महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल छायाचित्रे

By Discover Maharashtra Views: 4377 4 Min Read

छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल छायाचित्रे…

छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल छायाचित्रे आज उपलब्ध आहेत, परंतु त्यातील बहुतांश चित्र हि परदेशात आहेत. भारतात उपलब्ध असलेली बहुतांश चित्र हि बरीच अलीकडची आहेत.अनेक चित्रांवर तारीख नसल्याने तत्कालीन कलेक्शन करणार्याने लिहिलेल्या नोट्सवर तारीख अवलंबून आहे किंवा अंदाजावर तारीख  मांडता येते. मनुची कलेक्शन ची २चित्र आणि किशनगड चे चित्र सोडता बाकीच्या चित्रांचे चित्रकार उपलब्ध नाहीत.

आजवर उपलब्ध असलेल्या छत्रपति शिवरायांच्या सर्व अस्सल चित्रांचा हा घेतलेला मागोवा –

(डावीकडून उजवीकडे चित्र पहावीत )

१. मनुची चित्र संग्रह – १६७२ च्या आसपासचे, मनुचीने भारतातील ५६ राजे-बादशाह यांची चित्रे मीर महम्मद कडून तयार केली होती.त्यातील हे चित्र आहे. सध्या हे चित्र पॅरिस मध्ये आहे.

२. किशनगड चित्रशाळा – हे चित्र किशनगड मध्ये तयार केले असून ते १७५० नंतरचे असावे कारण अशी चित्रे तेथील प्रसिद्ध चित्रकार निहाल चंद ने काढली आहेत. हे चित्र सध्या बॉनहॅम्स कलेक्शन लंडन येथे आहे.

३.राजपूत शैली – राजपुती शैलीतील हे चित्र राजस्थान मध्ये काढले गेले असून, १७५० नंतरचे असावे.जगजितसिंह गायकवाड यांचेकडून हे प्राप्त झाले.

४. रॉबर्ट ऑर्म कलेक्शन – हिस्टोरीकल फ्रॅगमेंट्स या ऑर्म च्या पुस्तकात हे चित्र आले आहे, १७८२ साली हे पुस्तक आले होते ,हे पेंटिंग १७८२ च्या आधीचे आहे.

५.अश्वारूढ शिवराय – १७८५, १८२१,१८३१ च्या युनिव्हर्स पिक्चरस्क आणि इंडे या डिडॉट च्या ग्रंथात हि चित्र आले आहे.हे चित्र अँटोन झेनेटी ने काढले आहे. चित्राचा काळ १७०५-१७४१ असावा. झेनेटी ने हे चित्र मनुची साठी काढले असण्याची शक्यता आहे. मूळ चित्र कॉपर एनग्रेव्हड असून त्यावर रंगकाम केले आहे.

६. मुंबईतील चित्र- हे प्रसिद्ध चित्र टाटा कलेक्शन मधील असून १६७५ नंतर गोवळकोंडा येथे काढले असावे. छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय,मुंबई येथे चित्र सध्या आहे.

७. फ्रांस राष्ट्रीय ग्रंथालय – वृद्धावस्थेकडे झुकलेले शिवराय हे चित्र १६८५ सालचे गोवळकोंडा येथील आहे. सध्या फ्रांस मध्ये आहे.

८. स्मिथ_लेसोफ_कलेक्शन – छत्रपती शिवरायांचे  हे उभे असलेले , एका हातात तलवार , दुसर्या हातात पट्टा असलेले चित्र फ्रांस च्या राष्ट्रीय ग्रंथालयात आहे. हे चित्र १७व्या शतकाच्या शेवटचे असावे.

९. रिक्स म्युसियम – डाव्या हातात पट्टा, उजव्या हातात तलवार असलेले हे चित्र हॉलंड मधील असून चित्र १६८० च्या आसपासचे असल्याची तिथे नोंद आहे. चित्रावर ‘Siesvage’ लिहिलेले आहे.

१०. विटसेन संग्रह – हे चित्र हॉलंड मधील रिक्स म्युसियम येथे आहे, १६७५-१६८५ हा चित्राचा काळ सांगितला जातो.  Siwagii Prince in Decam असे चित्रावर लिहिले आहे.

११. बर्लिन जर्मनी – बर्लिन स्टेट लायब्ररी येथे असणारे हे चित्र आहे, या चित्रावर ‘Siuwagie gewerzere maratise vorst’ असे लिहिले आहे. ज्याचा अर्थ मराठ्यांचा राजा असा होतो. चित्र १७०० च्या पूर्वीचे असून, तत्कालीन भारतातून हॉलंड नंतर तेथून जर्मनी येथे नेले आहे.

१२. गीमे म्युसियम – पॅरिस फ्रांस येथील मुघल शैलीतील हे शिवरायांचे चित्र आहे. चित्राचे वैशिठ्य म्हणजे या चित्रात त्यांचा पूर्ण चेहरा दिसत आहे.

१३. ब्रिटिश म्युसियम – लंडन येथे सध्या असणारे शिवाजी महाराजांचे चित्र पोर्टरेट्स ऑफ इंडियन प्रिन्सेस या अल्बम मधील आहे. चित्र गोवळकोंडा येथे बनवले असून काळ १६८० ते १६८७ नोंदवला आहे.

१४. फ्रांस्वा वॅलेंटिन संग्रह – भिंतीवर हात ठेवलेले हे शिवाजी राजांचे वैशिष्ठयपूर्ण चित्र हे फ्रांस्वा वॅलेंटिन ह्या डच अधिकाराच्या संग्रहातील आहे. चित्र १७८२ मध्ये प्रसिद्ध झाले असून ते १७१२ च्या आधीचे असावे. चित्रावर ‘dwn hee Seva Gi’ लिहिले आहे.

१५. लेनिनग्राड – इंडियन मिनिएचर्स या चीत्रसंग्रहात प्रसिध्द झालेले हे चित्र बर्लिन मधील चित्राशी मिळतेजुळते आहे, हे चित्र हॉलंड मधून प्राप्त झाले असून सध्या रशियन लायब्ररीत आहे.

(सर्व चित्रे शिवकालीन व शिवोत्तरकालीन आहेत, इ.स.१८०० नंतरची चित्र विचारात घेतली नाहीत)

साभार – मालोजीराव जगदाळे

Leave a comment