महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,91,416

शिवराय स्वतःच शिरकमल श्री चरणी अर्पायचं ठरवतात आणि…

By Discover Maharashtra Views: 2636 6 Min Read

शिवराय स्वतःच शिरकमल श्री चरणी अर्पायचं ठरवतात आणि…

एप्रिल १६७७, भागानगर म्हणजेच आजच हैद्राबाद इथे तानशाह कुतुबशाहाची भेट घेऊन ‘दक्षिणची पादशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती राहे ते करावे’ हे ब्रीदवाक्य ठरवून शिवाजी महाराज पुढे दक्षिण दिग्विजयाला निघाले. यानंतर बारा जोतिर्लिंगांपैकी एक श्री शैल इथल्या मंदिरात शिवरायांनी शिवशंकराचं दर्शन घेतलं या वेळी घडलेल्या एका प्रसंगाचं सभासद बखरीने जे वर्णन केलं आहे त्या वर्णनाने भल्याभल्यांना संभ्रमित केलं आहे. बरं याच वेळी शिवरायांनी एक अभंगही रचलेला आहे जो या व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे तोही नक्कीच ऐका. शिवराय स्वतःच शिरकमल श्री चरणी अर्पायचं ठरवतात आणि… व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

त्याचं झालं असं की महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाची सुरुवात तानाशाह कुतुबशहा याला भेटून झाली. भागानगरमध्ये एक मास राहिल्यानंतर राजे पुढे दक्षिण दिग्विजयासाठी कूच करते झाले. शिवाजी महाराज हे अंधश्रद्धाळू नसले तरी ते मूळचेच धार्मिक होते. तीर्थक्षेत्रांना भेटी देणं, त्यांजीर्णोद्धार करणं, त्यांचे खर्च चालवणं अशी बरीच धार्मिक कृत्य शिवराय नित्यनेमाने करत. या दक्षिण दिग्विजयाच्या वेळी महाराज कृष्णा आणि तुंगभद्रा नदीच्या संगमावर अर्थात ‘निवृत्तिसंगमाजवळ’ पोहोचले. इथून फक्त ४० मैलांवर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक श्रीशैलमल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग आहे. महाराजांच्या धार्मिक मनात पुन्हा एकदा अध्यात्मिक तरंग उचंबळून आले. शिवशंकराच्या इतर मंदिरांप्रमाणेच हे स्थानही गर्द वनराजीत दडलेलं आहे, याही स्थळी निरव शांतता लाभेल असे निसर्ग सौंदर्य आहे. या स्थळी शिवरायांनी निळगंगेत स्नान करून श्री शैलच्या शिवशंकराचं दर्शन घेतलं. इथे पुढे सभासद म्हणतात
‘राजियांना स्थळ देखून परमआनंद जाला की, केवळ कैलास दुसरे असे स्थळ वाटले. तेथे हा देह श्रीस अर्थात शिवशंकरास अर्पण करावा, शिरकमल वाहावे ऐसे योजिले. ते समयीं भवानी म्हणजे तुळजाभवानी अंगांत आविर्भवली आणि बोलली जे, “तुज ये गोष्टी मोक्ष नाही हे कर्म करू नको. पुढे कर्तव्यही उदंड तुझे हाती करणे आहे.”

आता हा उतारा वाचून कित्येकांना वाटतं की महाराजांच्या ठायी आत्महत्येचे विचार उद्भवले. महाराजांनी निराशेने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असही बऱ्याच अभ्यासकांना वाटतं. आपण जर डोळे उघडून आजूबाजूला नीट पाहिलं तर अगदी सहज कळेल की सर्वसामान्यपणे आयुष्यात हरलेले, भित्रे लोकं आत्महत्येचा विचार करतात. ज्यांना आजूबाजूच्या परिस्थितीशी झुंजण्याची हिम्मत नसते असे लोकं आत्महत्या करण्याचा विचार करतात. ज्यांनी शिवचरित्राचा नीट अभ्यास केला असेल त्यांना सहज कळून येईल की अफझलखानाचा वध करणारे, शास्ताखानावर हल्ला करण्यासाठी लाखाच्या फौजेत शिरणारे, आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात सिंहगर्जना करणारे महाराज भित्रे मुळीच नव्हते. आयुष्यात महाराजांनी जेव्हढे संघर्ष केले आणि ज्या दक्षिण दिग्विजयासाठी महाराज निघाले होते ते पाहता ‘परिस्थितीशी झुंज न द्यावी’ अशीही इच्छा शिवरायांच्या मनाला दूर दूरपर्यंत शिवली असेल असं वाटत नाही. मग सभासदांनी हे का लिहिलं असेल?

