नातू वाडा, पुणे | Natu Wada, Pune

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 2
2 Min Read

नातू वाडा, पुणे

नारायण पेठेतून अप्पा बळवंत चौकाकडे जाताना डावीकडे नातूंचा बोळ लागतो. या बोळात एकेकाळी नातूंचे ३–४ वाडे होते. परंतु कालौघात या वाड्यांचा पुनर्विकास होऊन त्यांच्या जागी उंच इमारती उभ्या राहिल्या. आज या जुन्या वैभवाची साक्ष देत फक्त एकच वाडा जुन्या स्वरूपात उभा आहे. नातू बोळाच्या सुरुवातीलाच उजव्या हाताला दिसणारा हा वाडा परिसरात नातू वाडा म्हणून ओळखला जातो.

इंग्रज आमदनीत एल्फिन्स्टन याने बाळाजीपंत नातूंना काही वतने व पुणे शहरात जमिनी बहाल केल्या. बाळाजीपंत नातू हे पूर्वी सरदार खंडेराव रास्ते यांचे कारकून होते. त्यामुळं त्यांचा एल्फिन्स्टनशी परिचय झाला आणि पुढे तो मैत्रीत रूपांतरित झाला. शनिवार वाड्यातील घडामोडींची माहिती इंग्रजांना पोहोचविण्याचे काम त्यांनी केलेच, पण १७ नोव्हेंबर १८१८ रोजी शनिवारवाड्यावरून मराठ्यांचा जरीपटका उतरवून इंग्रजांचे युनियन जॅक फडकविण्याचे कामही त्यांनीच केले. या घटनेमुळे बाळाजीपंतांवर फितुरीचा शिक्का बसला. त्याबदल्यात त्यांना वतने आणि पुण्यात वाडे बांधण्यासाठी जागा मिळाली.

पेशवाईच्या अस्तानंतर बाळाजीपंत साताऱ्यास गेले. तेथे त्यांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवली. मात्र शेवटी सर्व काही सोडून ते काशीला गेले व संन्यास घेतला. इ.स. १८५० मध्ये त्यांचे तेथे निधन झाले.

सदर वाडा हा दोन चौकी फरसबंदी रचनेचा आहे. वाड्याचा मुख्य दरवाजा मोठा असून त्यावरील गणेशपट्टी सुबक आहे. दरवाजातून आत गेल्यावर दोन्ही बाजूंना ओसरी आहे. पुढे दोन अंगणे असून मागील बाजूस तुळशीवृंदावन आहे. वाड्याच्या तळमजल्यावर माजघर, स्वयंपाकघर व इतर दालनांची मांडणी आहे. एकाच वेळी ५०–६० लोकांचा स्वयंपाक पूर्वी येथे होत असे. वरच्या मजल्यावर धान्याचे कोठार, तसेच आरसेमहाल आणि कारंजेमहाल अशी वैशिष्ट्यपूर्ण दालने होती. वाड्याशेजारी बाळाजीपंतांनी बांधलेले शिवमंदिर आहे. त्याच परिसरात पागा, गोठा होता. नातू कुटुंबाला पालखीचा मान होता. ती पालखी नंतर गणपती उत्सवात जोगेश्वरीच्या गणपतीसाठी दिली जाते.

आजूबाजूला आधुनिक इमारती उभ्या राहिल्या असल्या तरी हा वाडा अजूनही जुन्या पुण्याच्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे. #नातू_बोळातून जाताना या वाड्याकडे एक नजर टाकली की इतिहासाची अनेक पाने डोळ्यांसमोर उलगडत जातात.

संदर्भ :
पुण्यातील वाडे आणि वास्तू – डॉ. एच. वाय. कुलकर्णी
असे होते पुणे – म. श्री. दीक्षित
वैभव पेशवेकालीन वाड्यांचे – सौ. मंदा खांडगे

आठवणी इतिहासाच्या

Written By: आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment