छत्रपती थोरल्या शाहुंची अस्सल चित्रे

छत्रपती थोरल्या शाहुंची अस्सल चित्रे | थोरले शाहुछत्रपती

छत्रपती थोरल्या शाहुंची अस्सल चित्रे –

छत्रपती शिवराय यांच्या अस्सल 15 चित्रांची माहिती आपल्याला गेल्या 2 वर्षांपासून मालोजीराव यांच्यामुळे मिळत आहे.पण थोरले शाहू छत्रपती यांची अस्सल चित्रे कोणती?समकालीन कोणती?मुळात थोरल्या शाहू महाराजांची किती चित्रे अस्सल आहेत?याविषयी आजही लोकांना फार काही माहिती नाही.आणि छत्रपती थोरल्या शाहुंची अस्सल चित्रे याच समकालीन चित्रांचा घेतलेला हा धावता आढावा..

1 – थोरले शाहू छत्रपती यांचे सर्वात लहानपणी काढण्यात आलेले चित्र

अमस्टरडॅम येथे असणाऱ्या रिक्स म्यूजियम मधे संभाजी महाराज यांचे एक चित्र आहे.आणि या चित्रात महाराजांच्या मांडीवर त्यांचे थोरले पुत्र ‘शिवाजी’ विराजमान झालेले दिसतात.हे चित्र संभाजी महाराजांच्या समकालीन असून महाराजांच्या दुर्मिळ आणि अस्सल चित्रांपैकी एक मानल्या जाते.बाल शाहूचे हे पहिले चित्र.

2 – तळेगाव दाभाडे येथील भित्तीचित्र

मराठ्यांच्या पराक्रमाचे दूसरे नाव म्हणजे खंडेराव दाभाडे.या दाभाडे सरदारांच्या वाड्यामधे एक भित्तीचित्र होते.ज्यात खुद्द थोरले शाहू छत्रपती आणि खंडेराव दाभाडे दिसून येतात.या चित्राची विशेषता म्हणजे,यात शाहू छत्रपतींनी डोक्यावर पगड़ी घातली आहे.आणि पगड़ी असणारे महाराजांचे,तेही तरुणपणातील,एकमेव चित्र.

3 – रास्ते वाडा,वाई येथील भित्तीचित्र

मोतीबागेत भिकाजीराव रास्ते यांचा वाडा म्हणजे मराठ्यांच्या कलेचे सर्वोच्च बिंदु.कित्येक भित्तिचित्रांनी हा वाडा सजला आहे.आणि याच वाड्याच्या पूर्वेकडील भिंतीवर थोरल्या शाहू छत्रपतींचे तरुणपणातील चित्र आहे.विशेष म्हणजे हे चित्र महाराजांच्या तारुण्यातील असून महाराजांचे पशु-पक्षी प्रेम दिसून येते.

4 – सरस्वती महालातील चित्र

तंजावर म्हणजे मराठ्यांचे सांस्कृतिक वैभवाने नटलेले राज्य.याच तंजावरच्या सरस्वती महालात जगभरातील पोथ्या-हस्तलिखिते,चित्रे आहेत.त्यातील एक म्हणजे थोरले शाहू याचे चित्र.काळ्याभोर लांबलचक केसांसोबत चितारलेले शाहू पाहील्यास अगदीच जीवंत चित्र असल्याचा भास होतो.हे चित्र महाराजांच्या समकालीन आहे.

5 – हातात भाला घेतलेले शाहू,घोड्यावर स्वार

थोरले शाहू छत्रपती यांचे हातात भाला घेऊन घोड्यावर स्वार झालेले हे एकमेव छायाचित्र.महाराजांच्या तरुणपणातील हे चित्र असून त्यांना शिकारीची अत्यंत आवड होती,हे आपल्याला समजून येते.हे चित्र महाराजांच्या समकालीन आहे,अस्सल आहे.

