महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

स्वराज्याचे निशाण आणि बाजी सर्जेराव जेधे

By Discover Maharashtra Views: 4123 3 Min Read

स्वराज्याचे निशाण आणि बाजी सर्जेराव जेधे

स्वराज्याचे निशाण – स्वराज्य उभारणीचा शहाजीराजांचा मनसुबा फसला आणि ते विजापूरच्या आदिलशाहची चाकरी करू लागले. बंगळुर हे शहाजीराजांचे जहागिरीचे ठिकाण. जिजाबाईसाहेब आणि शहाजीराजांनी बंगळुरात काही मसलत करून बालशिवबाला महाराष्ट्रात पुणे मुक्कामी पाठविण्याचे योजिले. शहाजीराजांनी बालशिवबाला आपले काही निष्ठावान सरदार, हत्ती, घोडे खजिना व ‘भगवा झेंडा’ दिला. बालशिवबा जिजाबाईसाहेबांसमवेत बंगळुरहून पुण्याकडे निघाला.

पुण्याच्या कसबा गणपतीला वंदन करून आई तुळजाभवानीला साक्ष ठेवून बालशिवबाने मावळच्या दर्‍याखोर्‍यात स्वराज्याचा यज्ञ पेटविला! मुरुंबदेवाचा डोंगर (राजगड), तोरणा, कोंढाणा इ. समिधा यज्ञात पडल्या… आणि अलिआदिलशहाची झोप उडाली! प्रथम त्याने कपटाने शहाजीराजांना जिंजीजवळ पकडून अटकेत टाकले आणि आपल्या फत्तेखान नावाच्या सरदाराला प्रचंड फौजेनिशी स्वराज्यावर सोडले. सुभानमंगळ ताब्यात घेऊन फत्तेखान सासवडजवळील खळद-बेलसर या गावाजवळ तळ देऊन बसला. नुकतेच मिसरूड फुटलेले शिवाजीराजे पुरंदर किल्ल्यावरून युद्धाचे डावपेच आखू लागले. महाराजांच्या हुकमावरून मावळ्यांची एक तुकडी सुभानमंगळावर तुटून पडली. सुभानमंगळ फत्ते झाला. फत्तेखानाच्या सरदारांचा दारुण पराभव झाला. सुभानमंगळवर भगवा झेंडा फडकला! स्वराज्यासाठी लढती गेलेली ही पहिली लढाई! (8 ऑगस्ट 1648)

आत्ता पाळी होती फत्तेखानाची! पुरंदरावर जमलेल्या जिवलगांना महाराजांनी अपुला मनसुबा सांगितला. फत्तेखानाला गनिमी काव्याचा इंगा दाखवायचा. सगळ्यांनी आनंदानी माना डोलवल्या. पुरंदराहून फत्तेखानाच्या छावणीच्या दिशेने बिनीच्या तुकडीने कूच केले. तिच्यामागोमाग इतरही मावळे निघाले. सगळ्यात शेवटी निघाली भगव्या झेंड्याची तुकडी. या तुकडीत एका जवान मावळ्याच्या हाती भगवा झेंडा होता. या तुकडीत तगडे पन्नास-पंचावन्न आडदांड मावळे सामील झाले होते. पुरंदराहून हे वादळ फत्तेखानाच्या छावणीच्या रोखाने खळद-बेलसरकडे घोंघावत निघाले. भगवा झेंडा वार्‍यावर फडफडत होता!
मराठ्यांच्या तुकड्या बेलसरच्या परिसरात घुसल्या आणि इशारत होताच फत्तेखानाच्या छावणीवर तुटून पडल्या! खानाचे लष्कर लढाईस सज्ज झाले. भयंकर हाणामारी सुरू झाली. आपलं बळ कमी पडतंय हे जाणून मराठ्यांची बिनीची तुकडी हळूहळू काढता पाय घेऊ लागली. झेंड्याची तुकडी मात्र माघारी फिरली नव्हती. उलट त्या मर्दांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढविला. खानाच्या सैन्याने झेंड्याच्या तुकडीला घेरले. गनिमांनी अगदी झेंड्यावरच गर्दी केली. झेंडा हेलकावू लागला. झेंडा पडला तर अब्रूच गेली. प्रत्येकजण झेंडा वाचविण्यासाठी शर्थ करू लागला. झेंडा धरलेल्या जवानाला गनिमांपैकी कोणाचा तरी इतक्या जोरात घाव बसला की तो स्वार घोड्यावरून खाली कोसळलाच. त्याच्या हातातला झेंडा निसटला. आता झेंडा जमिनीवर पडणार इतक्यात… एका तलवारबहाद्दराने झेंडा वरच्यावर पकडला. जखमीस्वाराला तशाच जलदगतीने दुसर्‍या एका घोड्यावर घेऊन झेंडा आपल्या हाती ठेवला आणि तुकडीला माघार घेण्याचा हुकूम केला. झेंडा हातात तोलीत त्या समशेरबहाद्दराने झेंड्याच्या तुकडीसह पुरंदराकडे कूच केले. झेंड्याभोवतीच्या गनिमांना कापून जमिनीवर पडणारा झेंडा हवेत वरचेवर झेलून मराठ्यांची अब्रू वाचवणार्‍या त्या समशेरबहाद्दराचे नाव होते बाजी जेधे! कान्होजी जेध्यांचा लेक!
प्रतापगड युद्धात मर्दुमकी गाजवणार्‍या कान्होजी जेंध्याचा पुत्र बाजी जेथे यास महाराजांनी त्याच्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘सर्जेराव’ ही पदवी बहाल केली. बाजी जेध्यांचा झाला ‘बाजी सर्जेराव जेधे’!
Leave a comment