महादेव मंदिर कोरेगाव, श्रीगोंदा

महादेव मंदिर कोरेगाव, श्रीगोंदा

महादेव मंदिर, कोरेगाव –

अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या श्रीगोंदा तालुक्यात श्रीगोंदा व नगर तालुक्याच्या सीमेवर, नगर शहरापासून साधारणपणे ३० किलोमीटरवर कोरेगाव हे साधारणपणे दोन हजार लोकवस्ती असणारे छोटेसे गावं वसले आहे. गावं जरी छोटसं असलं तरी गतकाळातील आपल्या समृद्ध इतिहासाच्या पाऊलखुणा आजही उराशी बाळगून आहे. गावात असणारे महादेवाचे पुरातन मंदिर व मंदिर परिसरातील असंख्य शिल्पावषेश आजही गावच्या गतवैभवाची साक्ष देतात.(महादेव मंदिर कोरेगाव)

गावात प्रवेश केल्यानंतर प्रथमतः एक भव्य दगडी प्रवेशद्वार आपले स्वागत करते. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर काही अंतरावर महादेवाचे यादवकालीन मंदिर उभे असून ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. मंदिर परिसरात आल्यानंतर प्रथमतः मंदिराच्या डाव्या बाजूला नव्याने बांधण्यात आलेल्या ओवरीला टेकून उभे असलेले गजलक्ष्मीचे सुरेख शिल्पं आपल्या नजरेस पडते. शिल्पाचा खालील काही भाग जमिनीत रुतलेला असला तरीही शिल्लक भागावरून आपल्याला शिल्पाच्या सौंदर्याची कल्पना येते.

महादेवाचे मंदिर पूर्वाभिमुख असून नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आपल्याला दिसून येते. मंदिराचा काही प्रमाणात जीर्णोद्धार करण्यात आलेला असून गर्भगृहावरील शिखर नव्याने बांधण्यात आले आहे. नंदीमंडपातील नंदी भग्न असला तरी सुबक आहे. नंदीमंडपाजवळ तसेच मुख्य मंदिराच्या अवतीभवती आपल्याला असंख्य वीरगळ व शिल्पं नजरेस पडतात.

मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सभामंडपाची द्वारशाखा शिल्पांनी सजलेली असून गर्भगृहाची द्वारशाखा मात्र अगदी साधी आहे. सभामंडप चार स्तंभावर तोललेला दिसून येतो. अंतराळात सर्पशिळा, गणेश, शिवपार्वती आलिंगन मूर्ती, पंचमुखी लिंग तसेच इतर काही शिल्पं आपल्या नजरेस पडतात. गर्भगृहात दक्षिणोत्तर शिवलिंग विराजमान आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी इथे मोठी गर्दी होते व महाशिवरात्रीला यात्रा भरते. आपल्या पूर्वजांनी वारसा रूपाने आपल्याकडे सोपवलेला हा ठेवा पुढील पिढीकडे सुपूर्त करणे आपले कर्तव्य असून त्यासाठी तो जपण्याची नितांत आवश्यकता आहे.

©️ रोहन गाडेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here