महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

किल्ले नळदुर्ग, रणकंदन

By Discover Maharashtra Views: 1233 3 Min Read

किल्ले नळदुर्ग, रणकंदन –

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असलेला ही अद्भुत किल्ले नळदुर्ग – रणकंदन जोडगोळी. सोलापूरहून ४८ तर तुळजापूरहून ३२ किलोमीटरवर हा नळदुर्ग आहे. मोठा आकार, प्रेक्षणीय अशा अनेक वास्तू आणि मुख्य म्हणजे पाणीमहालाचे गूढ सौंदर्य या साऱ्यांमुळे हा किल्ला पर्यटकांपासून ते अभ्यासकांपर्यंत अनेकांना सतत खुणावत असतो.

१२६ एकर क्षेत्रफळ आणि त्याला तब्बल ११४ बुरुजांची दुहेरी तटबंदी, ही आकडेवारीच या किल्ल्याची भव्यता स्पष्ट करते.

नळदुर्ग ही चालुक्यांची निर्मिती आहे पण स्थानिक लोक त्याचा इतिहास अगदी पुराणातील राजा नल आणि दमयंतीपर्यंत नेऊन भिडवतात. चालुक्यांनंतर इथे बहमनी राजवट आली. या बहमनी राजवटीचे तुकडे झाल्यावर पुढे तो विजापूरच्या आदिलशाहीकडे गेला. या राजवटीतच सुलतान अबुल मुजफ्फर अली आदिलशाह पहिला याने इ.स. १५६० मध्ये गडाला आजचे हे आक्रमक रूप दिले. अशारीतीने चालुक्य, बहमनी, आदिलशाही, मुघल आणि सरतेशेवटी हैदराबादचा निजाम असा भलामोठा प्रवास करत हा नळदुर्ग आज एक राष्ट्रीय स्मारक बनला आहे.

गड विस्ताराने भलामोठा आणि त्यामध्ये ऐतिहासिक वास्तूंचा तेवढाच खजाना. हत्तीखाना, मुन्सिफ कोर्ट, जामे मशीद, धान्य – दारूगोळ्यांची कोठारे, ब्रिटिशांची स्मारके, मछली बांध, नऊ पाकळ्यांचा नवबुरूज, रंगमहाल, बारादरी, राजवाडा, राणीमहाल, उफळ्या ऊर्फ टेहळणीचा बुरूज असे गडावर बरेच पाहण्यासारखे आहे. पण या साऱ्यांत पाणीमहाल नळदुर्गच्या आणि सर्वांच्या हृदयस्थानी आहे.

नळदुर्गच्या या नदीजोड प्रकल्पास दुसरा इब्राहिम आदिलशाह याने इ.स. १६१३ मध्ये हे प्रकरण जोडले. जोडले कसले ऐन नदीपात्रात उभे केले. गडाच्या मधोमध वाहणाऱ्या या नदीप्रवाहावर त्याने एक भलामोठा बांध घातला. ज्यायोगे नदीपात्रामुळे विभक्त झालेला किल्ला तर पुन्हा जोडला गेलाच, पण त्यापेक्षाही या बांधाच्या पोटात एक महाल तयार करत या स्थापत्याला सौंदर्याचीही जोड दिली. स्थापत्य आणि पाण्याच्या सुंदर मिलाफातून तयार झालेला हाच तो पाणीमहाल. पाण्याचा हा भलामोठा पसारा महालावरील नर-मादी या दोन सांडव्यावरून विलक्षण वेगाने ओसांडत बाहेर पडतो. कुणी म्हणते नळदुर्गचे धबधबे वाहू लागले, कुणी पाणीमहाल जिवंत झाल्याची उपमा देते, कुणी नर-मादी जागे झाल्याचे बोलते, तर कुणी आणखी काही! त्या दोन धारा जिवंत होतात आणि जणू या चिरेबंदी वास्तूच्या अंगावरूनच चैतन्याचे झरे वाहू लागतात.

काय आणि कशी आहे, ही गूढरम्य वास्तू! १७४ मीटर लांब, अडीच ते १४ मीटर रुंद आणि तब्बल पाचमजली इमारतीएवढी म्हणजे १९ मीटर उंच! या बांधावरूनच चार मार्ग महालाच्या पोटात उतरतात. पहिला साधारण दोन मजले खाली उतरतो. इथे एक अष्टकोनी हौद, ज्यात कधीकाळी पाणचक्की चालत होती. पाण्याच्या शक्तीचा हा आणखी एक पैलू! साठलेले पाणी गतीने बाहेर पडत असतानाच त्यावर धान्याची चक्की चालविण्याची ही योजना. वेगवेगळ्या मोऱ्यांमधून वेगाने येणारे हे पाणी इतिहासात इथे या चक्कीला फिरवायचे आणि त्यावर साऱ्या सैन्यासाठीचे धान्य दळून निघायचे. वरवर वाटणाऱ्या सौंदर्याला आता विचार-हुशारीची किनारही जाणवू लागते.

टीम – पुढची मोहीम

Leave a comment