महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

कावल्या बावल्या खिंड

By Discover Maharashtra Views: 1748 8 Min Read

कावल्या बावल्या खिंड –

सामान्य मराठ्यांच्या असामन्य लढ्याची साक्षीदार.

शिवतिर्थ रायगड , स्वराज्याची राजधानी येथील टकमक टोकावर उभे राहुन उत्तरेस नजर टाकली तर नजरेत भरणार्या डोंगर माळेत आकाशाला गवसणी घालणारे एक शिखर दिसते. जे कोकणदिवा  म्हणून प्रचलित आहे. असे म्हणतात पुर्वीच्या काळी मार्ग कींवा दिशा दाखवण्यासाठी या शिखरावर दिप प्रज्वलीत केला जात असे. याच डोंगर राज्याच्या कुशितुन एक खिंड डोकावते.   हीच ती खिंड जी गेली कीत्येक वर्षे इतिहास तसेच दुर्ग प्रेमींच्या सहवासाला मुकलेली कावल्या बावल्या खिंड.

कावल म्हणजे पावसाळी ऋतू मध्ये जलधारांनी डोंगर दर्यांतून उड्या मारत तैयार केलेला मार्ग. अशाच कावलांच्या परीसारतील कावळ्या घाट तसेच ह्याच घाटाला लागून असलेली खिंड कावल्याची खिंड म्हणून प्रसिद्ध आहे. ह्याच खिंडीच्या पश्चिमेला असलेला बावल्या गाव म्हणून ह्या खिंडीला कावल्या बवल्याची खिंड म्हणून ओळखतात. परंतु स्थानिकांच्या सांगण्यावरून कावल्या बवल्याची खिंड ही केवळ कावल्या घाटाच्या हद्दीत येते.

इतिहासाची सुवर्ण पाने चाळताना खिंड हा शब्द ऐकण्यात किंवा वाचनात आला कि डोळ्यासमोर राहते ती नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या रक्ताने पावन झालेली पावनखिंड त्याच बरोबर प्रतापराव गुजर व त्यांचा सहा रणमर्द  सहकार्यांनी लढवलेली नेसरीची खिंड किंवा शिवरायांनी करतलब खानची फजेती केलेली उंबरखिंड मात्र अशा कित्तेक खिंडी, रणक्षेत्र अजूनही इतिहाच्या पानाआड लपली आहेत. कुणीतरी येईल, तिथे घडून गेलेला रक्तरंजित इतिहास उलघडेल, त्या अनमोल त्यागाची जाणीव विश्वाला करून देईल. केवळ ह्या आशेने !

असाच धारातीर्थांपैकी दुर्गदुर्गेश्वर रायगड नामक तीर्थक्षेत्राच्या दर्शनाने पावन झालेली कावल्या बवल्याची खिंड.

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या छायेत उत्तर दिशेला विसावलेल्या संदोशी गावातून थेट कोकण दिवा ह्या ठिकाणी जायचे असल्यास कावल्या बवल्याच्या खिंडीतून जावे लागते. शिवकाळात याच संदोशी गावात मोठी व्यापारी पेठ होती असे उल्लेख सापडतात. तसेच समोर दिसणाऱ्या कावळ्या घाटातून जाणारा मार्ग हा मोठ्या रहदारीचा होता. महाडच्या बंदरात जलमार्गाने आलेला माल हा बैलांच्या मदतीने व्यापारी पेठेत व तेथून घाट मार्गाने वरघाटी नेला जाई. येथे होणाऱ्या रहदारीवर लक्ष व त्याच बरोबर नियंत्रण ठेवण्यासाठी कोकण दिव्याचा वापर केला जात असे.

कावळ्या घाटाचा तसेच खिंडीचा वाढता वापर तसेच रहदारी लक्षात घेऊन थोरल्या स्वामींनी (छत्रपती शिवाजी महाराजांनी) मोरोपंत पिंगळेना सांगून सुरक्षेच्या दृष्टीने सर्कले नाईक (सोबत असलेल्या ९ सैनिकांचे नाईक) म्हणजेच जिवाजी सर्कले नाईक ह्यांची नियुक्ती केली. काहींच्या मते हे सर्कले घराणे शिवकाळाआधी  दांडा राजपुरीच्या (आत्ताचे मुरुड, रायगड) रामजी कोळ्याचे आरमार सांभाळत होते. रामजी कोळ्याने दिलेल्या सरखेल ह्या पदवीचा अपब्र्वंश होऊन सर्कले नाम पावले. तर काहींच्या मते किल्ले सर करण्यासाठी पटाईत असलेला मावळ्यांचा समूह तो सर्कले. असो !! येथे सखोल अभ्यासाची गरज आहे. गेली कित्तेक वर्षे काळाच्या पडद्या आड लपून राहिलेली कावल्या बावल्या खिंड जनमानसात प्रचलित न्हवती तेथे एका मनुष्य कुळाचा अभ्यास तर दूर राहतो.

