महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,19,665

देशमुख वाडा, सोलापूर

By Discover Maharashtra Views: 3031 3 Min Read

देशमुख वाडा, सोलापूर…

हजार वर्षांपूर्वीचे देशमुख वाड्याचे राजेशाही प्रवेशद्वार. दुसर्‍या छायाचित्रात सिद्धरामेश्‍वरांनी स्थापन केलेली गणेशमूर्ती आणि किरीटेश्‍वर महाराजांचा किरीट.(देशमुख वाडा.)

सोलापूर शहराचा सर्वात जुना आणि मूळ भाग असलेला कसबा परिसर ही शहरातील जुनी आणि एकमेव वस्ती. सुमारे एक हजार वर्षांपासून शहराच्या सर्व घडामोडींचा साक्षीदार असलेला देशमुखांचा वाडा याच ठिकाणी म्हणजे दक्षिण कसब्यात अजूनही उभा आहे.

सुमारे एक हजार वर्षांपूर्वी सोलापूरवर देशमुख यांच्या पूर्वज चामलादेवी देसाई या राणीची सत्ता होती. त्याआधीपासून म्हणजे इसवी सन ९३0 पासून सोलापूरवर देशमुख घराण्याचा अंमल होता. या काळात अनेक साम्राज्ये आली अन् गेली परंतु देशमुख यांच्या वतनदारीला कुठल्याही साम्राज्याने धक्का लावला नाही. बहामनी साम्राज्यापासून ते मराठय़ांच्या सोलापूर जिल्ह्यात झालेल्या पराभवापर्यंत सोलापूरचे कर्तेकरविते म्हणून सर्व अधिकार देशमुख घराण्याकडे होते. सोलापुरात प्रसिद्ध असलेला भुईकोट किल्ला साधारण १४ व्या शतकात बहामनी साम्राज्यात बांधला असल्याचे अनेक पुरावे इतिहासकारांकडे आहेत. हा किल्ला बांधण्याचे आदेश बहामनी साम्राज्याने देशमुख यांच्या पूर्वजांना दिले आणि त्यांच्या देखरेखीखाली हा किल्ला बांधण्यात आल्याचे कागदपत्रांवरून सांगितले जाते.

पूर्वी देसाई आडनाव असलेल्या देशमुख घराण्याला त्यांची जहागिरी आणि सोलापूरची वतनदारी यामुळे देशमुख ही पदवी लागली ती आजतागायत आहे. शहरातील अनेक धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक आणि इतर उत्सवाची सुरुवात करण्याचा मान आजही देशमुख घराण्याकडे आहे.

३00 वर्षांपूर्वी सुमारे ३ एकराच्या परिसरात असणारा देशमुखांचा वाडा म्हणजे सोलापूरचे चालते बोलते सरकार होते. चुना आणि सिमेंटचा शोध लागण्यापूर्वी केवळ दगड-मातीने उभारण्यात आलेल्या या वाड्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले. परंतु त्याचा मूळ गाभा आजही तसाच आहे. पूर्वी या वाड्यात कचेरी, न्यायालय, तुरुंग, घोड्याचा पागा आणि तेथे काम करणार्‍यांसाठी निवासस्थान होते. सध्या अस्तित्वात असलेली महापालिकेची ३ नं. शाळा पूर्वी देशमुख वाड्याचा एक भाग होता. शहरातील सर्व न्याय-निवाडे याच वाड्यात होऊन आरोपीला शिक्षा झाल्यानंतर त्याला कोठडीत डांबण्यासाठी वाड्यात तुरुंगदेखील होते. काही खोल्यांमध्ये कारंजे होती. या कारंजांना पाणीपुरवठा करण्यासाठी वाड्यामध्ये तीन खास हौद तयार करण्यात आले होते. या हौदाचे पाणी वाड्यातील कारंजांची शोभा वाढवायचे, अशी माहिती देशमुख घराण्याचे सध्याचे वारसदार आणि या वाड्यात वास्तव्यास असलेले सोमशेखर देशमुख यांनी दिली.

दृष्टिक्षेप

■ हजार वर्षांपूर्वीची परंपरा असलेल्या देशमुख वाड्यातून आजही श्रीशैलला कावड जाते. हजारो कावडींमध्ये देशमुख घराण्याच्या कावडीला पहिला मान आहे.

■ ८00 वर्षांपूर्वीचा सिद्धरामेश्‍वरांचा योगदंड आजही देशमुख वाड्यात मनोभावे पूजला जातो.

■ ८00 वर्षांपूर्वीची सिद्धरामेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेली तांब्याची गणेशमूर्ती देशमुख घराण्याचे दैवत आहे.

■ जिवंत समाधी घेतलेल्या किरीटेश्‍वर महाराजांचा ३५0 वर्षे जुना किरीट देशमुख यांच्या वाड्यात जतन केला आहे.

■ सिद्धेश्‍वर यात्रेतील पहिली काठी सिद्धरामेश्‍वरांची आणि दुसरी काठी देशमुखांची ही परंपरा अनेक वर्षांपासून आजही चालते आहे.

■ देशमुख घराण्यातील बाबासाहेब देशमुख हे नावाजलेले मल्ल होते. श्रद्धानंद तालमीच्या उभारणीमध्ये वाटा असणार्‍या बाबासाहेबांनी गावोगावच्या यात्रेत कुस्त्यांचे फड गाजविले.

माहिती संकलन – ऐतिहासिक वाडे व गढी ग्रुप

Leave a comment