महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

देसुरचा किल्ला | मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष

By Discover Maharashtra Views: 3623 8 Min Read

देसुरचा किल्ला | मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष

जिंजीपासून ईशान्येस २१ किलोमिटरवर (१३मैल) हा किल्ला आहे. आजच्या घडीला देसुरचा किल्ला गावतल्या लोकांच्याही विस्मृतीत गेला आहे, ईथवर जर पोहोचायचे असेल तर पच्चई अम्मन कोवील या मंदीराची चौकशी करत जावे लागते. या मंदीराच्या पाठीमागे पडीक रानात देसुरचा किल्ला काही अवशेष ट्कवून जिवंत आहे. संपुर्ण किल्ला जरी काट्याकुट्यांनी माखला असेल तरी बारकाईने पाहिल्यास आजही किल्ल्याच्या अर्धवट भिंती नजरेस पडतात. एक बुरूज, एक पाण्याची विहीर व एक सभामंडप अाजही सुस्थीतीत आहेत. याखेरीज किल्ल्यात पाच अतिशय सुंदर पाच फुटी विरगळी आढळतात.

देसुर हे नाव मुळ तेज सिंग या नावातून उद्भवले आहे. तेजसिंगाचा दक्षिणी तमिळ भाषेत देजसिंग असा अपभ्रंश होतो व पुढे ह्या देजसिंगचा देसिंग असा अपभ्रंश झाला. देसुर म्हणजे देसिंग उर (देसिंगाचे गाव). हा तेज सिंग म्हणजे स्वरूपसिंगाचा मुलगा. सन १७९८ ला जिंजी मराठ्यांकडून घेतल्यावर त्याठिकाणी स्वरूपसिंगाची नियुक्ती करण्यात आली. सन १७१४ ला स्वरूपसिंग मरण पावला व त्यानंतर पित्याच्या जागा तेज सिंगाने घेतली परंतू तत्पुर्वी अर्काटच्या नवाबाने जिंजीची सुत्रे अर्काटला हलवल्यामुळे तेज सिंग व नवाबाचे संबंध बिघडले. नवाब व तेजसिंगाचे मैत्रीचे संबंध होते तसेच नवाबाची मुलगी आणि तेजसिंगाचे प्रेमसंबंध होते असे तमिळ कवितांमध्ये सांगितले जाते. हीच मुलगी पुढे १७१४ मध्ये उद्भवलेल्या युद्धात बापाविरूद्ध लढल्याचे सांगितले जाते. ह्या तेजसिंगाचा कार्यकाळ फारतर आठ महिण्याचा परंतू नवाबाशी दिलेल्या प्रखर लढ्यामुळे तमिळ कथा काव्यांमध्ये तो कमालीचा छाप सोडून गेला. विल्लुपुरम् तसेच जिंजी – दिंडीवोनम रोडवर असलेल्या काॅलेजना राजा देसिंगाचे नावा देण्यात आले आहे. ह्या देसिंगाने हा किल्ला बांधल्याचे सांगितले जाते.(जे साफ खोटे आहे). या गावाला जरी देसिंगाचे नाव दिले गेले असले तरी देसिंगापुर्वीही या गावाचा व किल्ल्याचा काही ऐतेहासीक संदर्भ आढळतात त्यामुळे या नावामागच्या खटाटोपास अर्थ उरत नाही. शिवाय हा देसुरचा किल्ला देसिंगाने बांधला हे Google चे मतही खोटे ठरते.

भिमसेन सक्सेना म्हणतो की देसुर मुक्कामी मोगल सैन्य रात्री किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन राहिले. त्याअर्थी याअगोदर तिथे केल्ला होता हे सिद्ध होते. शिवाय जर हा दुसरा किल्ला असेल तर जवळपास तेल्लार येथे मातीचा भुईकोट किल्ला आहे. पण खान चाललाय जिंजीकडे आणि हा किल्ला जिंजीच्या विरूद्ध दिशेला म्हणजेच देसुरपासुन वांदीवाॅश कडे जाताना १० किलोमिटरवर आहे.

