महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,83,374

शितलामाता | आमची ओळख आम्हाला द्या

By Discover Maharashtra Views: 1239 3 Min Read

शितलामाता | आमची ओळख आम्हाला द्या –

मंदिराच्या मंडोवरावर सुशोभना करिता अनेक मूर्ती शिल्पांची निर्मिती केली गेल्याचे दिसून येते. हीमूर्ती शिल्प आपल्या अंगीभूत गुणांचे प्रदर्शन करणे भक्तगणांच्या श्रद्धेचा विषय होऊन बसलेली आहेत. येणाऱ्या भाविकास त्या मूर्ती शिल्पांचा गहन अर्थ व ते शिल्प करण्यामागची भूमिका ज्ञात नसल्याने त्यांचे विशेष महत्त्व वाटत नाही. मूर्तीशिल्पांचा अभ्यास मनाला आनंददायी वाटतो आणि त्याहीपेक्षा मूर्तीची खरी ओळख पटणे अल्हाददायक वाटते. मंदिराच्या अंगाखांद्यावर असणारे हे मूर्तिशिल्प बोलकी असतात. पाहणाऱ्याला ते तेव्हाच बोलके वाटते, जेंव्हा पाहणाऱ्यांची नजर प्रगल्भ असते.(शितलामाता)

आजवर मंदिराच्या मंडोवरावर अनेक दुर्मिळ प्रकारची मूर्तिशिल्प आपण पाहिली आहेत. आज आपण मुखेडच्या शीतलादेवी माहिती घेणार आहोत .नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात दशरथेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. मंदिर चालुक्यकालीन आहे. मंदिर अतिशय देखणे असून मंडोवरावर विविध देवदेवतांच्या शिल्पांचे अंक केलेले दिसून येते. याच शिल्पांच्या मांदियाळीत आपणास आज पर्यंत ज्येष्ठ किंवा लक्ष्मी म्हणून प्रसिद्ध असणारी पण मूळची शितलामाता दिसून येते. आज पर्यंत जिला अलक्ष्मी म्हणूनच संबोधले तिला अचानक शितलामाता म्हणणे थोडे कठीण आहे. पण सत्य शेवटी सत्य असते.

आमचे मित्र मयुरेश खडके यांनी समूहावर ही मूर्ती चर्चेसाठी खुली केली. पूर्वापार मतानुसार हिला सर्वांनी लक्ष्मी संबोधले. पण आमचे मित्र पत्रकार गजेंद्र बिराजदार औरंगाबाद यांनी तिला शितला संबोधले आणि त्यानुसार शोध प्रारंभ झाला.  मूर्ती शास्त्राच्या दृष्टीने ती शितलाच असल्याचे सिद्ध झाले.

शितला देवीची मंडोवरावर स्थित असणारी ही मूर्ती अतिशय देखणी व लोभस आहे. तिची देहयष्टी आणि हातांची रचना पाहता क्षणी नजरेत भरते. शितलादेवी चतुर्भुज असून प्रदक्षणा क्रमाने डाव्या खालच्या हातात सुरा, डाव्या वरच्या हातात झाडू. उजव्या वरच्या हातात सूप तर उजव्या खालच्या हातात कपाला धारण केलेले आहे. त्रिभंग आवस्थेत उभी असलेली ही देवी डाव्या पायाच्या गुडघ्यात किंचितसे वाकलेली असून डाव्या  पायाचा पंजा जमिनीवर टेकवून शरीराचा संपूर्ण भार तिने उजव्या पायावर तोलून धरलेला आहे. त्यामुळे तिची मानही उजवीकडे किंचितशी झुकलेली आहे. सुरा, झाडू, सूप ही आयुधे धारण करण्याची पद्धत अलौकिकच वाटते. डोक्यावरील मुकुट, कानातील कुंडले, ग्रीवा. कंकण, केयुर ,नरमुंड माला इत्यादी अलंकार तिने परिधान केलेले आहेत.

उंच धरलेल्या हातात धारण केलेला झाडू एखाद्या शस्त्रासारखा वाटतो. देवीच्या उजवीकडे तिचे वाहन गर्दभ अर्थात गाढव अंकित केलेले आहे. पायाच्या दोन्ही बाजूस व पादपिठावर देवीचे सेवक म्हणजे गण अंकित केलेले आहेत. उजव्या खालच्या हाती धारण केलेल्या कपाळाला स्पर्श करणारा गण अद्भुतच आहे. महिरपाप्रमाणे डोक्यावर  असणारी नक्षी मूळ शिल्पास अधिकच उठाव देणारी आहे. देवी जरी पूर्णतः असली तरी त्यात कुठेही विभत्स वाटत नाही. नावाप्रमाणेच मूर्तीच्या चेहर्‍यावर शांत भाव आहे .देवीचे जरी हे उग्र रूप असले तरी भक्तांना रोगमुक्त भयमुक्त करणारी शीतलता प्रदान करणारी ही शितलाच आहे.

या मूर्तीचे छायाचित्र डाॅ.माधवी महाके यांनी उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे आभार.विषयाच्या मूळापर्यंत पोहचविण्यासाठि ज्यांनी हि शितलाच आहे असे  ठासून सांगितले असे गजेंद्र बिराजदार सर यांचेहि आभार

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

Leave a comment