महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,68,586

थोर इतिहास संशोधक कृष्णाजी वासुदेव पुरंदरे

By Discover Maharashtra Views: 1356 8 Min Read

थोर इतिहास संशोधक कृष्णाजी वासुदेव पुरंदरे –

देदीप्यमान इतिहास लाभलेल्या महाराष्ट्रास त्या इतिहासाचे संशोधन, अभ्यास, लेखन करणाऱ्या इतिहासकारांचीही थोर परंपरा लाभली आहे. त्यांच्या अपार परिश्रमानेच इतिहासाविषयी जागृती झाली. मात्र काही वंदनीय अपवाद सोडले तर आज अनेक थोर इतिहास संशोधक विस्मरणात गेले आहेत. कै. कृष्णाजी वासुदेव पुरंदरे हे त्यापैकीच एक. आज त्यांचा स्मृतिदिन. यानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण कृतज्ञतापूर्वक व्हावे यासाठी हा लेखनप्रपंच. लेख जरा विस्तृत आहे तरी पूर्ण वाचावा हे आवाहन.(Krishnaji Purandare)

सासवडचे पुरंदरे घराणे हे मोठे ऐतिहासिक. साक्षात शिवछत्रपतिंपासून मराठेशाहीच्या अखेरपर्यंत या घराण्याने स्वराज्याची सेवा केली. पेशवेकाळात ह्या घराण्याने चमकदार कामगिरी केली. मराठ्यांच्या इतिहासात असे योगदान देणाऱ्या या पुरंदरे घराण्यातल्या विसाव्या शतकातील दोन वंशजांनी इतिहास संशोधन, लेखन व कथन यांद्वारे मराठ्यांच्या इतिहासाची जागृती केली. ते दोन जण म्हणजे इतिहास संशोधक कृष्णाजी वासुदेव पुरंदरे व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. कृ.वा.पुरंदरे हे बाबासाहेब पुरंदरेंचे चुलते.

कृष्णाजी वासुदेव पुरंदरेंचे चरित्र व कर्तृत्व अल्पपरिचित आहे. त्यांना ‘बापू’ म्हणत. त्यांचा जन्म १८८८ सालचा. त्यांचं शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालं. आर्थिक समस्येमुळे त्यांना पुढे शिकता नाही आलं. त्यांच्या लहानपणीच त्यांचे वडील वारल्यामुळे त्यांचे बालपण हलाखीत गेलं. भावंडांत ते सर्वात मोठे. त्यांची आई रुक्मिणीबाईंनी स्वाभिमानाने त्यांना वाढवलं. मॅट्रिक पास झाल्यानंतर बापूसाहेब नोकरीसाठी पुण्याला आले. तिथे सरकारी नोकरी मिळवून ते आई व धाकट्या भावंडांचे पालन करू लागले. पुण्याला आल्यानंतर बापूंच्या इतिहासप्रेमाला खतपाणी मिळाले. एका वर्षी ते शिवजयंतीला लोकमान्य टिळकांच्या भाषणाला गेले असतां दुसऱ्या दिवशी त्यांना ऑफिसात साहेबांचे बोलावणे आले. सरकारी नोकरांना टिळकांच्या भाषणाला जायची मनाई होती. तरीही बापू गेल्यामुळे ऑफिसातील साहेबाने त्यांना बोलावून तो शिवाजीमहाराजांबद्दल आणि टिळकांबद्दल अर्वाच्च बोलू लागला. तेव्हा क्षणार्धात कृष्णाजीबापूंनी त्या साहेबाचे मुस्काट फोडले. या कृत्याबद्दल बापूंना चार महिने सक्तमजुरीची शिक्षा झाली.

नोकरी गेल्यामुळे तुरुंगातून सुटून आल्यानंतर बापूंनी एका छापखान्यात कारकुनी करून भावंडांची लग्न करून देऊन त्यांना चांगल्या मार्गी लावून दिलं. अन् मग बापूसाहेब इतिहास संशोधनाकडे वळले. संशोधनासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी त्यांनी शिक्षकी पेशा पत्कारला. पुढे बाबासाहेब पुरंदरेही त्यांचे शालेय विद्यार्थी होते. इ.स.१९०६ पासून १९२२ पर्यंत ते सासवडच्या म्युनिसिपालटीच्या मराठी शाळेत शिक्षक होते. या काळात त्यांनी आपल्या घराण्याच्या व इतर शाखांच्या दप्तरांतील ऐतिहासिक कागदपत्रे तपासली. वास्तविक हे काम मोठे किचकट होते. कृ.वा.पुरंदरे म्हटले की अनेक इतिहास अभ्यासकांच्या डोळ्यासमोर पुरंदरे दप्तराचे नाव येते. पुरंदरे दप्तराचे तीन खंड संपादित करून कृष्णाजीबापूंनी मराठ्यांच्या इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात फार मोलाची भर घातली आहे.

