महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,20,037

महाराणी येसूबाई राणीसाहेबांनी मोरया गोसावींना लिहीलेले पत्र

By Discover Maharashtra Views: 2687 7 Min Read

महाराणी येसूबाई राणीसाहेबांनी मोरया गोसावींना लिहीलेले पत्र –

दि.२४ एप्रिल १७०५ या दिवशी महाराणी येसूबाई राणीसाहेबांनी मोगलांच्या कैदेतून आर्थिक अडचणी नंतर चिंचवडच्या मोरया गोसावी यांना लिहीलेले पत्र. महाराणी येसूबाई राणीसाहेबांनी मोरया गोसावींना लिहीलेले पत्र. येसूबाई राणीसाहेब छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर अत्यंत बिकट परिस्थितीत मोगलांच्या स्वाधीन झाल्या होत्या .औरंगजेबाने त्यांची खास व्यवस्था केली होती.येसूबाई राणी साहेबांच्या बरोबर कैदेत  राजघराण्यातील अनेक लोक होते. वारंवार होणारी आक्रमणे ,छावणीतील  लवाजम्याचा खर्च, त्यात भर म्हणून कैद्यांची व्यवस्था आणि मोगलांकरीता  उत्तरेकडून कडून येणारे अन्नधान्य, खजिना मराठे मधेच अर्ध्यापेक्षा जास्त लुटत असल्याने औरंगजेबाची आर्थिक स्थिती खालावत चालली होती .आपल्या राजधानी पासून दूर असलेल्या या मोगल बादशहाला महाराष्ट्रात आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला होता.

औरंगजेब, येसूबाई व शाहू महाराजांना सुखसोयी पोहचवत असला तरी छावणीतील इतर लोकांप्रमाणे येसूबाई राणीसाहेब व शाहूराजे यांनाही आर्थिक गोष्टीचा सामना करावा लागत होता. यावेळी येसूबाई राणीसाहेब व शाहूराजे अहमदनगरच्या किल्ल्यात होते. दुष्काळी परिस्थितीची झळ आपल्याला लागत आहे, तेव्हा कर्जरूपाने मदत करावी असे पत्र येसूबाई राणीसाहेबांनी चिंचवडकर देवांना लिहिले होते. हे पत्र २४ एप्रिल १७०५ मध्ये लिहिले आहे. या पत्रातून छावणीतील आपल्या दयनीय आर्थिक स्थितीचे वर्णन करून येसूबाई राणीसाहेबांनी चिंचवडकर देवांकडे मदतीची याचना केली आहे. हे पत्र म्हणजे येसूबाई राणीसाहेबांच्या  साहित्यविषयक गुणांचा एक नमुनाच म्हणावा लागेल. हे पत्र पुढील प्रमाणे होते –

॥   श्री शंकर  ॥

राजश्री श्री देव स्वामींचे सेवेसी श्रीमत परमपूज्य
तपोनिधी

मुक्तीदायक सकलगुणालंकरण देव वरदमूर्तीपरायण राजमान्य राजश्री आज्ञाधारक सेवेसी मातोश्री येसूबाई दोनी करकमल जोडून चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार विनंती, उपरी येथील क्षेम तागाईत वैशाख शुद सप्तमी गुरूवार जाणऊन मुकाम अहमदनगरी दुर्गात स्वामींच्या आशीर्वादेकरून यथास्थि असे स्वकिय कुशलेलखन – आज्ञा केली पाहिजे. विशेष बहुत दिवस जाले .स्वामींनी आशीर्वादपत्र पाठवून बालकाचा परामर्श केला नाही. याकरिता चित्तास स्वस्थता होत नाही ते देव जाणे. तरी स्वामिंनी येणारा मनुश्या बरोबरी प्रतिक्षणी आशीर्वाद पत्र स्वामींपाशी सत्यच लेखन केले पाहिजे. चिरंजीव दाजी तो पृथ्वीपती समागमे गेले. आम्हास सार्वभोमाची आज्ञा झाली की ‘अहमदनगर जावे ‘आज्ञांप्रमाणे आम्हास अहमदनगरास  घेऊन आले तेथे आलियावरी आजी पांच मास  झाले. परंतु खर्चाची बहुत तंगचाई जाली. काय निमित्त तरी सार्वभौम दूर गेले.

आमचा तनखा जो दिलहा  तेथे तांम्रांनी व हरीभक्तांनी व काही काळाने करून प्रतिकूल जाली. यामुळे द्रव्य येणे राहिले.येथे अहमदनगरी साहूकाराचे पाच – सात  सहस्त्र ब्रह्मस्व जाले. आता कोण्ही देत नाही .मागितल्या व पैकियास तगादे लाविले आहेत. त्यामुळे बहुत कष्टी होतो. तो दुःखसागर स्वामिंस काय म्हणऊन हावा ? स्वामिंच्या सेवेसी  रायाची जाधव पाठविला असे . तरी महाराज कैलासवासी स्वामी गेल्या तगाईत आपणावरी हा कसला प्राप्त झाला .’इंगळास वोळंबे लागले ‘इंगळा म्हणजे मोठा विंचू .व ओळंबे म्हणजे  क्षुद्र मुंग्या.पराक्रमी मराठा राज्याला मोगलरूपी क्षुद्र मुंग्या लागल्या आहेत,  ही खंत या पत्रात महाराणी येसूबाई राणीसाहेब व्यक्त करताना दिसतात. छत्रपती घराण्याची सुन शोभेल अशीच तेजस्वी व प्रखर वर्तणूक येसूबाई राणीसाहेबांची होती. महाराणी येसूबाई यांच्या कर्तुत्वाने मराठ्यांचा इतिहास ऊजळून टाकला आहे. छत्रपती संभाजी राजांच्या हत्येनंतर  छत्रपती शिवरायांच्या दोन सुनांनी महाराष्ट्रात स्वातंत्र्याची ज्योत तळपत ठेवली.  छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराराणी  हातात तलवार घेऊन रणरागिणी च्या रूपाने औरंगजेबाला पुरून उरल्या. मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर २९ वर्षे औरंगजेबाच्या कैदेत मात्र येेसूबाई राणीसाहेबांना व्यथित करावे लागले.