कर्नाटकात संताजी आणि धनाची यांना मिळालेल्या विजयामुळे शत्रूच्या मनात धडकी भरली होती. सर्वत्र ईतकी घबराट पसरली होती की जिंजीला वेढा टाकून बसलेली मोगली फौज व बादशहाची छावनी यादरम्यानचे दळनवळन बंद पडले होते. बादशहाच्या छावनीतून काही वार्ता येत नसल्याने फौजेत अफवांना उत आला होता. दरम्यान जिंजीचे मोर्चे टाकून मोगल सैन्य मुख्य तळाकडे येऊ लागले होते. सर्वत्र मराठ्यांविषई मोठी धास्ती निर्माण झाली होती. अशा संधीचा फायदा घेऊन मराठ्यांनी किल्ल्याबाहेर पडून मोगलांचे मोर्चे उद्ध्वस्त करून लावले. मोगल मराठ्यांची मोठी लढाई झाली. खुद्द जुल्फीकारखानास हाती शस्त्र धरावे लागले. मराठ्यांच्या प्रखर हल्ल्यातून जुल्फीकारखानाने आपले लष्कर कसेबसे मुख्य तळावर आणले.

मोगलांना त्राही भगवान झाले होते यात कहर म्हणजे राजारामांनी पसरवलेली बादशहाच्या मृत्यूची अफवा. १६ डिसेबर १६९२ ला शहजादा कामबक्ष औरंगजेब वारला ह्या अफवेला बळी पडून मराठ्यांना सामील होण्यास निघाला परंतू ही बातमी जुल्फीकारखानास लागली व त्याने त्वरीत शहजाद्याच्या तळावर छापा टाकून त्यास गिरफ्तार केले. या घटनेमुळे मोगलांचे उरले सुरले नितीधैर्यही नष्ट झाले. फौजेत अफवांबरोबर कटकारस्थानांचे पिक माजले होते शिवाय अन्नधान्य व चारा यांच्या टंचाईमुळे मोगल छावनी मोठ्याच संकटात सापडली होती. या संकटातून तारन्याची कुवत फक्त जुल्फीकारखानाकडेच होती. त्याने तळाबाहेर पडून रसद अाणण्याचा दोनदा प्रयत्न केला परंतू दोन्हीवेळा मराठ्यांच्या हल्ल्यामुळे त्यास माघार घ्यावी लागली. आता परिस्थीती अशी होती की मराठ्यांनीच मोगलांच्या तळाभोवती वेढा टाकल्यासारखे झाले होते.
जिंजी पासून वांदीवाॅश हे सुमारे २५ किलोमिटर आहे जिथे मोगलांची अन्नधान्य व ईतर साधनसामग्री होती.

जुल्फीकारखानाने वांदीवाॅशला जान्याचा तिसरा प्रयत्न केला जो यशस्वी झाला. वांदीवाॅशला बंजार्यांचे तांडे अन्नधान्य घेऊन थांबले होते. मोगल सैन्यात ईतकी बेशिस्त माजली होती की उपाशी सैनीकांनी त्या तांड्यावर हल्ला चढवून ते लुटले. दुसर्या दिवशी हल्ल्यातून वाचलेले अन्नधान्य गोळा करून जुल्फीकारखान वांदीवाॅशहून आपल्या तळाकडे निघाला. वांदीवाॅशहून २२ किलोमिटर देसुर येथे संताजीने २०००० सैन्यानिशी ५ जानेवारी १६९३ रोजी खानास गाठले. भिमसेन सक्सेना हा रावदलपताचा चिटनिस व मोगल ईतिहासकार त्यावेळी या लढाईत सामील होता त्याने हा प्रसंग सविस्तर लिहून ठेवला आहे तो म्हणतो जुल्फीकारखान परत येण्यास निघाला. मराठ्यांनी चोहीकडून हल्ले करण्यास सुरवात केली. मराठे देसुर मुक्कामी गोळा झाले होते. त्यानी मोगलांची वाट अडवली. मोगलांकडे बाराशेपेक्षा जास्त फौज नव्हती. राव दलपताने सैन्याची उजवी बाजू संभाळली आणि त्याने शत्रूंना हटवले. ईतक्यात रात्र झाली. मोगल सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन राहिले. दुसर्या दिवशी मराठ्यांनी बरेच मोठे सैन्य आणले. त्यानी निकराचे हल्ले चढविले. त्यानी ईतक्या गोळ्या झाडल्या की मोगल सैनिक आणि सैन्यासोबत असलेले वंजारी हवालदिल झाले.

