सिध्दार्थ माता महामाया | आमची ओळख आम्हाला द्या

सिध्दार्थ माता महामाया

सिध्दार्थ माता महामाया | आमची ओळख आम्हाला द्या –

भारतीय मूर्तिकलेच्या जडणघडणीत बौद्धमूर्ती कलेचे विशेष मोलाचे योगदान आहे. मूर्तिकलेच्या सुरुवातीपासून बौद्ध धम्माच्या विशेष खाणाखुणा मूर्तिवर आढळतात. भारतामध्ये लेण्यांच्या माध्यमातून शिल्पकला बहरतच गेली आणि ती विकसित होत गेली .मूर्तिकलेचा प्रवास जर आपण चिकित्सकपणे अभ्यास केला तर बरेच सत्य आपल्या निदर्शनास येईल हे निर्विवाद सत्य नाकारता येत नाही. भारतामध्ये भगवान बुद्धांचे तत्त्वज्ञान जनमानसांत पर्यंत पोहोचले होते. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या आधीपासून ते तथागत गौतम बुद्ध होण्यापर्यंतचा हा प्रवास कथारूपाने लोकात रुजला होता. त्यातच सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या आधीचा प्रसंग लक्षात घेणे क्रमप्राप्त ठरते.सिध्दार्थ माता महामाया.

सिद्धार्थाच्या जन्माच्या आधी त्याची आई महामाया एक दिव्य स्वप्न पाहते. स्वप्नात तिला असे दिसते की चर्तुदिक्पालानी तिला मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन, एका विशाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत. नंतर सरोवराजवळ असणाऱ्या हत्तींनी तिला स्नान घातले वगैरे वगैरे .महामाया बसली आहे .सरोवरात सर्वत्र कमलपुष्प आहे आणि हत्ती तिला कलशाने स्नान घालत आहे. नंतरच्या कालखंडात जेंव्हा मूर्तिकलेचा प्रारंभ झाला तेंव्हा ही महामायाची मूर्ती निर्माण झाली .परंतु कालांतराने तिला गजगौरी किंवा गजलक्ष्मी असे संबोधले गेले.

पितळखोरा या ठिकाणी अशाच प्रकारचे शिल्प उत्खननात मिळाले असून सध्या हे शिल्प छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई या ठिकाणी आहे. कमळावर विराजमान असणारी ही मातृदेवता द्विभुज आहे. तिची विशिष्ट केशरचना आकर्षक आहे. दोन्ही हातात अर्धविकसित सनाल कमलकलिका धारण केलेल्या आहेत. कानातील कुंडल तिच्या खांद्यावर रुळलेली असून हार कटक वलय, कटीसूत्र ,पादवलफ, पादजालक इत्यादी अलंकार तिने परिधान केलेले आहेत. दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना स्पर्श होतील अशाप्रकारे मांडी घालून देवी बसलेली आहे. चेहर्‍यावर प्रचंड दिव्य तेज व शांत भाव दिसत आहे. दोन्ही बाजूस शेजारी अलंकृत हत्ती असून सोंडेत धरलेल्या कुंभातून ते  तिला स्नान घालत आहेत.

उजवीकडील हत्ती भंगला आहे. देवी ज्या कमलपुष्पावर विराजमान आहे त्या कमल पुष्पाच्या आठ पाकळ्या अंकित केलेल्या दिसतात. मूर्तीच्या लक्षणावरून ती गजलक्ष्मी नसून सिद्धार्थाची माता महामाया आहे. सुरवातीच्या काळातील हे शिल्प द्विभुज होते. नंतरच्या काळात देवीला चतुर्भुज दाखवण्याचा प्रघात सुरू झाला. असे असले तरीही नंतरच्या काळात गजलक्ष्मी म्हणून राजमान्यता प्राप्त ही देवी गौतमाची माता महामाया  होय. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा मूर्ती आपणास पहावयास मिळतात काही ठिकाणी स्वतंत्र शिल्प दिसून येते, तर बऱ्याच वेळेला मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या ललाटलिंबावर या देवीचे अंकन केलेले दिसून येते.

या शिल्पाचा फोटो सूरज रतन जगताप मुक्तलेणी अभ्यासक यांनी उपलब्ध करून दिलेला आहे.

डाॅ.धम्मपाल माशाळकर.
मूर्ती अभ्यासक, मोडी लिपी व धम्मलिपी तज्ञ सोलापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here