माहुलीचा रणसंग्राम

माहुलीचा रणसंग्राम…

माहुलीचा रणसंग्राम …

माहुलीचा रणसंग्राम – शहाजीराजे हे निजामशाहीच्या सेवेत रुजू होते. निजामशाहाच्या मृत्युपश्चात त्याची सात आठ वर्षाची दोन मुले होती. निजामशाही दरबारात साबाजी अनंत हे ब्राम्हण मुत्सद्दी तसेच थोर अकलवंत कार्यरत होते. पातशाहच्या बायकाेने साबाजीस विचारले “आता पातशाहीस एखादा वजीर दिवाण पाहिजे, चोख बंदोबस्त करणारा असा अकलवंत मोहरा पाहिजे”. त्यानंतर साबाजी यांनी शहाजी राजांस पातशाहीच्या बायकाेकडे घेऊन गेले. मुळात शहाजीराजे हे देखणे, अकलवंत आणि तसेच शूर शिपाई असल्याकारणाने साबाजी यांनी शहाजीराजे यांचे नाव सुचवले आणि म्हणाले “हा दिवाण वजीरीलायक आहे” असा अर्ज साबाजी यांनी केला त्यावरून निजामशाहच्या बायकाेने देखील यास मंजुरी दिली. निजामशाहीच्या अस्तानंतर राज्य चालवण्यासाठी शहाजीराजांनी त्यांच्या दोन्ही मुलांना स्वत: मांडीवर घेतले आणि गादीवर बसुन राज्य कारभार पाहू लागले. गादीखाली जाधवराव वगैरे मनसबदार लोक मुजऱ्यास घेतले. कित्येक दिवस अशा प्रकारे कारभार केला. लखुजीराव जाधव याना त्यावेळी खूप दुःख झाले होते कारण, त्यांच्याकडे भोसले यांची सोयरीक जुळली होती आणि तेच भोसले पातशाहीची मुले घेऊन कारभार पाहतात आणि आम्हास मुजरा करावा लागतो हे त्यास योग्य नाही वाटले. त्यावेळी जाधवरावांनी मनसुबा करून दिल्लीस शाहजाद्याकडे वकील अर्जी पाठवून साठ हजार फौज उत्तरेकडून मागवली आणि ते दौलताबादेस चालून आले.(माहुलीचा रणसंग्राम)

जेव्हा हि खबर शहाजीराजे यांस कळाली तेव्हा त्यांनी मुलगा आणि बायकोसमवेत (म्हणजेच पुत्र संभाजी आणि जिजाऊसाहेबां सोबत) कल्याण भिवंडी जवळ असलेल्या किल्ले माहुली येथे आले. कोकणातील थोर किल्ला पाहून सोबत काही फौज घेऊन ते येथे आश्रयास आले. मागून जाधवराव व उत्तरेकडून आलेली फौज माहुलीस सहा महिने लढाई – वेढा घालून बसली होती. शहाजीराजांनी लढा चालू असतानाच विजापूरच्या पातशाहास अर्ज लिहून वकील पाठवला आणि त्यात म्हंटले कि “पातशाहची मोहीम झाली. आमचे सासरे फौज घेऊन आमच्यावर चालून आले. आम्ही माहुली किल्ला बळकावून बसलो आहे. जर का पातशाह आम्हाला कौल पाठवतील आणि दौलत अधिक देतील तर आम्ही फौजेसह पातशाहीच्या चाकरीत येऊ”.  त्यावरून पातशाह विजापूरचे मुरारजगदेव दिवाण पातशाही त्यांनी कौल आणि इमान पाठवले. त्यानुसार शहाजीराजे यांनी आपल्या पाच हजार फौजेनिशी जाधवरावांचा वेढा मारून रातोरात माहुली वरून पलायन केले. सोबत पुत्र संभाजी आणि जिजाऊसाहेब होत्याच. त्यावेळी जिजाऊसाहेब सात महिन्याच्या गरोदर होत्या. त्यामुळे पलायन, आपल्या वडिलांचा होणार पाठलाग हि सर्व दगदग त्यांना सहन होत नव्हती. शहाजीराजांनी हे जाणिले आणि त्यांनी आपल्या फौजेतील शंभर स्वार जिजाऊंसोबत ठेऊन ते पुढारी निघून गेले. मागून जाधवराव आपल्या फौजेनिशी येत होते त्यांनी वाटेत जिजाऊसाहेबांना पाहिले. जाधवराव यांनी पाचशे स्वार पाठवून जिजाऊसाहेबांना त्वरित शिवनेरी किल्ल्यावर घेऊन गेले. त्यावेळी जिजाऊसाहेब यांनी शिवनेरीवर असलेल्या शिवाई देवीस नवस आपणास जर पुत्र जाहला तर त्यास तुझे नाव देऊ… (९१ कलमी बखर) [एकंदरीत वरील घटना पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते, जर का माहुलीचा वेढा काही काळ अजून चालू राहिला असता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा किल्ले माहुली येथे झाला असता.]

