पुरंदरवरील हेरगिरी!

By Discover Maharashtra Views: 2517 4 Min Read
@JIDDIMARATHA

ताकवले उर्फ साळुंखे सरदारांची पुरंदरवरील हेरगिरी!

पुरंदर किल्ल्यावर हेरगिरी करण्यासाठी साळुंखे घराण्यातील सरदाराने ताक विक्रेत्याची भूमिका स्विकारली. हे सोंगाड उघडे न पडू देता त्यांनी, ते पुढे कितीतरी दिवस तसेच हुबहू रंगवण्याचे अवघड आणि जिकीरीचे काम अखेर तडीस नेलेच. हेरगिरीसाठी रंगवलेले ताक विक्रीचे कामच पुढे या सरदार घराण्याला ताकवले अशा आडनावात रुपांतरीत करून गेले.(पुरंदरवरील हेरगिरी!)

हेरगिरीसाठी पुरंदर किल्ल्याच्या दक्षिणेस फक्त तीन किलोमीटर अंतरावर ज्या ठिकाणी साळुंखे सरदाराने ठिय्या मांडला होता, तिथेच आज ताकवले आडनाव धारण केलेल्या साळुंखे सरदारांचे हरगुडे हे गाव अस्तित्वात आहे. तिथूनच काही घरे बाहेर पडून, त्यांनी धनकवडी  गावात आपले बस्तान बसवलेले आहे. या दोन्ही गावातील लोकांच्या नावासमोर ताकवले हे पडनाव कायमस्वरूपी चिकटलेले असले, तरी ते साळुंखे राज (घराणा) कुळातील एक उप आडनाव आहे. ताकवले हे नाव कसे पडले असावे, त्याची समजलेली अख्यायिका चांगलीच रंजक आहे.

पुरंदर हा रांगडा किल्ला स्वराज्याचा भाग नव्हता. त्यामुळे हा किल्ला स्वराज्यात असावा, म्हणून शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्यावर हेरगिरी करण्यासाठी साळुंखे सरदाराच्या चमुची नियुक्ती केली. किल्ल्याचा किल्लेदार महादजी निळकंठराव असल्याने, हेरगिरीचे काम कठीणच होते. किल्ल्याच्या हेरगिरीसाठी साळुंखे सरदाराने पुरंदर किल्ल्याच्या दक्षिणेस तीन किलोमीटर अंतरावर आपला ठिय्या मांडला. मुख्य व्यवसाय दुग्धजन्य पदार्थातील ताक विक्रीचा असल्याचे लोकांना भासवत, साळुंखेंनी सह्याद्रीच्या अवघड डोंगरांजीतून वाट काढून पुरंदर किल्ल्यावर जाऊन ताक विकायचे अवघड कार्य हाती घेतले. आणि हे काम निर्भयपणे तसेच कोणाला संशय न येऊ देता तडीस नेले.

शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचे अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेतले होते, म्हणून आदिलशहा मनातून चिडलेला होता. शिवाय तिकडे बंगळुरात बसून शहाजी राजे प्रबळ होत चालल्याची सरदार लोकांकडून आदिलशहाची कानभरणीही सुरू होती. या दुहेरी गोष्टींमुळे आदिलशहा मनातून जाम चिडला होता. अशाच चिडचिडीतून त्याने शिवाजीला कोंडीत अडकविण्यासाठी सन १६४९ मध्ये शहाजीराजांना कैदेत टाकण्याचे काम केले. एवढ्यावरच न थांबता बळजोर होऊ पाहणारा शिवाजी दुहेरी कचाट्यात अडकावा म्हणून त्याने फत्तेखानाला शिवाजीवर चाल करण्यासाठी पाठविण्याची सुद्धा नामी युक्ती शोधून काढली.

एकीकडे वडीलांची कैद आणि दुसरीकडे फत्तेखानाची स्वारीने, शिवाजी राजांची चिंता वाढवली होती. मात्र शिवाजी महाराजांसाठी जमेची बाजू म्हणजे, त्यापूर्वीच त्यांनी पुरंदर किल्ल्याच्या हेरगिरीसाठी माणसे पाठविलेली होती. कारण म्हणजे हा किल्ला पारतंत्र्याचे दिवस भोगत होता. पुरंदर किल्ल्यावर त्यावेळेस महादजी निळकंठराव हा किल्लेदार आपली चोख भूमिका निभावत होता. हेरगिरी करणारांनी किल्ल्यावर महादजी आणि त्याच्या भावंडात भांडणे लावण्याचे सोयीस्करपणे काम केले. किल्लेदार आणि त्याच्या भावांमधील सुंदोपसुंदीचा फायदा घेण्याचे काम नंतर शिवरायांनी चोखपणे पार पाडले.

शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्यात प्रवेश केला. या अजिंक्य किल्ल्यावर थांबूनच फत्तेखानाशी लढण्याचा बेत त्यांनी निश्चित केला. शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मराठा फौजांनी येथूनच फत्तेखानाशी दोन हात केले आणि ही लढाई जिंकली. शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेल्या या किल्ल्यावरच पुढे दि. १४ मे १६५७ रोजी छत्रपती संभाजी राजांचा जन्म झाला.

पूर्वीच्या काळी परिस्थिती किंवा कामाच्या स्वरूपातून, काळाच्या ओघात जवळपास सर्वच घराण्यांतील बहुतांश कुटुंबांची नावे बदलेली आहेत. त्या काळात सहज आडनावे बदलत असायची. एकटय़ा साळुंखे कुळाची काळाच्या ओघात बदललेली जवळपास २८७ पडनावे आहेत. आज मात्र ही आडनावे सहजपणे बदलताना दिसत नाहीत.

पुरंदर तालुक्याच्या सासवड या गावापासून पुरंदर किल्ल्याचे रस्ता अंतर चौदा किलोमीटर आहे. हरगुडे गावाचे आणि पुरंदर किल्ल्याचे हवाई अंतर फक्त तीन किलोमीटर असले, तरी गावातील लोकांना पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी अगोदर सासवडला येऊन मगच पुरंदर किल्ल्याकडे जावे लागते. याचाच अर्थ तीन किमी. अंतरासाठी अठ्ठावीस किलोमीटर अंतर कापून पुरंदर किल्ला गाठावा लागतो, हे विशेष आहे.

सतीशकुमार सोळंके-देशमुख

Leave a comment