पुरंदरे दप्तराचा पहिला व तिसरा खंड तर इतिहास अभ्यासकांसाठी फार उपयुक्त आहे. पुरंदरे दप्तराचा पहिला खंड पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाने १९२९ साली प्रसिद्ध केला. बापूंचा मंडळाशी प्रत्यक्ष संबंध १९१९ मध्ये आला. त्यांच्या सहयोगाने कृष्णाजीबापूंनी पुरंदरे दप्तराचे काम पूर्णत्वास नेले. पुरंदरे दप्तराच्या तिसऱ्या खंडाच्या निवेदनात भा.इ.सं.मंडळाचे तत्कालीन चिटणीस द.वा.पोतदार व गं.वा.मुजूमदार म्हणतात, “राजश्री पुरंदरे यांनी इतिहास संशोधन व इतिहास विवेचन या कामी चालवलेले प्रयत्न किती महत्त्वाचे आणि उपयुक्त आहेत याची भरपूर साक्ष त्यांचे पुरंदरे दप्तर खंडच करीत आहेत.”

पुरंदरे दप्तराच्या आधी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या शिवचरित्र साहित्य खंड १ व खंड ७ चे संपादनकार्यही कृष्णाजीबापूंनी केले. शिवचरित्र साहित्य खंड पहिला १९२६ सालीह प्रकाशित झाला. शिवचरित्र साहित्य खंड ७ मध्ये बापूसाहेबांनी शिवकालाशी व शिवपूर्वकालाशी निगडित अशी उपयुक्त माहिती उद्धृत केली आहे. त्याचबरोबर मुसलमानी अंमलातील, त्यापूर्वीची व शिवकाळातील वतनदारी व्यवस्था, शिवाजीमहाराजांची राज्यव्यवस्था, मुलकी तसेच लष्करी व्यवस्था, शिवकालीन बाजारपेठा, जकात व्यवस्था, खजिना, आरमार इत्यादी गोष्टींची ससंदर्भ मांडणी केली आहे. या खंडाच्या प्रस्तावनेत बापूसाहेब म्हणतात, “वास्तविक हा विषय म्हणजे एका तब्बल ग्रंथाचा, आणि तो संकुचित क्षेत्रात प्रतिपादणे म्हणजे काहीतरीच हे आम्ही जाणतो. फक्त आता संशोधनाबरोबर संकलनही जोराने चालू झाले पाहिजे. या आमच्या अंतःकरणातील तळमळीमुळेच असल्या बिकट विषयास हात घालण्याचे धाडस केले.” बापूसाहेबांचे असे शिवकालीन तसेच पेशवेकालीन इतिहासाच्या संशोधनात योगदान आहे.

कृष्णाजीबापूंच्या चरित्राप्रमाणेच त्यांचे इतर लेखनकार्यही अल्पपरिचित आहे. ‘शिवचरित्र साहित्य’ खंड १, खंड ७ आणि पुरंदरे दप्तराच्या तीन खंडांच्या संपादनाबरोबरच त्यांनी ‘चिमणाजी बल्लाळ उर्फ चिमाजी अप्पा’, ‘किल्ले पुरंदर’, ‘शंकराजी नारायण पंतसचिव’ अशी महत्त्वाच्या विषयांवरची अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके लिहिली. शं.ना.जोशींबरोबर ‘बापू गोखले पत्रव्यवहार’ प्रसिद्ध केला. त्यांची पुस्तकं म्हणजे संदर्भपूर्ण माहितीचा खजिनाच. बापूंची ही पुस्तके पुनर्प्रकाशित न झाल्यामुळे अत्यंत दुर्मिळ आहेत. कित्येकांना तर यांची नावंही माहीत नाही. ही पुस्तके उपलब्ध झाल्यास इतिहास अभ्यासकांना फार मदत होईल.

कृष्णाजीबापू मोडीचे उत्तम जाणकार होते. त्यांनी शिवचरित्र साहित्याच्या, पुरंदरे दप्तराच्या खंडांतून शेकडो पत्रे-करीने-शकावल्या प्रसिद्ध केल्यात. ऐतिहासिक कागदपत्रे मिळविण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. सासवडच्या पुरंदऱ्यांच्या सरकारवाड्यातील दफ्तरखान्यातील ऐतिहासिक कागदाच्या ढिगाऱ्यात कंदील घेऊन ते रात्रंरात्र बसत. हे सगळं माहित झाल्यावर इतिहास संशोधक बापूंच्या व्यक्तिमत्त्वाविषयी एक विशिष्ट प्रतिमा तयार होते. परंतु बापूंचे व्यक्तिमत्त्व त्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध होते. त्यांचा स्वभाव मोठा खुसखुशीत होता. इतिहासाबरोबरच वर्तमानाचेही ज्ञान, समाजभान त्यांना होते. बाजारगप्पांत ते उस्ताद होते. त्यांना कुस्त्यांचा, तमाशाचा भारी नाद होता. ऐतिहासिक कागदपत्रांतील भटकंतीबरोबरच गडकिल्ल्यांची भटकंतीही ते करीत. त्यांच्या दुर्गभ्रमंतीबद्दल त्यांचे पुतणे बाबासाहेब पुरंदरे म्हणतात, “गुळाच्या ढेपेवर चढलेल्या मुंगळ्याला जसा आनंद होत असेल तसा आनंद ह्या गडकिल्ल्यांवर बापूंना होत होता.” कृष्णाजीबापू चालता बोलता इतिहास होते.