स्वराज्याचे थोरले स्वामी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मृत्यू नंतर स्वराज्याचे आकाश काळवंडून गेले होते. हीच नामी संधी आहे, दक्षिणेत स्वताचे साम्राज्य प्रस्थापित करण्याची हे मनी ठेवून स्वतः दिल्लीपती आलमगीर औरंगजेब चाल करून आला खासे दक्खन वर. मात्र ह्याच वेळी सह्याद्रीच्या मुशीत आणि जिजाउंच्या कुशीत वाढलेला शिवपुत्र छावा रुद्राचा अवतार धारण करून मोघली फौजेसमोर उभा ठाकला. शंभू छत्रपतींच्या म्हणजेच धाकल्या स्वामींच्या क्रोधाग्नीमध्ये पोवळून निघाल्यावर औरंगजेबास कळून चुकले शस्त्रानिती व गनिमीकाव्या मध्ये शंभूराजा हा शिवाजी राज्यांच्या सुद्धा एक पाउल पुढे आहे. अखेर सिंहाचा छावा तो, भितो कि काय ! संभाजी राज्यांचे ते नेतृत्व, कर्तुत्व व प्रभुत्व पाहून आत्मविश्वास ढाळलेल्या औरंगजेबाने आपली पावले वळवली आदिलशाहीच्या रोखाने. आपल्याच जातभाईंच्या रक्ताने स्वतची तहान भागवून घेतली.

संपूर्ण आदिलशाही बघता बघता काही काळातच नेस्तनाभूत झाली. आता परत औरंगजेबाने मराठ्यान विरुद्ध मोहिमा उघडल्या. परंतु आता संभाजी राज्यांच्या स्वराज्य रुपी अश्वमेधाचा रथ रोखणे कठीण झाले होते. मात्र नियतीने कुचखाल्ली, स्वराज्याच्या त्याच बरोबर मराठ्यांच्या नशिबाचे फासे पालटले. शके १६१० विभव संवत्सरे माघ वद्य सप्तमी, शुक्रवारी संभाजी राजे व कवी कलश हे संघमेश्वर येथे मोघली सैन्याच्या कैदेत सापडले. तब्बल ४० दिवस जाचक अत्याचार व मृत्यूप्राय यातना भोगून फाल्गुन वाद्य ३०, अमावसेच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश ह्यांना औरंगजेबाने तुळापुर येथे जीवे मारीले. शंभूरत्नाची प्राण ज्योत मावळली. आता औरंगजेबाची पापी नजर फिरली रायगडाच्या दिशेने. त्याने रायगडा भोवतीचे फासे आवळण्यास सुरुवात केली.

शके १६११ शुक्ल संवत्सरे, चैत्र शुद्ध १५ औरंगजेबाच्या हुकुमानुसार जुल्फिकार खानाने रायगडास वेढा घातला. ह्याच वेळी संपूर्ण राज घराणे येसूबाई, राजाराम महाराज, ताराबाई तसेच इतर दरबारी मंडळी रायगडावर अडकून पडले. हीच संधी, सुवर्ण संधी ठरवण्याच्या हेतूने औरंगजेबाने शहाबुद्धीन खानाला जुल्फिकार खानच्या मदतीस धाडले. स्वराज्यावर धावून येणारे संकट पाहून माणकोजी पांढरे सारखे कर्मदरिद्री मराठे मोघलाना शामिल झाले.

आई जगदंबा मदतीस धावून आली. मोघलांचा व कपटी देशद्रोह्यांचा काळा डाव हेरखात्याने हेरला व तत्काळ रायगडच्या पायथ्याशी असलेल्या संदोशी गावातील जिवाजी नाईक सर्कले व गोदाजी जगताप ह्या दोन सरदारांना सांगितला. स्वराज्यावर चालून येणारे संकट आणि त्याचे परीणाम लक्षात घेत हे दोन्ही वीर सोबत असलेले ९ मावळे  घेऊन मोघली हिरवे वादळ रोखण्यास सज्ज झाले. हरणाच्या वेगाने व सिंहाच्या छातीने सारे वीर खिंडीच्या दिशेने धावु लागले व बघता बघता खिंडीच्या तोंडाशी येऊन ठाकले. प्रत्येकाने आपल्या आपल्या हल्ल्याच्या जागा हेरल्या. मराठमोळ्या गोफणी शत्रू सैन्यावर बरसण्यास तैयार झाल्या.