मराठ्यांच्या बंदुका मोगल सरदाराच्या हत्तीवर नेम धरून गोळ्या झाडू लागल्या. जुल्फीकारखान व राव दलपत यांच्या हत्तीना अनेक गोळ्या लागल्या. राव दलपताने स्वत: गोळ्या झाडून आनखी काही मराठा सरदारांना ठार मारले. मराठ्यांकडून गोळ्यांचा वर्षाव चालूच होता. मी राव दलपताच्या माघे बसलो होतो. राव दलपताचे रक्षण व्हावे म्हणून राव दलपताच्या समोर ढाल धरली. खराखुरा वाचवनारा भगवान आहे! लागोपाठ दोन गोळ्या माझ्या खांद्याच्या दिशेने आल्या त्या ढालीला लागल्या. आम्ही कूच करीत असता वाटेत भातशेते लागली. आमच्या सैन्यातील कितीतरी बैल आणि उंट चिखलात अडकले. घोडे मोठ्या मुश्किलीने पार झाले. आमच्यापाशी दारूगोळ्याचा तुटवडा पडला. बरकंदाजापैकी कोनापाशीही दारूगोळा राहीला नाही. एकीकडे राव दलपत आणि त्याचे पथक, मध्ये चिखल आणि पलिकडे उजव्या बाजूस बरकंदाज स्वार अशी स्थिती झाली. राव दलपताच्या हत्तीजवळ ऐंशीपेक्षा अधिक स्वार शिपाई नव्हते. मराठ्यांनी तेथून जवळ असलेल्या टेकडीवर आपले पायदळ पाठवले. तेथून मराठ्यांनी रावदलपताच्या तुकडीवर गोळ्या झाडावयास सुरूवात केली. त्यामुळे अतिशय कठीण परिस्थीती झाली. चिखलातून अडकलेले बैल व उंट यांना काढण्यासाठी म्हणून राव दलपत तेथे थांबला होता. बरीचशी मोगल फौज पुढे निघून गोली होती. राव दलपताने प्राणपणाचा निर्धार करून मराठ्यांच्या दिशेने चाल केली. ईतक्यात जुल्फीकारखानाचा आघाडीचा सरदार सर्फराजखान हा पाच – सहा हजार सैन्य घेऊन राव दलपतला येऊन मिळाला. दोघांनी एक होऊन मराठ्यांवर चाल केली. युद्धाला तोंड लागले हा आपल्या सैन्यात दाखल होण्यासाठी तिकडे वळला.

मराठ्यांची मुख्य तुकडी बारा हजाराची होती. राव दलपत या तुकडीवर चालून गेला अाणि मर्दुमकीने लढू लागला. युद्धाचा एकुन रंग पाहून मराठे एका बाजूस झाले. राव दलपताने पाव कोसापर्यंत मराठ्यांना मागे हटवले. त्याच्या ऐंशी स्वारांवर मराठ्यांनी हात टाकला नाही. राव दलपत त्या ठिकाणी घटकाभर थांबला. त्याने सामान सुमान चिखलातून बाहेर काढविले. मराठे लांब आपल्या जागेवर थांबले होते. यानंतर राव दलपत हळूहळू आपल्या बुनग्यांच्या पाठीमागे रवाना झाला. गोळ्यांचा मारा व चकमकी कमी झाल्या. राव दलपत नदीच्या काठावर पोहचला. काही तोफा चिखलात फसल्या होत्या. राव दलपताने हत्तीच्या कमरेला जाड दो बांधून त्याच्या सहाय्याने तोफा बाहेर काढल्या. मराठे आश्चर्यचकित झाले. त्यांनी जिंजीची वाट धरली.

दुर्दैव म्हणजे ह्या किल्ल्याची नाॅर्थ अरक्काट १८९२ अवृतीत जी नोंद आहे ती पुढे कुठल्याच नवीन गॅझेटियर्स अथवा पुस्तकात नाही. भारतात अगनित ठिकाणी ईतिहासाने पाऊलखुना सोडल्या आहेत मात्र आपल्या कंटाळखोर वृत्तीने त्या पुसून चालल्या आहेत. सर्व गोष्टी सरकार वा पुरातत्वखाते करेल ही मानसिकता झुगारली पाहिजे.

__ अमर श्रीरंग साळुंखे.
संदर्भ- दारिखे दिल्कुशा (भिमसेन सक्सेना)
A history of gingee
Martin memories
Diary and consultation book
डाॅ. जयसिंगराव पवार
History of gingee and it’s ruler

माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Leave a comment