किल्ले पद्मदुर्ग | Padmadurg Fort

किल्ले पद्मदुर्ग

किल्ले पद्मदुर्ग | Padmadurg Fort-

घरात जैसा उंदीर तैसा समुद्रात सिद्दी

जवळच असलेल्या मुरुड जंजिऱ्यातील सिद्दीला शह देण्यासाठी, त्याला पायबंद घालण्यासाठी शिवरायांनी बांधलेला किल्ले पद्मदुर्ग (Padmadurg Fort).. “राजपुरीच्या उरावर दुसरी राजापुरी तयार केली” अशाप्रकारचे वर्णन या किल्ल्याचे इतिहासात आढळून येते..

ज्या बेटावर हा किल्ला उभा आहे त्याचा आकार कासवसारखा आहे त्यामुळे स्थानिक त्याला कासा किल्ला म्हणूनही ओळखतात. या किल्ल्याला एक मुख्य गड व लगतच पडकोट देखील आहे. जंजिरा मोहिम मोरोपंत पिंगळे नेतृत्वाखाली होती त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी धावून जाणारे व जंजिऱ्याच्या तटाला शिड्या लावणारे लाय पाटील हे रात्री पद्मदुर्ग किल्ल्यावरूनच रवाना झाले होते पण पुढे मोरोपंत आणि लाय पाटील यांची वेळ जुळू शकली नसल्याने त्यांना माघार घ्यावी लागली.

पण जंजिऱ्याच्या तटाला शिड्या लावणे हे मोठे धाडसाचे काम होते व त्यांच्या साहसाची दखल घेऊन छत्रपती शिवरायांनी त्यांना पालखीचा बहुमान दिला परंतु आपण समुद्रात फिरणारे कोळी व आपणांस पालखीची काय जरुरी म्हणून त्यांनी तो मान मोठ्या मनाने नाकारला. पण छत्रपती शिवरायांनी त्यांना ‘सरपाटील’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.

किल्ले पद्मदुर्ग किल्ल्यावरील कमळाकृृृती बुुुरुज

जंजिऱ्याच्या रोखाने सज्ज असलेली तोफ आणि समोर दिसणारा जंजिरा प्रत्यक्ष जंजिरा जरी मराठ्यांना घेता आला नसला तरी पद्मदुर्ग किल्ला हा मराठ्यांच्या आरमाराचे महत्व वाढवतो. पद्मदुर्ग किल्ल्याचा धाक शेवटपर्यंत सिद्दीला होता. या किल्ल्यामुळे सिद्दीची आरमारी ताकद कमी होण्यास मदत झाली त्याचबरोबर कोकणातील किनारी भागातील लोकांवर जो त्याने अन्याय चालवला होता जसे की लूटमार करणे, स्त्रिया ,मुलींना परदेशी विकणे ह्या प्रकाराला कायमचा आळा बसला तो पद्मदुर्ग मुळेच.

छत्रपती शिवाजी महाराजांचे काही मोजकेच सागरी किल्ले लोकांच्या स्मरणात आहेत. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग हे किल्ले सोडले तर अनेकांना महाराजांच्या बाकीच्या जलदुर्गांची नावेही माहीत नाहीत. त्यामुळेच आपला यापुढे विषय हा मराठ्यांच्या इतिहासातील अज्ञात किल्ले, तथ्य, अज्ञात वीर , घटना आणि स्थळे हा असेल.

जंजिरा किल्ल्यावर येणाऱ्या बहुतांश पर्यटकांना या किल्ल्याविषयी दुर्दैवाने माहितीही नसते. याचे कारण म्हणजे जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात होड्या उपलब्ध असतात व पद्मदुर्ग साठी आपणांस खाजगी होडी करून जावे लागते जे महाग आहे. या किल्ल्याला अजूनही प्रतीक्षा आहे तमाम भटक्यांची, इतिहास अभ्यासकांची, या भूमीवर मातृवत प्रेम करणाऱ्या सर्व लेकरांची काही मोजकेच दुर्गप्रेमी इकडे वाट वाकडी करून येत असतात.

तर मित्रांनो यश म्हणजे नेमकं काय एक जंजिरा घेता नाही आला याचं दुःख मनात ठेवून हार न मानता त्याच्या तोडीस तोड असे पद्मदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी, उंदेरी, सुवर्णदुर्ग, कुलाबा, रेवदंडा अश्या जलदुर्गांची अभेद्य साखळीच निर्माण करून समुद्रावर राज्य स्थापन केलं याला म्हणतात शिवनीती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here