२८ सप्टेंबर रोजी उदगीर आणि १९ऑक्टोबर रोजी औसा हे किल्ले मोगलांनी काबीज केले. त्याचप्रमाणे शहाजी भोसले याचा खूप पाठलाग केल्या नंतर मोगल सेनापती खानजमान आणि त्याच याच विजापुरी मददगार रणदुल्लाखान यांनी पराभव केल्यावर  तो ऑक्टोबरच्या अखेरीस माहुली येथे शरण आला. अशा तऱ्हेने मोगलांचा दक्षिण दिग्विजय पूर्ण झाला. (औरंगजेबाचा इतिहास)

शिवाजी महाराजांनी पश्चिम घाट ओलांडून कोकणात धडक मारली.  या किनारपट्टीचा उत्तर भाग कल्याण जिल्ह्याने व्यापला होता. या जिल्ह्याची सुभेदारी मुल्ला अहमद कडे होती. अहमद विजापूरच्या मुख्य उमरावांपैकी एक होता. २४ ऑक्टोबर १६५७ रोजी शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी ही संपन्न शहरे सहजगत्या हस्तगत केली. त्यावेळी या शहरांना तटबंदी नव्हत्या.  या शहरांत महाराजांना खूप संपत्ती आणि किमती सामान मिळाले.  एके काळी शहाजीराजांनी शेवटी ज्या किल्ल्याचा आश्रय घेतला तो  माहुली किल्ला महाराजांनी ८ जानेवारी १६५८ रोजी काबीज केला.  नंतर आपल्या  या ठिकाणी महाराजांनी आरमारी तळांची ताबडतोब उभारणी केली. (औरंगजेबाचा इतिहास)

जयसिंग सोबत झालेल्या पुरंदरच्या तहात महाराजांनी २३ किल्ले देण्याचे ठरवले त्यात माहुली किल्ला होता सोबत जोडकिल्ले भंडारगड आणि पळसगड मुघलांना देण्याचे ठरले. (प. सा. सं.- १०६४ – १३ जून १६६५)

शिवाजी वर देशात गेला आहे. माहुलीला त्याच्या सैन्याची पिछेहाट झाली आहे. त्यात सुमारे १००० लोक पडले. (प. सा. सं. १२९२ – २१ मार्च १६७०). सैन्य पडून सुद्धा तो बिलकुल नाउमेद झाला नाही. त्याने किल्ल्याचा वेढा मोठ्या नेटाने चालवला. किल्ल्यातील लोकही इरेस चढून किल्ला मोठ्या शौर्याने लढवीत राहिले पेशव्याने थोडासा दम खाऊन पुन्हा किल्ल्यावर छापा घातला पण ह्यावेळी किल्ल्यातील लोकांनी त्यास मागे हटवले याप्रमाणे दोन वेळा मागे हटवून लावले तरी पेशव्याचे लोक हताश झाले नाहीत. किल्ल्यावरील लोकांना जुन्नर वरून मदत मिळेल याची अपेक्षा होती म्हणून त्यांनी शेवट्पर्यंत हिम्मत सोडली नाही. हि झटापट दोन महिने चालली. दोन्हीबाजूने इर्षेने लढा चालू होता. शेवटी शत्रूच्या लोकांनी हताश होऊन किल्ला पेशव्यांचा हाती दिला. (शिवछत्रपतींचे चरित्र – कृष्णराव अर्जुन केळुस्कर)

