मराठी शाहीर राम जोशी

मराठी शाहीर राम जोशी

मराठी शाहीर राम जोशी –

सुप्रसिद्ध मराठी शाहीर राम जोशी यांचा जन्म सोलापूर येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे जेष्ठं बंधू मृदल  जोशी नावाजलेले संस्कृत पंडित आणि पुराणिक होते.त्यामुळे त्यांच्या घरात संस्कृत भाषेच्या अभ्यासाचे वातावरण होते.त्यांचे पूर्ण नाव राम जगन्नाथ जोशी. लहाणपणापासूनच राम जोशींवर आध्यात्मिक संस्कार होते .तरीही  त्यांना तमाशाचा छंद जडला होता.आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्यांनी भजन कीर्तनामध्ये नावलौकिक मिळवला.

कीर्तनशैली आणि तमाशाशैली या दोन्हीही प्रकारात त्यांचा  हातखंडा होता.अनेक प्रकारच्या  रचना करण्यात ते पारंगत होते. सामाजिक भान झुगारून त्यांनी अनेक अध्यात्मिक, कुट, ऐतिहासिक पोवाडे, श्रृंगारिक रचना, भेदीक कवणे रचलेली आढळतात.वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांचे पालन-पोषण थोरले बंधू मृद्गल जोशी याने केले. थोरल्या भावाची मनोमन इच्छा होती की, राम जोशी यांनी किर्तनातून समाज जागृतीचे कार्य करावे आणि अध्यात्मातून समाजाला प्रबोधनाचे बोध दयावे; परंतु भावाच्या मनासारखे जोशीयांना वागता आले नाही. त्यांनी दलित, अस्पृश्य समाजातील अनेक कलावंतांना एकत्र करून तमाशा उभा केला. त्यांनी तमाशाशी केलेली जवळीक थोरल्या भावास पटली नाही. रामजोशी यांना थोरल्या भावाने  घराबाहेर काढले.

धोंडी शाहीर हा तमाशा कलावंत स्वतःच रचना करायचा, चाली लावायचा आणि आपल्या तमाशाच्या फडातून सादर करायचा. तो अतिशय प्रतिभासंपन्न तमाशा कलावंत होता, त्याला गोड गळयाची साथ लाभलेली होती. धोंडी शाहीर यांचा तमाशा पाहून रामजोशी प्रभावित झाले. त्यांनी धोंडी शाहीर यांचे शिष्यत्व पत्करून तमाशात प्रवेश केला. राम जोशी यांनी जी पहिली लावणी रचली ती धोंडी शाहीर यांनीच सोलापूर येथे गायिली. धोंडी शाहीर यांनी आपल्या तमाशासाठी कवणे रचण्याची जबाबदारी राम जोशी यांच्यावर सोपवली .म्हणून तमाशा परंपरेतील धोंडी शाहीर हाच आपला गुरू आहे असे मानत. नंतरच्या काळात राम जोशीयांनी पंढरपूर येथील बाबा पाध्ये यांचे शिष्यत्व पत्करले. त्यांच्याकडून पुराणाचे, शास्त्राचे सखोल ज्ञान प्राप्त केले. त्यातील पौराणिक कथांमधून स्वतःची कीर्तनशैली विकसित केली.राम जोशी यांचे घराणे शास्त्री पंडीताचे; परंतु कीर्तनात त्यांना पाहीजे तसा नावलौकीक मिळवता आला नाही, तमाशात प्रवेश करून पुढे  त्यांना नावलौकिक मिळाला.