आता एक स्वामिच क्लेश परिहार करतील .इतरांच्याने काही होणे नाही .तरी सारांश गोष्टी की ब्रम्हदेवापासून मुक्त केलियाने बहुत  कीर्ती स्वामिंची आहे आणि पाऊसपाणी जालियावरी स्वामी ज्या पासून देवितील त्यास प्रविष्ट करून. परंतु हा समय आम्हावरी कठीण पडला आहे. आपले कोणी येथे प्रतिपक्षी

नाही, ऐसा  प्रसंग प्राप्ता झाला आहे. याचे निवारण करणार स्वामी आहेत. माझी उपेक्षा केली न पाहिजे. वरकड चिरंजीवाकडील सामराज व आमचे वर्तमान रायाजी मुखांतरी चरणापाशी विनंती करिता शृत होईल .ते सत्यच मानणे. विशेष ल्याहावे  तरी आपण आज्ञान,मूढ असे. लिहिता येत नाही. अथवा ज्ञान हि नाही. त्याही वरी आपण जवळी कोण्ही शहाणा कारकून नाही.अवाक्षराची  क्षमा केली पाहिजे.

कृपा आशीर्वाद निरंतर करीत गेले पाहिजे .कृपा असोदीजे जाणिजे मी सेवेसी सेवक बसवंताने चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग दंडवत विनंती उपरी लि परिसिजे. मी सेवक असे. आशीर्वाद पायी जाणे. जाणिले हे विनंती

२॥ छ.११ माहे मोहरम सन ४९ हे

विज्ञापना

माहेरहून व सासरहून सुशिक्षणाचे संस्कार येसुबाईंच्यावर झालेले होते. त्यामुळे त्यांचे हे पत्र म्हणजे साहित्याचा उत्कृष्ट नमुनाच म्हणावे लागेल. स्वतःच्या हालाखीच्या परिस्थितीचे वर्णन करताना त्यांनी कुठेही वांग्मयीन मर्यादा ओलांडली नाही.”चि. दाजी तो पृथ्वीपती समागमे गेले “या उल्लेखाची  मांडणीची पद्धत अतिशय सुरेख आहे. अहमदनगरच्या सावकारांनी येसूबाई ना पैसे देण्याचे नाकारले, या करून पुर्ण अनुभवाचे वर्णन त्या मोठ्या कष्टाने लिहितात. ज्या सावकारांना मराठी राज्यात आश्रय  मिळालेला होता,  त्या मराठी राज्याची निराश्रित राणी सावकारांबद्दल  लिहिताना कुठेही कटुता धरून वावगा शब्द लिहित नाही. प्रतिकात्मक तर्हेने  याचे वर्णन त्या ” इंगळास वोळंबे लागले “अशा तऱ्हेने करतात. यावरून त्यांची सुसंस्कृततेची ,सुविद्यतेची  कल्पना येते .साहित्यविषयक गुणही त्यांच्यात फार मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यांच्या पत्रातून ,वागण्यातून सुसंस्कृतेची खात्रीच पटते.

औरंगजेबाला एका गोष्टीची खात्री झाली होती की शाहूला धर्मांतरापासुन वाचविणारी  एकच व्यक्ती म्हणजे येसूबाई राणीसाहेब होत्या त्यामुळे औरंगजेबाचा  भ्रमनिरास झाला होता. त्यामुळे  कदाचित तो येसूबाई राणींकडे दुर्लक्ष करीत असावा. शाहूराजे हे त्यांचे मनसबदार होते. बादशहाच्या ‘गुलालबार’

छावनीमधे शाहूराजे  राहत होते, मग त्यांच्या आईंची अशी दुर्दशा का व्हावी ? औरंगजेबाने येसूबाई राणीसाहेबांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे हे स्पष्ट दिसते. त्यामुळे येसूबाई राणीसाहेबांच्या  वाट्याला कर्जबाजारीपणा आला हे  स्पष्ट होते.

राणीसाहेबांची हे पत्र वाचल्यानंतर मन हेलावून जाते. मराठ्यांच्या या अभिषिक्त राणीला औरंगजेबाच्या छावणीतून पैशासाठी याचना करावी लागते ,यासारखे दुसरे दुर्दैव ते कोणते? एखाद्या मराठा सरदारास पत्र लिहिले असते तर ते शंकास्पद झाले असते. म्हणून कदाचित देवस्थानच्या मठाअधिकार्यांना  येसूबाई राणींनी पत्र लिहिले असावे .महाराष्ट्रात ताराराणींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे कार्य सुरू असल्याने कोणाकडूनही मदत मिळण्याची आशा नव्हती. म्हणून येसूबाई राणीसाहेबांनी सरळ चिंचवडच्या देवस्थानाकडे मदतीची याचना केलेली दिसून येते.

संदर्भ –
महाराणी येसूबाई – संस्कृती प्रकाशन पुणे.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Leave a comment