महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,98,892

औरंगजेब बादशहा कसा झाला? भाग १

By Discover Maharashtra Views: 1731 5 Min Read

औरंगजेब बादशहा कसा झाला? भाग १ –

औरंगजेब म्हटलं की छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृणपणे हत्या करणारा, शिवरायांना फसवून कैद करणारा, काशीविश्वेश्वराचं मंदिर पडणारा एक पाताळयंत्री, क्रूरकर्मा डोळ्यासमोर येतो. औरंगजेबाची सगळीच कृत्य अघोरी आणि निर्दयी होती. असा आतल्या गाठीचा, क्रूर, धर्मवेडा माणूस मुघलांचा सहावा बादशहा नक्की कसा बनला? का नक्की याच अवगुणांमुळे त्याला बादशहा होणं सहज शक्य झालं, औरंगजेब बादशहा कसा झाला? पाहुयात, आजच्या व्हिडिओत.

औरंगजेबाची सत्तास्पर्धा आपण दोन भागात पाहणार आहोत. आजच्या भागात पाहुयात की ही यादवी नक्की कोणकोणत्या शेहेजाद्यांमध्ये होती आणि मग पुढील भागात ही यादवी नक्की कशी घडली ते पाहुयात.निकोलाओ मनुची हा एक इटालियन माणूस १६५३ ला भारतात आला. हा औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शिकोह याच्या सैन्यात होता. या मनुचीने ‘storia do mogor’ या त्याच्या पुस्तकात औरंगजेब आणि त्याच्या इतर तीन भावांनी केलेल्या सत्तासंघर्षाबद्दल आणि औरंगजेबाच्या राज्यारोहणाबद्दल तपशीलवार माहिती दिलेली आहे.आता सगळ्यात प्रथम आपण औरंगजेब आणि त्याच्या सत्तासंघर्षात एकमेकांशी युद्ध करणाऱ्या त्याच्या भावांची ओळख करून घेउयात.

औरंगजेबाचा बाप ‘शहाजहान’ हा १४ फेब्रुवारी १६२८ ला बादशहा झाला. याला ४ मुलं होती.

१. दारा जो सगळ्यात मोठा होता दुसरा
२. शाहशुजा
३. मग औरंगजेब
४. आणि सगळ्यात लहान मुरादबक्ष

दारा शिकोह हा शहाजहानचा जेष्ठ पुत्र, दिसायला सुस्वरूप असून संभाषणात योग्य ते शिष्टाचार पाळून बोलणाऱ्यांपैकी होता. आपल्याला कोणाच्याच सल्ल्याची गरज नाही आणि आपणच सर्वज्ञ आहोत असा फाजील आत्मविश्वास त्याला असे. मुघलांची नर्तक्यांच्या प्रेमात पडण्याची परंपरा यानेही पुढे चालवली. राणादिल नावाच्या एका नर्तकीच्या प्रेमात पडून त्याने हट्टाने तिच्याशी लग्नसुद्धा केलं. हा औरंगजेबासारखा इस्लाम धर्मवेडा नसून तो हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन याही धर्मांचा अभ्यास करून त्या त्या धर्माचे उपासक आपल्या दरबारात बाळगून असायचा. यामुळेच औरंगजेब दाराला ‘काफिर’ म्हणत असे. याला विदूषकांच्या नकला पाहायचा आणि त्यांचे चाळे पाहायचा एक विचित्र छंद होता असं मनुची म्हणतो. फलज्योतिष्यावरसुद्धा दाराचा गाढा विश्वास होता. दारा हा शहाजहानचा अतिशय लाडका असून तोच माझा उत्तराधिकारी आहे असं शहाजहानने कित्येक वेळा दरबारात जाहीर केलं होतं. बरं भविष्यकाळात औरंगजेबाने ज्या मिर्झा राजा जयसिंगांना छत्रपती शिवरायांवर आक्रमण करायला पाठवलं होतं, त्या जयसिंगांची ते ‘गवय्यासारखे’ दिसतात असं म्हणून एकदा दाराने टर उडवली होती. अश्याच अजून काही कारणांमुळे दारा बादशहा व्हावा अश्या पक्षात मिर्झा राजा जयसिंग नव्हते.

