महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १५ | फैजपूर काॅंग्रेस अधिवेशन

By Discover Maharashtra Views: 2453 5 Min Read

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १५ | फैजपूर काॅंग्रेस अधिवेशन –

कदाचित खालील माहिती ही जंत्री आणि यादीच वाटेल पण ती महत्वाची आहे कारण हे अधिवेशन खेड्यात भरवायचे आणि तळागाळातील लोकांपर्यंत राष्ट्रीय राजकारण पोचवायचे, त्यांना सहभागी करून घ्यायचे हा हेतू समोर ठेवून हे अधिवेशन झाले. त्यामुळे सुविधा नसलेल्या भागाची ओळख नेत्यांना झाली,खऱ्या अर्थाने नेतृत्वाला भारत समजायला हवा शिवाय, लोकांना सुद्धा राष्ट्रीय नेतृत्व समजायला हवं,एका प्रकारे दोघांत पुल बांधण्याचे काम या अधिवेशनात झाले आणि गांधीजींचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल.  अधिवेशन फैजपूर येथे घेण्याचे ठरले तेव्हा धनाजी नाना चौधरी यांनी स्वयंसेवकांची सेना उभारली आणि अधिवेशनाचे आव्हान स्वीकारले. शंकरराव देव, न.वि.गाडगिळ, केशवराव जेधे, पुरूषोत्तम हरी तथा रावसाहेब पटवर्धन, आप्पासाहेब पटवर्धन, बाळ गंगाधर खेर, प्रांतिकचे सचीव गो.आ.देशपांडे, विनोबा भावे, अवंतिका गोखले, प्रेमा कंटक,एस.एम.जोशी आणि साने गुरुजी यांनी अधिवेशनासाठी मेहनत घेतली तर वासुदेव विठ्ठल दास्ताने, देवकीनंदन नारायण, शंकरशेठ काबरा, राजमल लखीचंद शेठ, पुनमचंद ओंकारदास , माधव मार्तंड  देशपांडे, प्रतापशेठ, कोटीभास्कर, लाटे, देसकर, कोरान्ने वकिल, अनंत रामचंद्र कुलकर्णी,सोनू गणेश कुलकर्णी, विश्वनाथ बोचरे, सुकाभाऊ चौधरी, सीताराम भाऊ चौधरी, रामभाऊ भोगे, लोटुभाऊ फेगडे, ठकार आणि अनेक अनामिक कार्यकर्ते यांनी अपार कष्ट घेतले. लहान-मोठे कार्यकर्ते खेडोपाडी जाऊन जनजागृती साठी झटत राहिले.(खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १५ – फैजपूर काॅंग्रेस अधिवेशन)

अधिवेशनाच्या समस्यांमध्ये प्रचंड मुसळधार पावसाने मोठी भर घातली. अशा परिस्थितीत शेकडो शेतकरी, महिला आणि युवकांनी पडेल ते काम केले. वाहतूक व्यवस्था नसल्याने बैलगाड्यांचा वापर करणे क्रमप्राप्त होते. विहीरीतून पाणी काढायचे डिझेल इंजिन मधून मधून बंद पडल्यामुळे मोटेचा वापर करून पाणीपुरवठा करावा लागला. पिठाच्या गिरण्या नसल्याने महिलांनी जात्यावर दळणे केली, तर शेतकऱ्यांनी विनामूल्य भाजीपाला पुरवला. शिवाय  सावदा गावाच्या बाहेरून श्रमदानातून रस्ता तयार झाला. अशा प्रकारे हे अधिवेशन जनतेच्या श्रमातून उभे राहिले. भोजनव्यवस्था आणि निवाऱ्याची व्यवस्था कंत्राटी पद्धतीने न देता जनतेच्या सहभागातून आणि उत्स्फूर्त श्रमदानातून उभारण्यात आली होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व्यवस्था चोख ठेवली गेली म्हणून गांधीजी अतिशय संतुष्ट झाले. असे गुप्तचरांनी लिहिले आहे.शिवाय सर्व समाज एकत्र येऊन काही तरी  बांधिव काम करू शकतो हे लोकांना समजले.