तर सभासदांनी लिहिलेल्या या प्रसंगाचं वर्णन हे Metaphorical अर्थात रूपकात्मक आहे. शिवाजी महाराजांनी ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापनेचा यज्ञ सुरु केला होता आणि त्यासाठी इतर पातशाह्यांच्या शहरांवरती हल्ले केले असले त्यांची लूट केली असली तरी ती लूट स्वार्थासाठी, ऐषारामात जगता यावं यासाठी नव्हती. इतर पातशाह्यांचे इतके गड-किल्ले जिंकूनही शिवरायांनी कधीच त्याला स्वतःच नाव दिलं नाही, सुरत, कारंजा, बागलाण अश्या शहरांच्या केलेल्या लुटीतून महाराजांनी कधीच ताज महालासारखे महाल बांधले नाहीत की वैयक्तिक उपभोगासाठी तिथून कधीच कोणा स्त्रियांना अपहरण करून आणलं नाही. महाराजांचा मूळचा स्वभावच धार्मिक आणि न्यायी असून त्यांची वृत्ती सदैव विरक्त होती. आपले शिरकमल श्री शंकराच्या पायी अर्पण करावे याचा अर्थ, शिवाजी महाराजांना आपण जे जे अर्जिले जे जे मिळवले ते ते सर्व श्री च्या पायी अर्पण करावे असा विचार त्यांच्या मनात आला होता. इथे शिरकमल हा शब्द शिवरायांचं अख्ख जीवन अश्या अर्थाने सभासदांनी वापरलेलं आहे.

महाराजांनी अलम हिंदुस्थानाला यावनी सत्तांपासून मुक्त करण्याचा निश्चय केला होता, हे सर्व करताना जे जे म्हणून मुत्सद्दी डावपेच, लढाया, लुटी करणं गरजेचं होतं ते ते शिवराय करत होते पण ते हे सगळं त्यांच्या रयतेसाठी करत होते. संसारात राहूनही, संसारातील सर्व मायांचा वापर करूनही, हा श्रीमंत योगी त्या मायांच्या मोहापासून स्वतःला दूर ठेऊ शकला. महाराजांना विरक्त वृत्ती निर्माण झाली असली तरी त्यांनी स्वतःला सावरून आपली कर्तव्यदक्षता सोडली नाही. आपण निर्माण केलेल्या ‘स्वराज्याला’ सध्या आपणच मोठा आधार आहोत आणि ते वाढवून भारतातल्या सर्व लोकांना अन्यायी, जुलमी पातशाहांपासून रक्षिण्याची जबाबदारी आपल्यावर आहे हे शिवरायांच्या चित्तात आले. श्री भावनीनेच त्यांना ही उपरती दिली असं सभासद पुढे म्हणतात. शककर्ते शिवरायचे लेखक विजयराव देशमुख म्हणतात यावेळी शिवरायांनी खालील अभंग रचलेला आहे जो तंजावरच्या सरस्वती महालात ठेवलेला आहे

नासिवंत सुखासाटी।अंतरला जगजेठी।।
नाही नाही याते गोडी। लक्ष चौऱ्यांशीच्या जोडी।। (चौऱ्यांशी लाख योनींमधून गेल्यानंतर जो मनुष्य जन्म मिळतो त्यात नाशिवंत अश्या सुखासाठी तुम्ही जगजेठ्याला अर्थात परमेश्वराला अंतरला आहात)
माणूष जन्म गेल्यावारे।काय करशील बारे।।
शिवराजे सांगे जना। म्या तो सोडिली वासना।। (एव्हढ्या परिश्रमाने मिळालेला हा मनुष्य जन्म गेल्यावर काय कराल, त्यामुळे हा शिवराय तुम्हाला सांगतो आहे की यासाठीच मी वासना सोडल्या आहेत)

या अभंगातून शिवरायांच्या मनातील विरक्त भाव अगदी स्पष्टपणे दिसून येतो.या प्रसंगानंतर महाराज पुढे दक्षिणदिग्विजयाला गेले आणि यशस्वी होऊन परत आले, पण हा एक प्रसंग महाराजांच्या स्वभावाच्या एका वेगळ्या पैलूवर प्रकाश पडून जातो. केवळ म्हणूनच समर्थांचा खालचा श्लोक शिवरायांसाठी अगदी चपखल बसतो

निश्चयाचा महामेरू (ज्यांचा निश्चय मेरू म्हणजे पर्वताप्रमाणे अचल आहे)
बहुत जनांसी आधारु (जे रयतेचा आधार आहेत)
अखंड स्थितीचा निर्धारु (ज्यांचा निर्धार न डगमगणारा आहे)
श्रीमंत योगी (असे शिवाजी महाराज हे संसारात राहूनही अलिप्त राहिलेले श्रीमंत योगी आहेत).

धन्यवाद.
संदर्भ:
१. सभासद बखर
२. शककर्ते शिवराय: लेखक: विजयराव देशमुख

Suyog Sadanand Shembekar

Leave a Comment