राम जोशी यांच्या विविध विषयांवर सुमारे १०० ते १२५ लावण्या उपलब्ध आहेत. शृंगारिक लावण्या,कृष्णलीलांवरील लावण्या,देवतावर्णनपर लावण्या, नित्यउपदेशपर,वैराग्यपर कवने,लौकिक विषयाच्या लावण्या, उद्देशपर लावण्या इ. प्रकारात राम जोशी यांनी लेखन केले.मदालसा चंपू हा संस्कृत ग्रंथ आणि रामाष्टक हे स्त्रोतही त्यांनी रचले आहे. त्यांच्या रचनांमधील अविष्कार आणि शैली प्रभावशाली आणि रसिकांना आकृष्ट करणारी आहे. त्यांचा संस्कृतचा दांडगा अभ्यास होता. त्यांच्या कवणात आपणाला विरह,उत्कटता आणि अध्यात्म आढळते. सामाजिक संकेत झुगारून काही कवने अश्लीलतेकडे झुकलेल्याही दिसतात. गोपीका आणि कृष्ण  यांच्यावरील रचनांमधून त्यांनी विप्रलंभ श्रृंगार खुलवला. विप्रलंभ श्रृंगार म्हणजेच विरहाने व्याकुळ झालेल्या स्त्रीने केलेला श्रृंगार होय. रामजोशीने श्रृंगाराबरोबरच ऐतिहासिक पोवाडयाच्याही रचना केलेल्या दिसतात. त्यांच्या  छक्कडरूपी पोवाडयात स्थळा काळाचा महिमा सांगणारे त्या काळचे पुण्याचे असलेले वैभव रेखाटले आहे. अध्यात्म, श्रृंगार आणि विद्वतेच्या जोरावर रामजोशी यांना पेशव्यांच्या दरबारात राजाश्रय मिळाला होता. पेशवाई थाटातील अतिशय प्रतिभासंपन्न शाहीरांमध्ये त्यांची गणना केली जाते.

पुढे राम जोशीयांनी कीर्तने करण्यास सुरुवात केली. बारामतीच्या मुक्कामात बाबुजी नायकांच्या घरी झालेल्या कीर्तनप्रसंगी त्यांची कविवर्य मोरोपंत यांच्याशी भेट झाली. प्रथम भेटीतच मोरोपंतांची त्यांच्यावर मर्जी बसली. जोशीयांच्या कवनांवर मोरोपंत एवढे खूष असत, की त्यांना ते पत्रांतून ‘कविप्रवर’ म्हणून संबोधत.

राम जोशी यांनी महाराष्ट्रभर कीर्तने केली. त्यांनी पंढरपूरचे वर्णन, तुळजापूरचे वर्णन, गिरीच्या व्यंकटेशाचे वर्णन इत्यादी लावण्या त्या त्या प्रवासात रचल्या. जोशीयांना शेवटी काशी यात्रा करण्याची इच्छा झाली; परंतु त्यांच्या उधळ्या वृतीमुळे यात्रेसाठी लागणारे धन त्यांच्याकडे नव्हते. म्हणून त्यांची काशी यात्रेची ईच्छा अपुरी राहिली.

राम जोशी हे मुख्यत्वे शृंगार कवी म्हणून प्रसिद्ध होते.

सुंदरा मनामध्ये भरली l जरा नाही ठरली l

हवेलित शिरलि l मोत्याचा भांग l रे गड्या हौस नाहि पुरलिl म्हणोनी विरलि l

पुन्हा नाहिं फिरलि l कुणाची सांग ll ध्रु ll

जशी कळी सोनचाफ्याची l न पडु पाप्याची l

दृष्टि, सोप्याचीl नसल ती नार l

अति नाजुक तनु देखणी l गुणाची खणी l

उभी नवखणीं l चढुन सुकुमार ll

जशि मन्मथरति धाकटी l सिंहसम कटी l उभी एकटी l गळयामध्ये हार l

आंगि तारुण्याचा भर ज्वानिचा कहर l

मारिते लहर मदनतल्वार ll

पायिं पैंजण झुबकेदार l कुणाची नार कोण सरदार l हिचा भरतार l

अध्यात्मपर लावणीमध्ये ते भक्ती व ज्ञान यांचा पुरस्का करतात.

पुढे ६ नोव्हेंबर रोजी राम जोशी यांचे निधन झाले.

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here