महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

हैदराबादचा निजाम आणि निजामशाही भिन्न आहेत?

By Discover Maharashtra Views: 3710 4 Min Read

हैदराबादचा निजाम आणि निजामशाही भिन्न आहेत ?

कुणालाही असे वाटू शकते की निजामाचे राज्य म्हणजे निजामशाही त्यात चुक ते काय. पण प्रत्यक्षात तसे नाही. निजाम आणि निजामशाही या भिन्न गोष्टी आहेत.हैदराबादचा निजाम आणि निजामशाही.

मुळात दक्षिणेतील सुलतानांच्या ज्या राजवटी होत्या त्या बाबत माहिती समजून घेतली पाहिजे. कर्नाटकांतील गुलबर्गा येथे हसन गंगु बहामनी याने बहामनी साम्राज्याची स्थापना केली. हे राज्य 1347 ते 1526 असे म्हणजे 179 वर्षे चालले.  या राज्यातील पाच प्रबळ सरदारांनी मुळ बहामनी साम्राज्याची वाटणी करून आपआपली नविन राज्ये निर्माण केली. ही पाच राज्ये म्हणजे 1. विजापुरची अदिलशाही 2. गोवळकोंड्याची कुतुबशाही 3. अचलपुरची (विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील) इमादशाही 4. अहमदनगरची निजामशाही 5. बिदरची बरीदशाही.

बरिदशाहीची 1492 मध्ये सुरवात झाली. औरंगजेबाने 1656 मध्ये मीर जुमला सोबत विजापुरावर स्वारी केली. त्या वेळी त्याने बरिदशाही जिंकून घेतली. येणे प्रमाणे 1656 मध्ये या राज्याचा अंत झाला. इमादशाही ची सुरवात 1484 रोजी झाली. 1572 मध्ये या राज्यावर नगरच्या निजामशाहीचा राजा मूर्तुझा निजामशहा याने हल्ला चढविला व ही राजवट जिंकून आपल्या प्रदेशाला जोडली.

आता पानिपत चित्रपटात ज्या निजामशाहीचा उल्लेख येतो तो हैदराबादच्या निजामा संदर्भात येतो. प्रत्यक्षात ज्या राजवटीला निजामशाही म्हणतात तीची सुरवात 1489 ला झाली. प्रसिद्ध वजीर मलिक अंबर याच राजवटीचा प्रमुख आधार होता. अहमदनगर आणि नंतर औरंगाबाद जवळचे देवगिरी ही या निजामशाहीची राजधानी राहिली. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर ही निजामशाही वाचविण्यासाठी शिवाजी महाराजांचे वडिल शहाजी राजे यांनी भरपूर प्रयत्न केले. अखेरीस 1637 मध्ये ही निजामशाही मोगलांनी संपविली. शाहजानशी शहाजी महाराजांनी पदरी ठेवण्याची विनंती केली. शहाजानने ती नाकारली व शहाजी महाराजांना विजापुरच्या आदिलशहा कडे जाण्यास सुचवले.

विजापुरची अदिलशाही 1489 ते 1686 अशी सर्वात जास्त काळ टिकली. दक्षिणेतील एक बलाढ्य राजवट म्हणून ही ओळखली जाते. औरंगजेब दक्षिणेत मोठ्या मोहिमेवर उतरला तेंव्हा त्याने या विजापुरच्या अदिलशाहीचा निपात केला. विजापुरचा अदिलशहा औरंगजेबास शरण आला. त्याला औरंगाबादेत कैद करण्यात आले. 1686 मध्ये अदिलशाहीचा अंत झाला. पुढे 1701 मध्ये अदिलशाहाचा औरंगाबाद शहरात कैदेत असताना विषाने मृत्यू झाला.

पाच राजवटींतील शेवटची राजवट म्हणजे गोवळकोंड्याची कुतुबशाही. हीची स्थापना 1512 मध्ये झाली. विजापुरच्या अदिलशाहीचा नि:पात केल्यावर औरंगजेब कुतुबशाही कडे वळला. शेवटचा कुतुबशहा अबू हसन यांस कैद करून औरंगजेबाने देवगिरीच्या किल्ल्यावर ठेवले. 1687 मध्येच ही राजवट खालसा केली.

ज्या निजामशाहीचा उल्लेख पानीपत मध्ये आहे ती 1637 मध्येच संपली.  हा उल्लेख ज्या ‘निजामा’बाबत येतो तो निजाम म्हणजे मुघलांचा दक्षिणेतील सरदार मीर कमरूद्दीन याने 1724 मध्ये मोगलांच्या अंतर्गत भांडणाचा फायदा घेत आपली स्वतंत्र राजवट घोषित केली. त्याने ‘निजाम उल मुल्क’ ही पदवी धारण केली. याचा मराठीतला अर्थ पेशवा किंवा पंतप्रधान असा होतो. त्यामु़ळे त्याच्या वारसांना पुढे निजाम संबोधले गेले. या घराण्याचे नाव ‘असफजहा’ असे होते. म्हणजे ही राजवट असफजाही घराण्याची असे म्हणावे लागेल. 1724 ते 1948 अशी सव्वादोनशे वर्षे या ‘असफजाही’ घराण्याचे राज्य केले. महाराष्ट्रातील मराठवाडा या हैदराबाद संस्थानाचा भाग होता. स्वातंत्र्यानंतर 17 सप्टेंबर 1948 ला पोलिस ऍक्शन करून वल्लभभाई पटेल यांनी हा प्रदेश भारतीय संघराज्यात विलीन केला.

(छायाचित्र 17 सप्टेंबर 1948 चे आहे. उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल यांचे हैदराबाद विमानतळावर स्वागत करताना शरणागत सातवे निजाम उस्मान अली पाशा.)

श्रीकांत उमरीकर

Leave a comment