शिवाजी मोंगली सैन्याप्रमाणे आळशी राहत नाही. सूर्यप्रकाश असतानाच तो गावत वाळवतो असे नाही (एक इंग्रजी म्हण) पावसात देखील शिवाजी थांबत नाही कारण मोंगली फौजा पावसाळ्यात टेकडीच्या आश्रयाला गेल्या असताना देखील शिवाजीच्या हालचाली  चालू आहेत. त्याने नुकताच कुर्डूगड घेऊन माहुली वर पुन्हा हल्ला चढवला आहे. तिथे किल्ल्याच्या तटावरून दगडांच्या माऱ्याखाली त्याचे दोनशे लोक सापडले. तो फिरून पुन्हा माहुली वर हल्ला चढवील आणि नंतर सैन्याला विश्रांती देईल. भिवंडी आणि माहुलीच्या पायथ्याला दुसरा हल्ला करण्यासाठी मिळून त्याने पाच हजार सैन्य जय्यत ठेवले आहे. (प. सा. सं. १३१३ – ११ जून १६७०)

२५ जून १६७० ला आलेली बातमी – शिवाजीने मोंगलांच्या हातून माहुली किल्ला घेतला.  (प. सा. सं. १३१४ – २८ जून १६७०)

जून १६८६ मध्ये बादशाह विजापूरच्या वेढ्यात गुंतल्यावर अकबराने मोगल देशात मुसंडी मारली. परंतु त्याचा हा प्रयत्न फसला  कारण बादशहाने अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेवलेल्या मरहमतखानाने त्याचा चाकण येथे पराभव केला. अकबराने यानंतर मराठ्यांच्या प्रदेशाचा पुन्हा आश्रय घेतला.  शिरवळ येथील ठाणेदाराने बादशहाला कळविले की संभाजी हा अकबराला मोठे सैन्य देऊन उत्तरेकडे धाडण्याच्या तयारीत आहे. यावर बादशहाने राजपुत्र आजम याला बंडखोराचा मार्ग अडवण्यासाठी आणि त्याला पकडण्यासाठी  ३० हजार घोडेस्वार देऊन अहमदनगरकडे पाठवले. आजम कंदपूर येथे पोहोचताच अकबराने मोठ्या कष्टाने साल्हेरकडे पळ काढला. आजम पाठलाग करीत अहिवंत गडाकडे आला तेव्हा पुन्हा अकबराने माहुलीकडे पळ काढला. (औरंगजेबाचा इतिहास)

१७ एप्रिल  १६८९ रोजी मातबरखान माहुलीपासून ९ मैलांवर खर्डी येथे पोहोचला. खर्डी आणि माहुली यांच्यामधील एक घाट मराठ्यांनी रोखून धरला होता परंतु मातबरखानाने त्यांना माघार घ्यावयास लावली.  माहुलीसारख्या किल्ल्याला वेढा देण्यासाठी लागणारे सैन्य त्याच्याजवळ नव्हते.  माहुली सारख्या किल्ल्याला ५ ते ६ हजार सैन्यआणि भरपूर द्रव्य लागणार होते म्हणून त्याने लाच देऊन किल्ला जिंकण्याचे ठरवले. त्यावेळी किल्ल्याचा हवालदार द्वारकोजी होता. मातबरखान याने किल्लेदाराशी बोलणी सुरु केली आणि त्याला मोगल सैन्यामध्ये मोठी मनसब देण्याचे आश्वासन दिले. औरंगजेबाकडून हमीचे पात्र आल्यावर जुलै १६८९ मध्ये त्याने माहुली घेतला.माहुलीचा रणसंग्राम.  माहुलीच्या पाडावाबरोबर सर्व उत्तर कोकण आणि ऑक्टोबर १६८९ मध्ये रायगडचा पाडाव झाल्यानंतर दक्षिण कोकण मुघलांच्या अधिपत्याखाली आला. (औरंगजेबाचा इतिहास)

इ.स. १८१७ मध्ये पुण्यात इंग्लिश व पेशवे यांच्यामध्ये जो तह झाला  तेव्हा माहुली आणि त्याचे जोडकिल्ले हे इंग्रजांच्या हाती गेले. (महाराष्ट्रातील किल्ले. चिं. गं. गोगटे)

संकलन माहिती साभार – मयुर खोपेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here