंडकी पाषाणात आहे. अष्टभुजा देवीच्या उजव्या खालच्या हातात त्रिशूल असून तो त्रिशूल महिषासुराच्या छातीत खुपसला आहे. उजव्या वरच्या हातात अनुक्रमे बिचवा,अंकुश, चक्र डाव्या वरच्या हातात गदि,चाप, धनुष्य पाश हि आयुध असुन डाव्या खालच्या हाताने देवीने राक्षसाची शेंडी पकडलेली आहे. डोक्यावर करंडक मुकुट असून मधोमध शिवलिंग आहे.कपाळवर त्रिपुंड असून, कानात चक्राकार कुंडले, गळ्यात ग्रीवाहार,स्तनहार, कंदमाला, केयूर, हातात बांगड्या, कटीसूत्र उरुद्वाम, मुक्तद्वाम, पादवलय व पादजालक इत्यादी अलंकार देवीने परिधान केलेले आहेत. देवीचा डावा पाय खाली असून उजवा पाय महिषावर ठेवलेला आहे.

महाषातुन बाहेर आलेला महिषासुर वध करण्यासाठी देवीने त्याच्या केसाची शेंडी पकडलेली आहे. मूर्तीच्या वरील बाजूस सूर्य-चंद्र असून देवीने बाणाचा भाता आपल्या उजव्या खांद्यावर लटकवलेला आहे. त्यातील बाणही स्पष्ट दिसतात. देवीने परिधान केलेले वस्त्र व त्यावरील नक्षी अतिशय सुबक आहे. मूर्तीच्या उजव्या पायाजवळ खालच्या बाजूस मार्कंडेय ऋषीची प्रतिमा असून डावीकडे सती अनुभूतीचे उलटे शिल्प केलेले आहे. तिचे हात जोडलेले उलटे शिल्प का? याची देखील एक वेगळी कथा आहे. उजवीकडे वरच्या बाजूस देवीचे वाहन सिंह अंकित केलेले आहे. सती अनुभूतीच्या हाकेला धावून आलेली देवी तुळजाभवानी देवी होय. एकंदरीत मूर्तीची रचना पाहता ही मूर्ती महिषासुर वधाच्या प्रसंगाची आहे. ही महिषासुर मर्दिनी तुळजाभवानी आहे. तिलाच रामवरदायिनी असे देखील म्हणतात.

संदर्भ –
श्री.तुळजाभवानी— रा.चिं.ढेरे.
महाराष्ट्राची चार दैवते—ग.ह.खरे.

डाॅ.धम्मपाल माशाळकर

Leave a comment