महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,76,413

आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे

By Discover Maharashtra Views: 1696 3 Min Read

आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे –

आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाला सदैव वंदनीय असणारी दोन व्यक्तिमत्वे. आज बाळासाहेब ठाकरेंची जयंती. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे आचार्य अत्रेंचे मित्र होते. आचार्य अत्रेंच्या अखेरच्या काळात अत्रे – ठाकरे वाद बराच गाजला. आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’ मधून तर बाळासाहेब ठाकरेंच्या ‘मार्मिक’ मधून एकमेकांवर वैयक्तिक टीका, निंदानालस्ती, शेलकी विशेषणे यांना ऊत आला. लेखणी आणि व्यंगचित्रे अशी धारदार हत्यारे होती. हा वाद तसा वैयक्तिकच होता, पण आचार्य अत्रे आणि बाळासाहेब – प्रबोधनकार ठाकरे अशा मोठ्या व्यक्तींमध्ये झाल्याने त्याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. तो काळ आचार्य अत्रेंच्या अखेराचा तर बाळासाहेबांच्या उदयाचा. कसातरी या वादावर पडदा पडला. बाळासाहेब ठाकरे या वादाविषयी बोलताना खंत व्यक्त करायचे. हा वाद दुर्दैवी होता, व्हायला नको होता असे ठाकरे कुटुंबीय नेहमी म्हणत.

चारेक वर्षांपूर्वी या अत्रे-ठाकरे वादाला प्रसारमाध्यमांतून पुन्हा एकदा उजाळा मिळाला होता, तेव्हाचे काही व्हिडीओ युट्युबवर पाहायला मिळतील. आज बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी त्या वादाविषयी खोलात सांगणे उचित होणार नाही. आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे, या दोघांत हा तात्पुरता वाद झाला असला आणि दोघांत थोडेफार भेद असले तरी, या दोघांनी मराठी जनांसाठी जेे केले आणि महाराष्ट्राची जी सेवा केली त्याबद्दल मराठी माणसे सदैव त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण आणि जयजयकार करत राहतील.

बाळासाहेब ठाकरे आचार्य अत्रेंविषयी म्हणतात,

“आचार्य अत्रे म्हणजे महाराष्ट्राचा पुरुषार्थ होता. अत्रे म्हणजे मराठी अस्मितेचे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे बलदंड प्रतीक होते. अत्रे यांचे शब्द म्हणजे बॉम्बस्फोट आणि तोफखाना होता. अत्रे यांची लेखणी आणि वाणी यात श्रेष्ठ कोण, हे सांगणे कठीण आहे. दोन्ही शस्त्रे त्यांनी त्यांना हवी तशी वापरली. अत्रे हे कलंदर होते. अष्टपैलू होते. ज्या क्षेत्रात ते गेले तेथे ते यशस्वी झाले. महाराष्ट्र हा त्यांचा श्वास होता. हशा आणि टाळ्यांचे ते बादशहा होते. अतिशयोक्ती ही त्यांच्या वागण्या-बोलण्यात सर्वात होती. गेल्या दहा हजार वर्षांत असे घडले नाही हे त्यांनीच म्हणावे. पुन्हा त्याला हजरजबाबीपणाची जोड होती. आचार्य अत्रे ही एक अजब – व्यक्ती आणि वल्ली होती. ते एक अजब रसायन होते. अशी माणसे काही शतकातून जन्माला येतात आणि आपला कालखंड निर्माण करून जातात.

अत्रे यांच्या कालखंडाचे ठसे कुणालाच पुसता येणार नाही. अत्रे व ठाकरे कुटुंबाचा घरोबा होता; पण शेवटच्या काळात दोघांत झालेला वाद दुर्दैवीच होता. आचार्य अत्रे यांनी ‘जोड्यास जोडा’ ही भाषा वापरली नसती तर ‘संयुक्त महाराष्ट्र झाला नसता’. बाबूरावांच्या (अत्र्यांच्या) नवयुग साप्ताहिकात मी व्यंगचित्र काढीत असावं. अत्र्यांची भाषाशैली पुन्हा वाचावयास मिळणार नाही. अत्रे ठाकरे वाद कारण नसताना निघाला, त्याचे भयंकर दुःख होते. खरोखरच असा पुरुष पुन्हा होणे नाही. बाळबोध बोलणे व बाळबोध लिहिणे हे गुण मी अत्र्यांकडून शिकलो.”

बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या ‘मार्मिक’ या पहिल्या मराठी व्यंगचित्र साप्ताहिकाची सुरुवात आचार्य अत्रे यांच्या जन्मदिवसाचे निमित्त साधून १३ ऑगस्टला केली होती. मार्मिकच्या पहिल्या अंकात मावळ्याच्या वेषात हातात लेखणी धरून घोड्यावर बसलेले आचार्य अत्रेंचे चित्र होते व त्याला शीर्षक होते – ‘मराठी शिलेदाराला मानाचा मुजरा !’  बाळासाहेबांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.

प्रणव कुलकर्णी.

Leave a comment