शिवछत्रपतींचा अलौकिक “दक्षिण दिग्विजय”!!

शिवछत्रपतींचा अलौकिक

शिवछत्रपतींचा अलौकिक “दक्षिण दिग्विजय”!!

पुस्तक लेखमाला क्रमांक २१.

जैष्ठ शुद्ध त्रयोदशी ला म्हणजेच ६ जून १६७४ ला किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांचा राजाभिषेक झाहला. या मराठी मातीने पाहिलेले एक दैदिप्यमान स्वप्न पूर्ण झाले. राजे सिंहासनारूढ झाले.”या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही, सामान्य जाली नाही!!”(दक्षिण दिग्विजय)

महाराष्ट्र राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना या राजाभिषेकानंतर आपल्या या नवनिर्मित सार्वभौम मराठी राज्याच्या संरक्षणाची उत्तरेकडील बलाढ्य अश्या मोगली सतेपासून व्यवस्था करावी, असे मनोमन वाटू लागले.तसे छत्रपती दूरदृष्टी अंमलात आणणारे होतेच.त्यानुसार त्यांनी नियोजन करून आखली “दक्षिण दिग्विजय”  मोहीम!

छत्रपती शिवरायांची दक्षिण दिग्विजय मोहीम ही त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्वाची, सर्वात मोठी आणि  यशस्वी अशी मोहीम होती.सभासद बखर मध्ये या मोहिमेचा स्पष्ट उल्लेख आहे.तो म्हणतो,”कर्नाटक देश साधावा म्हणोन चंदिस वेढा घातला” आणि यातूनच पुढे “तुंगभद्रा तहद कावेरी” पर्यंत मुलुख स्वराज्यात आणावा हाच या मोहिमेचा उद्देश असावा.

तसेच छत्रपती शिवरायांनी या मोहिमेच्या आधी व्यंकोजीराजे यांना लिहलेले पत्र हेच स्पष्ट करतात. दक्षिण दिग्विजय मोहीम ही छत्रपतींनी अतिशय नियोजनबद्ध आणि मुत्सद्दीपणाने आखलेली होती.

छत्रपती शिवरायांचे दक्षिणेच्या  राजकारणाकडे बारीक लक्ष होतेच. याच सगळ्या गोष्टींचा विचार करत आपल्या स्वराज्याच्या सीमा वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय योजनाबद्ध आणि सुनियोजित पद्धतीने दक्षिण दिग्विजय मोहिमेची आखणी केलेली आपणास दिसते.

कमी कालावधीत सर्वात जास्त किल्ले आणि क्षेत्र जिंकून घेत स्वराज्याचा विस्तार करणाऱ्या दक्षिण दिग्विजय मोहीमेसाठी दिनांक ६ ऑक्टोबर १६७६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडावरून प्रस्थान केले आणि ८ एप्रिल १६७८ रोजी दक्षिण दिग्विजय मोहीम यशस्वी करून छत्रपती शिवराय स्वराज्यात किल्ले पन्हाळ्यावर पोहचले. दक्षिण दिग्विजय मोहीम म्हणजे सध्याचा कर्नाटक व तामिळनाडू चा बराचसा भाग शिवरायांनी जिंकून घेतला. ही मोहीम तब्बल दीड वर्षे चालू होती म्हणजेच छत्रपती शिवराय या काळात स्वराज्याबाहेर दक्षिणेत होते. दक्खन काबीज केल्याने या मोहिमेची दखल स्वतः इंग्रजांनी सुद्धा घेतली होती. ईस्ट इंडिया कंपनी चे तसे पत्रच उपलब्ध आहे.(आपल्या माहितीसाठी ते पत्र खालील छायाचित्र मध्ये दिले आहे).

“या दक्षिण दिग्विजय मोहिमेमुळे आपल्या स्वराज्यात असलेल्या कैकपटीने जास्त मुलुख छत्रपतींनी अत्यंत कुशलतेने जिंकला.”  जिंजी इथे स्वराज्याची “दक्षिणेची राजधानी” उभारली. आताच्या घडीला आपल्या मराठी देशी आहेत त्यापेक्षा जास्त किल्ले शिवरायांनी या मोहिमेत स्वराज्यात आणले.छत्रपतींनी बेळगाव पासून ते तिरुमलवाडीपर्यंत १,३१,००० चौ.किमी इतके मोठे राज्य या मोहिमेत स्वराज्यात आणले. त्यावेळेला महाराष्ट्र मध्ये त्यांच्याकडे फक्त ६६,००० चौ. किमी इतकेच राज्य होते.या सर्व विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की छत्रपतींनी अतिशय मोठया प्रदेशावर आपले शासन स्थापित केले होते.(खालील छायाचित्रात आपणास १६७४ आणि १६८० चे स्वराज्य याचे नकाशे दिलेले आहेत.यावरून आपणाला या सर्वांची कल्पना येईलच).

विजयनगर च्या हिंदू साम्राज्यपतनां नंतर खऱ्या अर्थाने तब्बल ३०० वर्षेनी “हिंदवी साम्राज्य” स्थापन जाहले.याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रातील राज्यांपेक्षा दुप्पट मोठे राज्य दक्षिणेत स्थापले.छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर खासा मुघल सम्राट औरंगजेब हे स्वराज्य बुडीण्यासाठी दक्षिणेत उतरला. पण शिवरायांनी दूरदृष्टीने स्थापित केलेल्या या दक्षिण साम्राज्यानचा छत्रपती राजाराम महाराज यांनी आश्रय घेऊन तब्बल ७  वर्षे मुघलांशी झगडा केला. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि राजधानी पडल्यावर सुद्धा पापी औरंग्याला काही मराठी राज्य बुडविण्याचे जमले नाहीच!!!

तसे पहावयास गेले तर अजूनही संपूर्ण दक्षिण दिग्विजय यावर प्रचंड अभ्यास आणि लिहिण्यासारखे आहे. अजूनही बरयाच गोष्टी उजेडात यायच्या आहेत. पण आताच्या काळात या मोहिमेवर अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन करून लिहिलेली दोन संदर्भ ग्रंथ आपल्याला उपलब्ध आहेत. भारतीय लष्करी सेवेत काम करणाऱ्या निवृत्त मेजर मुकुंद जोशी यांनी ते दोन्ही ग्रंथ लिहिलेले आहेत.

पहिला महत्वाचा ग्रंथ म्हणजे “दक्षिण दिग्विजय”. यात त्यांनी दक्षिणेकडे असलेल्या राजकीय आणि साम्राज्य विस्तारास अनुकूल इतिहासाची मांडणी केलेली आहे.तसेच नकाशे, छत्रपतींनी आखलेले डावपेच यांची विस्तृत माहिती दिलेली आहे.

तसेच “शिवाजीचे दक्षिणेतील साम्राज्य” या दुसऱ्या पुस्तकात , त्यांनी या दक्षिण दिग्विजयाने झालेला स्वराज्य विस्तार, शासन, अधिकारी नेमणुका यांची सविस्तर माहिती दिलेली आहे.

पुढील लेखमालेत आपण शिवचरित्राच्या संबंधित असलेल्या महत्वाच्या साधनांचा धांडोळा घेणार आहोत.आपणही योग्य संदर्भ ग्रंथ वाचन करीत राहावे आणि योग्य माहितीचे आकलन करीत राहावे हाच या लेखामागील एकमेव उद्देश!!

बहुत काय लिहिणे?अगत्य असू द्यावे.

किरण शेलार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here