महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

शिवछत्रपतींच्या विश्रांतीचं भाग्य लाभलेला पट्टा किल्ला उर्फ विश्रामगड

By Discover Maharashtra Views: 2700 3 Min Read

शिवछत्रपतींच्या विश्रांतीचं भाग्य लाभलेला पट्टा किल्ला उर्फ विश्रामगड –

छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने उजळून निघण्याचे भाग्य फार कमी गडकिल्ल्यांच्या नशिबी आले. महाराजांनी स्वराज्यात असलेल्या अनेक किल्ल्यांना भेटी दिल्या. पण एकूणच महाराजांचं ५० वर्षांचं आयुष्य त्यात मोहिमा, युद्ध, घोडदौड असं एकूण दगदगीचा त्यांचा प्रवास. त्यांच्या आयुष्यात सुखाचे, विश्रांतीचे फार कमी दिवस वाट्याला आले. रायगड आणि राजगड हे किल्ले त्यामानाने भाग्यवान म्हणावे लागतील, कारण हे दोनच किल्ले असे आहेत ज्यावर महाराजांचं वास्तव्य जास्त काळ होतं. त्यातल्या त्यात राजगडावर महाराजांचं वास्तव्य सर्वाधिक काळ होतं. रायगड आणि राजगडाच्या भाग्यवानांच्या पंक्तीला बसण्याचे भाग्य लाभलेला पट्टा किल्ला अर्थात विश्रामगड किल्ला.

या किल्ल्याचे बांधकाम बहामनी सल्तनतच्या काळात १४ – १५ व्या शतकात झाले असल्याची माहिती मिळते. त्यानंतर त्याचा ताबा येथील स्थानिक रहिवासी आदिवासी महादेव कोळी जमातीकडे गेला व नंतर त्याचा ताबा अहमदनगरच्या निजमशाहीकडे गेला. इ.स. १६२७ मध्ये मुगलांनी हा किल्ला जिंकला. इ.स. १६७१ मध्ये पट्टा हा किल्ला शिवछत्रपतींच्या आदेशाने मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकला आणि किल्ल्याचा सुवर्णकाळ सुरू झाला.

इ.स. १६७९ मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात जालना ( तेव्हाचे जालनापूर) येथे लूट केली. छत्रपती शिवाजी महाराज ह्यावेळी जालनापुरात मोगलांवर चालून गेले. सोनें नाणे, जडजवाहीर घेऊन महाराज रायगडाकडे निघाले. दरम्यान, महाराज सर्व लूट घेऊन रायगडाकडे जात असल्याची जात असल्याची खबर मुघल सरदार रणमस्तखानाला लागली. ही बातमी रणमस्तखानास समजताच तो महाराजांच्या मागावर निघाला. लूट जास्त असल्याने राजांच्या फौजेची गती संथ होती.

मोगली फौजेने स्वराज्यसेनेवर आक्रमण केलं. संगमनेरजवळच्या रायतेवाडी येथे दोन्ही सैन्याची गाठ पडली. दि. १८, १९ व २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर आली.

छत्रपती शिवाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते, धनाजी जाधव आघाडीवर होते, पण मोगलांचा जोर पाहता हंबीररावांनी महाराजांना काही फौजेसह पट्टागड जवळ करण्याचे सांगून ते युद्धात व्यग्र झाले. युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे जायचे व बाकीच्या सैन्याने लढाई सुरू ठेवायची अशी रणनिती निश्चित करण्यात आली.

बहिर्जी नाईकांनी आडवाटांद्वारे नेहमीच्या मार्गात बदल करून महाराजांना पट्टा किल्ल्याचा मार्ग सांगितला.

त्यानुसार संगमनेरजवळच्या रायतेवाडी येथे आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून महाराज २१ नोव्हेंबरला नगर – नाशिक जिल्ह्यांच्या हद्दीवर असणाऱ्या अकोले तालुक्यातील पट्टा किल्ल्यावर आले. त्यांचे वास्तव्य या किल्ल्यावर १७ दिवस होते. ह्यानंतरच महाराज आणि संभाजीराजे यांची शेवटची ऐतिहासिक भेट पन्हाळ्याच्या पायथ्याशी झाली. तिथे दोन्ही पितापुत्रांची भेट झाल्यानंतर महाराज पुढे कल्याणमार्गे रायगडावर पोहोचले.

युद्धाच्या धामधुमीत अन दगदगीत महाराजांनी पट्टागडावर धावती विश्रांती घेतली म्हणून गडास विश्रामगड नाव ठेवले.

आपल्यापैकी अनेकांना या किल्ल्याविषयी माहिती नाही. काही जणांनी या गडास भेट दिली असली तरी त्यांना या किल्ल्याच्या इतिहासाची माहिती नसते. असं सोन्यासारखं भाग्य लाभलेला हा किल्ला ; छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड, याची माती भंडाऱ्यासारखी भाळी लाऊन कृतकृत्य व्हावे !

Leave a comment