शहाजहानच्या दुसऱ्या मुलाचं नाव शाहशुजा होतं. हा फार गर्विष्ठ असूनही तो खूप शूर, विवेकी आणि दृढनिश्चयी आहे असा त्याचा लौकिक होता, थोडक्यात त्याचा PR चांगला होता. आपल्या कामात मदत करतील असे मित्र कसे जोडावेत हे त्याला चांगलं माहित होतं. शाहशुजाला नर्तक्या, दारू, स्त्रिया यांचा भरपूर छंद होता, कधी कधी तो या मध्ये मश्गुल होऊन दरबारसुद्धा भरवत नसे. तो इतरांना तुच्छ लेखत असे, औरंगजेबाच्या मते हा शाहशुजा ‘शिया’ पंथीय होता.तिसरा मुलगा औरंगजेब याच्याबद्दल बोण्यापूर्वी सर्वात धाकट्या मुरादबक्षचा स्वभाव कसा होता ते आधि बघुयात. हा मुरादबक्ष शूर होता, तलवार आणि धनुर्विद्येत तो निपुण होता. आपल्या बाहुबलावर त्याचा पूर्ण विश्वास असल्याने तो कोणाचीच पर्वा करत नसे. यालासुद्धा दारू आणि नर्तक्यांचा छंद होताच. त्याला युद्धांच्या गोष्टी आवडत असल्याने तो दरबारी कामांना तुच्छ लेखत असे.औरंगजेब, या पाच अक्षरांमध्ये मिळून सगळी गोम आहे. औरंगजेब हा आतल्या गाठीचा असल्यामुळे सगळी कामं गुप्तपणे पण नेटाने करत असे. त्याला आपण फकिरी वृत्तीचे आहोत याचा दिखाऊपणा करण्याची फार आवड होती. खरंतर औरंगजेबाच्या अंतःपुरात असलेल्या एका नर्तकीवर त्यांचं प्रेम जडलं होतं. तिने सांगितल्यामुळे त्याने मदिरापान करायला ही सुरुवात केली होती. रोजचा नमाजसुद्धा बंद केला आणि अचानक एक दिवस ही नर्तकी मेली. ‘कोल्ह्याला द्राक्ष आंबट’ या न्यायाने पुढे औरंगजेब म्हणत असे की त्या नर्तकीचा मृत्यू म्हणजे माझ्यावर अल्लाने केलेले उपकार आहेत, तिच्यामुळे माझ्याकडून कित्येक चुका घडल्या होत्या. आपण शहाणे, चतुर आणि सत्याचे भोक्ते आहोत असं जगाने म्हणावं यासाठी औरंगजेब सतत खटपट करी. सर्वसंगपरित्यागाचं नाटक करून औरंगजेबाने कित्येक गरीब फकिरांना फसवलं. मनुची म्हणतो हे फकीरसुद्धा काही साधे नसत पण फसवेगिरी मध्ये औरंगजेब त्यांचा बाप होता.याशिवाय शहाजहानला जहाँआरा बेगम उर्फ बेगम साहेब, रोशनआरा बेगम आणि मेहेरुन्निसा बेगम अश्या तीन मुली होत्या. यातल्या जहाँआरा बेगमला ‘सुरतेच’ उत्पन्न मिळत असे. हि तीच बाई जिने पुढे शिवाजी महाराजांनी सुरत लुटली म्हणून ते आग्र्याला आल्यावर त्यांना कैद करावी म्हणून औरंगजेबाचे कान भरले होते. दारा जिवंत असे पर्यंत हिने दराचा पक्ष स्वीकारला होता. तर रोशन आरा बेगम हि औरंगजेबाच्या पक्षातली होती. याशिवाय मिहरुन्निसाबेगमने मुरादबक्षचा पक्ष स्वीकारला होता.तर ही अशी सगळी शहाजहाँची पिलावळ होती. कोणी आतल्या गाठीचा, तर कोणी गर्विष्ठ, कोणी अतिआत्मविश्वासाने भरलेला तर कोणी नाचगाणी आणि दारूमध्ये आकंठ बुडलेला. या सगळ्यां अवगुणी शेहेजाद्यांमध्ये एक अवगुण कॉमन होता तो म्हणजे ‘स्वार्थ’. राज्य मिळवण्यासाठी या स्वार्थी भावांनी एकमेकांविरुद्ध नक्की काय काय उचापती केल्या पाहुयात पुढच्या भागात. धन्यवाद.

संदर्भ:
१. Storia do Mogor (असे होते मोगल) by मनुची

Suyog Sadanand Shembekar

Leave a Comment