मल्हारगडपासून पुरंदरगडपर्यंत आणि कऱ्हेपासून निरेपर्यंत अवघ्या कऱ्हेपठारची त्यांना खडानखडा माहिती तोंडपाठ होती. ते सनातनीही होते आणि पुरोगामीही. बापूंचा स्वभाव म्हणजे एक विलक्षण मिश्रण होते. त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्यांबद्दल, व्यक्तिमत्त्वाबद्दल बाबासाहेब पुरंदरेंनी आपल्या ‘पुरंदऱ्यांचा सरकारवाडा’ पुस्तकातील ‘बापू’ या कथेत फार सुंदर ललितलेखन केलेले आहे. त्यात कृष्णाजीबापूंच्या अनेक आठवणींना बाबासाहेबांनी उजाळा दिला आहे. एक प्रसंग आहे. एकदा पुण्याचे एक प्राचार्य विद्यार्थ्यांना घेऊन पुरंदरच्या सहलीला आले असता सासवडच्या पुरंदरे वाड्यावर थांबले. तेव्हा कृष्णाजीबापूंबरोबर इतिहासावर चर्चा करताना त्या प्राचार्यांनी शिवाजीमहाराजांच्या साक्षरतेवरून बापूंशी वाद घालायला सुरुवात केली. प्राचार्यांचे म्हणणे होते की शिवरायांचं हस्ताक्षर आज उपलब्ध नसल्यामुळे ते साक्षर नव्हते वगैरे. तेव्हा बापूसाहेबांनी शिवाजीमहाराजांच्या साक्षरतेला पुष्टी देणारे काही संदर्भ त्यांना सांगितले. तरीही ते प्राचार्य मानायलाच तयार नव्हते आपल्या मतावर ठाम होते. प्राचार्य खूपच वाद घालू लागल्यावर कृष्णाजीबापू म्हणाले, “वा! चांगला तर्कशास्त्र आहे! औरंगजेबाचीही अजून कुठं चड्डी सापडलेली नाही, म्हणजे तो काय नागडा हिंडत होता का ?” यावर ते प्राचार्य खजील झाले. असे होते कृष्णाजीबापू पुरंदरे.

त्यांच्या आयुष्यातील कळसाचा प्रसंग म्हणजे गांधीहत्येच्या वेळी दुसऱ्या गावचे लोक त्यांचं घर जाळायला आले. त्यावेळी सकाळी बापू सोवळ्यात देवपूजा करीत होते. घर जाळायला माणसं आलेली पाहून घाबरून त्यांनी भराभर घरातून चारपाच गाठोडी घेतली आणि सोवळ्यातच ते पळत सुटले. त्यांचे घर पूर्ण जाळून टाकले. दुसऱ्या दिवशी राखेत देव शोधत असलेल्या बापूंना बाबासाहेब पुरंदरेंनी या होमातून काय काय बचावलं असं विचारलं. तेव्हा कृष्णाजीबापू म्हणाले, “सगळी दौलत बचावली! हे घरबीर फक्त गेलं!” बापूंनी वाचवलेली ती एकमेव ‘दौलत’ काय होती माहितीये ? ते चारपाच गाठोडे होते मराठ्यांच्या इतिहासाच्या ऐतिहासिक कागदपत्रं असलेले रुमाल ! त्यात शिवकालीन कागदपत्रंही होती. अशी ही वंदनीय थोर माणसे.

महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुरंदरे दप्तराच्या पहिल्या खंडाच्या निवेदनात म्हणतात, “राजश्री कृष्णाजी वासुदेव पुरंदरे हे एक मराठी शिक्षक आहेत; परंतु दृढच्यासंगाने आणि अंतरीच्या दुर्दमनीय इच्छेमुळे दारिद्र्यादि अडचणींना निर्भयपणे तोंड देत देत त्यांनी केवढी मजल गाठली हे पाहिले म्हणजे महाराष्ट्रांत जी ऐतिहासिक जागृती झाली आहे तिची पाळेमुळे बरीच खोल रूजत जात आहेत असे स्पष्ट दिसतें.” कृष्णाजीबापू महाराष्ट्रभर खूप हिंडले. उत्तरेत आग्रा-दिल्ली, दक्षिणेत तंजावर-मदुरैपर्यंत ते फिरले. त्यांच्या अखेरच्या काळात ते फार आजारी असताना बाबासाहेब पुरंदरे त्यांना भेटायला गेले. तेव्हा कृष्णाजीबापू त्यांना आकाशाकडे बोट दाखवून पूर्वी एकदा म्हटलेलं वाक्य पुन्हा म्हटले – “शिवाजी महाराज जिथं जिथं गेले, ती सारी ठिकाणं पाहून झाली! एकच उरलं! ते बघायला निघालोय आता!”  ५ डिसेंबर १९५९ या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कृष्णाजी पुरंदरे.

– प्रणव कुलकर्णी.

Leave a comment