अधिवेशनाच्या निमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस समाजवादी पक्षाच्या कार्यकारिणीची फैजपूर येथे बैठक झाली. त्यात जयप्रकाश नारायण यांचा काँग्रेसची ध्येयधारणा या विषयावर ठराव संमत करण्यात आला. काँग्रेस समाजवाद्यांनीही  अधिवेशनाच्या यशासाठी खूप मेहनत घेतली. तसेच रॉयवादी आणि कम्युनिस्ट पक्षांच्याही बैठका झाल्या. याच अधिवेशनात प्रथम हजर असलेल्या मानवेंद्र रॉय यांनी समाजवादी व कम्युनिस्टांना  काँग्रेसमध्ये राहण्याचा व काँग्रेस अंतर्गत डावा गट उभा करण्याचा सल्ला दिला. कम्युनिष्टांनी आपला स्वतंत्र असा मार्क्सवादी गट बनवणे राष्ट्रहिताचे नाही असेही राॅय यांनी प्रतिपादन केले.

( सी. आय.ओ. मुंबई याचा अहवाल)

आखील भारतीय चरखा संघ, आखिल भारतीय ग्रामोद्योग संघ, शांती निकेतनचे सुप्रसिध्द कलावंत नंदलाल बोस आणि विनोबाजी या सर्वांनी फैजपूर अधिवेशनात मोठं योगदान आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने त्रिदल महाराष्ट्रातील सर्व काँग्रेस आणि विधायक क्षेत्रातील कार्यकर्ते यांना एकत्र आणून कामाला लावण्याची देवांची कल्पना होती ती पुर्णपणे सफल झाली.

पुर्व खानदेशातील अधिवेशन हे शेतकऱ्यांचे ठरावे या निर्धाराने साने गुरुजी,सुकाभाऊ चौधरी,लोढुभाऊ फेगडे, धनजी महारू बोंडे, यांनी ४०-५० स्त्री-पुरुष यांना बरोबर घेऊन जिल्ह्यातून पायी दौरा केला. या अभिनव पदयात्रेने आणि प्रचाराने भरपूर जागृती झाली. साने गुरुजी यांनी नवीन शक्ती काँग्रेसला प्रदान केली तर खर्चाचा प्रश्न आला तेंव्हा यावलचे माधवराव देशपांडे यांनी स्वागत समितीला तूट आली ती भरून काढण्यासाठी वीस हजार रूपयांची देणगी देत आहेत असे जाहीर केले. स्वागत समितीने दिड लाख रुपये अधिवेशनासाठी उभे केले होते.

अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी जवाहरलाल नेहरू तर स्वागताध्यक्ष देव आणि समितीचे सरचिटणीस धनाजी नाना चौधरी हे होते. सरचिटणीस म्हणून दास्ताने, गो.आ. देशपांडे, गोकुळभाई भट, शंकरराव ठकार, आणि शंकरभाऊ काबरे यांची निवड झाली.

आप्पासाहेब पटवर्धन सफाई विभागाचे प्रमुख, तर अहमदनगर येथील पुरूषोत्तम हरी पटवर्धन स्वयंसेवक दलाचे प्रमुख आणि स्वागत समितीने खजिनदार बाळकृष्ण चिंतामण लागू होते. स्वयंसेविका दलाची जबाबदारी प्रेमा कंटक यांच्यावर सोपवण्यात आली होती.

फैजपूर येथील अधिवेशनात शेकडो महिलांनी उत्कृष्ट्यपणे सेवा केली. व पुढे निवडणूक मोहिमेत खूप काम केले.

नक्की काय काय ठराव झाले या अधिवेशनात? पुढच्या लेखात खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १६.

संदर्भ: महाराष्ट्र राज्य गॅझेटियर जळगाव जिल्हा १९९४.

माहिती संकलन  –

चित्रकार प्रकाश तांबटकर, ललितकला भवन, खिरोदा
Leave a comment