पुढील काहीच क्षणात रणसंग्राम पेटले. मोघली सैन्याची पहिली फळी खिंडीच्या तोंडाशी आली. “ दिन दिन , अल्ला हो अकबर “ च्या आरोळ्यानवर “ हर हर महादेव , छत्रपती शिवाजी महाराज कि जय “ ह्या घोषणांनी खिंडीचा आसमंत निनादून सोडला.  शत्रू सैन्य खिंडीच्या ऐन टप्प्यात आलेला पाहून, मराठ्यांच्या गोफणी फेर धरू लागल्या. आकाशातून जसा उल्कापात व्हावा तसा मराठ्यांचा गोफणी आता आग ओकत होत्या. मोघलांची पहिली फळी गडद झाली. मग दुसरी तशीच तिसरी , मात्र आता मोघलांनी मराठ्यांच्या लपण्याच्या जागा टिपल्या व शरवर्षाव सुरु झाला. खिंडीच्या कडे कपारीत लपलेल्या मावळ्यांना आता बाहेर पडण्याखेरीज उपाय न्हवता. एक एक करत सारे वीर खिंडीत येऊन ठाकले.मग कंबरेला लटकलेल्या अर्धांगिनी (समशेर) हाती घेऊन सारे वीर शत्रू वर तुटून पडले. भेटेल त्याला, भेटेल तेसे, कपात, तुडवत मराठे वीर पुढे सरकू लागले. अंगावर झालेल्या जखमा जमिनीवर रक्ताभिशेख करत होत्या. मणभर मोगली फौजे पुढे कणभर मराठे पुरून उरले. काही मराठे वीर खिंडीत कमी आले. सेंदूर फासलेल्या हनुमंता सारखे सारे वीर दिसू लागले. “ रणचंडिका प्रसन्न झाली.“ मराठ्यांचा तो आवेश पाहून मोघली सैन्य माघार घेऊन पळू लागले. पराक्रमाची शर्थे झाली. मोघलांच्या वाढीव तुकड्या जुल्फिकार खानाच्या फौजेला मिळण्यात असमर्थ झाल्या. मोघलांचा हा डाव गोदाजी जगताप व जिवाजी सर्कले नाईक तसेच त्या नऊ योध्यांनी हाणून पडला आणि इतिहासात अजरामर झाले.

शके १६११ शुक्ल संवत्सरे, चैत्र वैद्य १० , शुक्रवारी राजाराम महाराज वाघ दरवाजा मार्गाने प्रतापगडी निघून गेले. स्वराज्य अस्मियतेची लढत कायम झाली. औरंगजेबाने रक्ताचे पाणी केले मात्र मराठ्यांचे अबाधित स्वतंत्र कधीही हिरावू शकला नाही. ह्याच स्वराज्याच्या मातीत संपला पण स्वराज्याची माती काही करू शकला नाही.

गोदाजी जगताप व जिवाजी सर्कले नाईक तसेच त्यांच्या त्या ९ धैर्यवेड्या साथीदारांनी दिलेल्या अद्भुतपूर्ण कावल्या बावल्या खिंडीतील लढतीने स्वराज्य वरील लढतीचा काय पालट केला. जर खिंडीतील युद्ध प्रसंगाचे परिणाम काही उलट झाले असते तर मात्र स्वराज्य अस्मियतेचा सुवर्ण सूर्य केंव्हाच मोघली रीयासातीत अस्ताला गेला असता.हे स्वतंत्र अबाधित राहिले ते केवळ कावळ्या बावल्या  खिंडीतील रणसंग्रमामुळे.

खिंडीत कमी आलेल्या त्या सर्व स्वराज्य रत्नांच्या चरणी शतशः प्रणाम.

संदर्भ –
किल्ले रायगड कथापंचविसी – आप्पा परब
जेधे शकावली
भटकंती मराठ्यांच्या धरतीर्थांची – पराग लिमये.

लेखन – अनिकेत अशोक पाटील

Leave a comment