6 – थोरले शाहू छत्रपती घोड्यावर स्वार

औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामधे इतिहास दालनात हे चित्र लावण्यात आलेले आहे.महाराजांचे श्वान प्रेम,त्यांची साधी राहणी तसेच त्यांसोबत असणारे त्यांचे इतर सेवक सर्वकाही चित्रकाराने अत्यंत खुबीने रेखाटले आहे.

7 आणि 8 – शाहू छत्रपती हुक्का पिताना

औंध येथील संग्रहालयात तसेच आपण 18 मे रोजी पेजतर्फे प्रकाशित केलेले शाहू छत्रपतींचे चित्र हे जवळ जवळ सारखे आहेत पण,दोन्ही चित्रांची नोंद आपणास वेगवेगळी पाहावयास मिळते.

औंध येथील भवानी संग्रहालयात असणारे चित्र हे पंतप्रतिनिधींच्या वैयक्तिक संग्रहातील असून,आपण प्रकाशित केलेले चित्र हे एका लेखकाच्या वैयक्तिक संग्रहात होते.पण,या दोन्ही चित्रांना समकालीन म्हणूनच पाहण्यात येते.

औंध येथील चित्र हे अस्सल तर आहेच,पण आपल्या पेजतर्फे प्रकाशित केलेले आणि वरी माहिती दिलेल्या पैकी काही चित्रे अस्सल कशी?याविषयी एक गम्मत तुम्हाला पोस्टच्या अखेरीस सांगेल.

9 – पर्वती येथे असणारे भित्तीचित्र

नानासाहेब पेशवे यांच्या करकिर्दीत विशेष महत्वास आलेल्या पर्वती येथ थोरले शाहू छत्रपती आणि नाना पेशवे यांचे एक भित्तीचित्र आहे.पर्वतीच्या निर्मितीचा काळ पाहील्यास हे चित्र अस्सल आहे,हे आपण ठामपणे सांगू शकतो.आपल्या धन्यासाठी ज्याप्रकारे दाभाडे आणि रास्ते सरदारांनी महाराजांचे चित्र काढले होते,अगदी त्याचप्रकारे पेशव्यांनीही असे चित्र काढून घेतले.

10 – शिकार,स्वारी आणि अखेरचे चित्र (?)

महाराजांच्या उतारवायात काढलेल्या या चित्राचा काळ सांगितला जातो,इसवी सन 1748 ची अखेर ते 1749 ची सुरूवात.नाना पेशवे यांच्यासमोर विराजमान झालेले पांढऱ्या केसांनी वयस्कर वाटनारे थोरले शाहू,चित्राच्या वर आणि खालील भागात शिकारीची चाललेली धावपळ या सर्व गोष्टी आपल्याला दिसून येतात.महाराजांच्या अखेरच्या काळात काढलेले हे चित्र महाराजांचे शेवटचे चित्र असावे,असे म्हणले जाते.

19व्या शतकात सातारा गादीवर एक पराक्रमी छत्रपती होऊन गेले.प्रतापसिंह छत्रपती.त्यांची एक चित्रशाला होती,ज्यात अनेक दुर्मिळ ऐतिहासिक चित्रे त्यांच्या वयक्तिक संग्रहित होती.शाहू छत्रपती यांचे हुक्का पितानाचे चित्र,घोड्यावर भाला घेऊन स्वार असणारे चित्र तसेच,संभाजी महाराजांच्या मांडीवर असणारे बाल शाहू ही चित्रे महाराजांच्या याच वैयक्तिक संग्रहातील..अस्सल चित्रे..(चित्रांची यादी माझ्याकडे आहे.ज्यात अजूनही महाराजांची अप्रकाशित 4 चित्रे आहेत.)

Ref.
1-Rijks museum
2-सरस्वती महाल,तंजावर
3-मराठ्यांची चित्रकला
4-18th century Deccan by Varsha Shirgaonkar
5-पर्वतीच्या बांधकामाचे पेशवेकालीन पत्रव्यवहार
6-Maratha Wall Paintings
7-प्रतापसिंह छत्रपती यांची चित्रयादी

#आम्हीच_ते_वेडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here