महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,92,868

वणी-दिंडोरी किंवा कंचन-मंचन ची लढाई

By Discover Maharashtra Views: 3838 6 Min Read

वणी-दिंडोरी किंवा कंचन-मंचन ची लढाई –

शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला तेव्हा अफझलची बरीचशी फौज प्रतापगडाच्या पायथ्याशी ‘पार’ नावाच्या गावात होती. या गावाजवळच्या जंगलात लपून बसलेल्या शिवरायांच्या मावळ्यांनी अफझलखानाच्या या फौजेवर अकस्मात हल्ला करून त्यांची पार वाताहत केली. पुढे मुघलांचं अवाढव्य पण बेसावध सैन्य उंबरखिंडीमध्ये शिरल्यावर अचानक त्यांच्यावर ‘दडून’ बसलेल्या मराठ्यांनी हल्ला करून त्यांना महाराजांसमोर नाक घासायला लावलं. मग शिवरायांना आणि त्यांच्या मावळ्यांना फक्त गनिमी कावाच जमायचा का? बेसावध शत्रूवर जंगलाच्या आडोशाने, रात्रीच्या अंधारात, सह्याद्रीच्या काडेकपारीचा आधार घेऊनच मराठे यशस्वी व्हायचे का? तर अजिबात नाही. आज आपण ऐकणार आहोत शिवाजी महाराजांच्या एका अश्या लढाईबद्दल ज्यात प्रत्यक्ष शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी शत्रूला मैदानी लढाईत समोरासमोर नामोहरम केलं. मिर्झा राजांनी एका पत्रात शिवरायांना खवचटपणे लिहिलं होतं की ‘मुघलांच शाही सैन्य हे आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे आहे’ याच मुघलांच्या अजिंक्य सेनेला शिवरायांनी भर दिवसा ‘तारे’ कसे दाखवले पाहुयात आजच्या व्हिडिओत. वणी-दिंडोरी किंवा कंचन-मंचन ची लढाई हा लेख विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

३ ऑक्टोबर १६७० शिवरायांनी सुरत पुन्हा एकदा लुटली. सुरतेला औरंगजेबाची दाढी म्हटलं जात असे, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची दाढी पुन्हा एकदा ओढली. सुरतेच्या लुटीत महाराजांना अगणित द्रव्य सापडलं. लुटीचा ऐवज घेऊन शिवाजी महाराज तिथून मुल्हेरला आले आणि मुघलांची मुल्हेरची पेठसुद्धा लुटली. एव्हाना मुघलांचा आळशी आणि ऐयाश शहजादा मुअज्जम याला शिवाजी महाराजांचा हा पराक्रम कळला. त्याने लगेच दाऊदखानला शिवाजी महाराजांवर हल्ला करून लुटीचा ऐवज परत मिळवण्यासाठी पाठवलं. यावेळी दाऊदखानाबरोबर राव भाऊसिंग हाडा, संग्रामखान घोरी, भीमसेन सक्सेना, इखलासखान, मीर अब्दुलमाबुद इत्यादी सरदार महाराजांच्या मागावर निघाले. हा भीमसेन सक्सेना तोच ज्याने ‘तारिखे दिलकुशा’ मध्ये या संपूर्ण लढाईचे तपशील दिलेले आहेत. महाराज यावेळी सुरतवरून निघून मुल्हेर लुटून, वणी दिंडोरीजवळून, कंचन-मंचन च्या घाटातून उतरून पुढे नाशिक मार्गाने जाणार होते. तर दाऊदखान बुऱ्हाणपूरहून निघून औरंगाबादला पोहोचला. तिथे त्याच्या हरकऱ्यांनी बातमी आणली की शिवाजी महाराजन कंचन-मंचनचा घाट उतरून जाण्याच्या बेतात आहेत. हे ऐकल्यावर दाऊदखान त्वरेने मॅपवर दिसतंय त्या चांदूरकडे रवाना झाला. इकडे मध्यरात्री भीमसेन सक्सेनाच्या हरकऱ्यांनी बातमी आणली की ‘शिवाजी महाराजांनी कंचन-मंचनचा घाट पार केला असून ते नाशिककडे जात आहेत तर त्यांचं उरलेलं सैन्य घाटावर असून मागाहून येणाऱ्या सैन्याची वाट पाहत आहेत.

याचवेळी मुघलांनी विचार केला की हीच ती वेळ आहे ज्यावेळी आपण मराठ्यांवर तुटून पडू शकू. अश्या लढाईत मुघल स्वतःला पटाईत समजत होते तर मराठ्यांना सह्याद्रीचा आधार नसल्याने ते आयतेच आपल्या तावडीत सापडतील आणि सुरतेची लूट आपण परत मिळवू शकू असा विश्वास दाऊदखानाला होता.

