महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 8,380,966

वाघ दरवाजाची थरारक ऐतिहासिक प्रसंग कथा

By Discover Maharashtra Views: 4093 5 Min Read

स्वराज्यरक्षक वाघ दरवाजा

रायगडी गेल्यावर आता पाऊले आपसुकच वाघ दरवाजाकडे वळतात. त्याच्या निर्भिड कड्यांकडे पाहुन मन स्वत:हुन इतिहासात रमते आणि मग सर्व प्रसंग अगदी जसाच्या तसा मनात उभा राहतो. हाच तो वाघ दरवाजा आणि त्याच्या कड्यांत लपलेला इतिहास तर जाणताच. ती ऐतिहासिक कथा अशी-

औरंगजेबाने तुळापूरास छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना हाल-हाल करून त्यांचे शिरच्छेद करून तुकडे-तुकडे केले, त्याला बरेच दिवस उलटले. किल्ले रायगड अजूनही संभाजीराजांचे सुतक पाळुन होता. त्यानंतर अशीच एक वाईट सकाळ किल्ले रायगडावर उजाडली. त्या दिवसाच्या पहिल्या प्रहरी नगारखान्याच्या समोरील परिसरात अद्याप कोणीही सरकारी अधिकारी जमले नव्हते. गडावर शांतता होती. नेहमी मुक्तपणे संचार करणारे पक्षी आज रायगडावर फिरकले देखील नव्हते.

सुर्य ढगांमधुन डोके बाहेर काढत होता. हिरमुसलेल्या रायगडाला उजळवण्याचा प्रयत्न तो करीत होता. हळुहळु सदरेवर लोक जमु लागली. सरकारी अधिकारी येऊ लागले होते. राजघराण्यातुन अजुनही कोणी व्यक्ती आल्या नव्हत्या. जमलेली मंडळी आपापसात कुजबुजत होती. इतक्यातच एक अनामिक शांतता नगारखान्यात पसरली. राणीवसातुन महाराणी येसुबाई पांढराशुभ्र पेहराव करुन डोक्यावर पदर घेऊन सदरेवर आल्या. कधी एकेकाळी याच येसुबाईंनी संभाजीराजांसोबत विवाहबद्ध झाल्यावर हिरवा शालु, कपाळी सौभाग्याच कुंकु आणि अंगावर सुवर्णालंकार परिधान करून पहिल्यांदाच राजगडाचा महादरवाजा ओलांडला होता. नवीन सुनेला छत्रपतींनी आशीर्वाद दिला होता अखंड सौभाग्यवती भव. आज सफेद वस्त्रातील येसुबाईंना पाहुन तिथे जमलेल्या मंडळींना अश्रु अनावर झाले.

महाराणी येसूबाई साहेब याआधी जेव्हा कधी सदरेवर येत त्यावेळी वज्रचुडेमंडीत…. असा जयघोश येत असे पण आज त्यांच्या येण्याणे नगरखाना देखील स्तब्ध होता. महाराणी सदरेवर आल्या त्यांनी आपल्या एका हातामध्ये पुत्र युवराज शिवाजी आणि दुसऱ्या हातामध्ये राजारामराजांचा हात घेऊन चालल्या होत्या. राजाराम राजांसोबत यांच्या पत्नी देखील होत्या. सर्व मंडळी प्रथम होळीच्या माळावर जमली. सरदारांना तिथेच थांबण्यास सांगुन इतर सर्व राजघरातील लोकांनी प्रथम शिर्काई देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर श्री जगदीश्वर मंदिरात शिवाचे दर्शन घेण्यास निघाले. सर्वांच्या मनी दु:ख दाटुन आले होते. मन कष्टी झाले होते. जगदीश्वराचे शेवटचे दर्शन घेऊन परत येताना महारानी येसुबाईंनी भवानी कड्याला आणि टकमक कड्यांना एक जबाबदारी सोपावत म्हणाल्या आज मी कदाचित शत्रुच्या हाती लागेल पण छत्रपतींचा हा रायगड शत्रुच्या हाती लागता कामा नये. शत्रुंचा वार झेलण्यास तुम्ही खंबीर राहा. असे सांगुन येसुबाई पुन्हा होळीच्या माळावर जाण्यास निघाल्या.

राजाराम राजे त्यांच्या पत्नी आणि महाराणी येसुबाई होळीच्या माळावर आल्या. जमलेले सर्व कुशावर्त तलाव मार्ग उतरून खाली रायगडाच्या कुशीत दडलेल्या वाघ दरवाज्याकडे जाण्यास निघाले. त्यावेळी एकमेव शिवराज्ञी सकवारबाईसाहेब गडावर होत्या. सर्वमंडळींनी त्यांच्या पायावर प्रथम मस्तक ठेवले आणि त्यानंतर युवराज्ञी येसुबाईंचे आशीर्वाद घेऊन सर्व मंडळी खाली उतरु लागले. गड उतार होताना सर्वांच्या मनात एक प्रकारचे दु:ख होते. यशस्वी व्हा आणि गेलेले राज्य मिळवा असा आशीर्वाद येसुबाईंनी राजाराम राजांना दिला. राजारामराजांनी येसुबाईंना गळाभेट दिली ही भेट शेवटची ठरली. अश्रु अनावर होत होते परंतु पायथ्याला शत्रु छावणी मांडुन बसला आहे त्याच्या मुठीतुन वाचण्यासाठी गड उतार होणे भाग आहे. किल्ल्याच्या पायथ्याला झुल्फिकारखान छावणी मांडुन बसला होता. पाचाड कोटामध्ये त्याने मुक्काम केला होता. चित्त दरवाजाला मुघल सैन्य वेढा घालणार होते. रायगड काबिज करण्याचा बेतच त्याने मांडला. गडावर वाघ दरवाज्यातुन बाहेर पडण्यास राजघराण्यातील मंडळी निघाली असताना झुल्फिकारखान आणि त्याचे सैन्य अजुनही मद्यधुंद अवस्थेत पाचाडात पडुन होते. त्याच्या सैन्याला गडावरील हालचालीची काहीच कल्पना नव्हती.

राजाराम राजे, त्यांच्या पत्नी आणि इतर सरदार वाघ दरवाजाजवळ पोहोचले होते. एक मोठी टोपली आणली गेली तिला जाड दोरीच्या सहाय्याने घट्ट बांधले. ती टोपली कड्यावरुन पाळण्यासारखी सोडण्यात आली. सर्व प्रथम सरदार त्यातुन खाली उतरले आणि मग राजाराम राजे त्यांच्या कुटुंबकबिल्यासह वाघ दरवाजावरुन उतरवण्यात आले. किती त्या वेदना मनात राहील्या असतील रायगड सोडताना. परंतु सुरक्षेच्या हेतुने गड सोडणे हाच एकमेव पर्याय दिसत होता. राजघराण्यातील मंडळी सोबत सरदारही वाघदरवाज्याच्या कड्यांवरुन खाली उतरले. वाघ दरवाजा उतरण्यास खरोखर वाघाच काळीज लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुरदृष्टी दाखवत किल्ले रायगड बांधणीवेळी आपत्कालीन वाघ दरवाज्याची निर्मिती केली. त्याच दरवाज्यामुळे आज स्वराज्य अबाधित राहीले.

आजही जर का वाघ दरवाजापाशी एकांतात बसलो कि दरवाजा स्वत:हुन हा थरारक प्रसंग सांगतो. आम्ही दरवाजाचे सदैव ऋणी आहोत. कारण आज जे काही स्वराज्य रक्षिले ते वाघ दरवाजामुळेच.

माहिती साभार – मयुर खोपेकर

Leave a comment