एका क्षणाचाही विलंब न करता दाऊदखान शिवरायांवर हल्ला करायला स्वार होऊन निघाला. त्याने इखलासखानाला पुढे पाठवलं. अचानक बेसावध असणाऱ्या मराठ्यांवर खुल्या मैदानात हल्ला करून त्यांची लांडगेतोड करू अशी स्वप्न रंगवणारे मुघल ज्यावेळी कंचन-मंचनच्या घाट माथ्यावर पोहोचले तेव्हा त्यांना काय दिसलं माहित्येय? खासे शिवाजी महाराज बख्तर घुगी घालून, बख्तर म्हणजे चिलखत आणि घुगी म्हणजे शिरस्त्राण किंवा मुखस्त्राण अर्थात हेल्मेट घालून, हाती पट्टे चढवून स्वार होऊन तय्यार होते तर महाराजांचे मावळे युद्धाचा पवित्रा घेऊन सिद्ध झाले होते. शिवाजी महाराजांच्या हेरांनी मुघल हल्ला करणार आहेत याची बातमी महाराजांना पोहोचवली होती.

सर्वात पहिले पुढे पाठवलेला इखलासखान पहाटेच्या वेळी घाटमाथ्यावर पोहोचला आणि त्याने मराठ्यांवर हल्ला चढवला. मराठे आधीच सुसज्ज असल्याने थोड्या वेळातच त्यांनी हा हल्ला मोडून काढला. स्वतः इखलासखान युद्धाच्या गर्दीत जखमी होऊन घोड्यावरून खाली पडला. हे सुरु असतानाच दाऊदखान, युद्धाच्या मैदानात पोहोचला. त्याने संग्रामखान घोरीला मराठ्यांवर हल्ला करायला पाठवलं. हा संग्रामखान आणि त्याची मुलं सगळीच्या सगळी या युद्धात जखमी होऊन हतप्रभ झाली. दाऊदखानाने स्वतः पुढे होऊन इखलासखानाला तो जिथे जमिनीवर पडलेला होता तिथून उचलून आपल्याबरोबर नेलं केवळ म्हणूनच त्याचा जीव वाचला. इकडे आता भीमसेन सक्सेना जो स्वतः मुघलांकडून या युद्धात हजर होता तो म्हणतो की मराठ्यांनी आता त्यांच्या पद्धतीने म्हणजे बारगीगीरी करून हल्ला करायला सुरुवात केली, म्हणजे एकाच वेळी मराठे मुघलांच्या भोवती चहूकडून घिरट्या घालून त्यांच्यावर हल्ले करायला लागले. यात दाऊदखानाचा अजून एक सरदार मीर अब्दुल्माबुद आणि त्याच्या मुलांवर मराठ्यांनी हल्ला केला यात स्वतः अब्दुल्माबुद जखमी झाला तर त्याचा एक मुलगा मारला गेला. मुघलांच्या सैन्याची अपरिमित हानी झाली. मुघलांचे अनेक सरदार आणि सैनिक मारले गेले. मराठ्यांनी मुघलांच्या सरदारांचे झेंडे, शस्त्र, हत्ती आणि घोडे त्यांच्याकडून हिसकावून घेतले. दाऊदखान आणि त्याचे सोबती सुरतेची लक्ष्मी शिवरायांकडून हिसकवायला निघाले होते वर अजून स्वतःचे घोडे, शस्त्र गमावून बसले. २ प्रहर म्हणजे जवळ जवळ ६ तास ही लढाई झाली. मराठे विजयी होऊन इथून पुढे सुरतेची, मुल्हेरची आणि कंचन-मंचनला मिळालेली सगळी लूट घेऊन यशस्वीपणे कोकणात उतरले. या लढाईला वणी-दिंडोरी किंवा कंचन-मंचनची लढाई म्हणतात.

या लढाईचा मराठ्यांवर खूप सकारात्मक परिणाम झाला. मराठी सैनिकांमध्ये कधीच आत्मविश्वासाची कमतरता नव्हती पण या लढाईमुळे त्यांचा आत्मविश्वास अधिकच दुणावला. मुघलांच्या भल्या मोठ्या सैन्याला आपण समोरासमोर झालेल्या युद्धात सहज हरवू शकतो याची जाणीव मराठ्यांना झाली. यापूर्वी उंबरखिंडीत शिवरायांनी मुघलांच्या अवाढव्य सेनेला त्यांच्यासमोर नाक घासायला लावलं होतं पण आज मोकळ्या मैदानातल्या या लढाईत, सह्याद्री, रात्रीचा अंधार, बेसावध शत्रू अश्या कोणत्याच मदतीशिवाय मराठ्यांनी मुघलांना चारी मुंड्या चीत केलं. मराठे गनिमी काव्यात तर निष्णात होतेच पण खुल्या मैदानातल्या लढाईतसुद्धा ते शत्रूला कसं नामोहरम करू शकतात ते आज त्यांनी मुघलांना दाखवून दिल. धन्यवाद.

संदर्भ:
१. सभासद बखर
२. तारिखे दिलकुशा- भीमसेन सक्सेना
३. शिवभारत
४. English Factory Records on Shivaji

Suyog Shembekar

Leave a Comment