महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,68,723

कोपेश्वर मंदीर, खिद्रापूर, कोल्हापूर जिल्हा

By Discover Maharashtra Views: 340 12 Min Read

कोपेश्वर मंदीर, खिद्रापूर, कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्ह्यातल्या खिद्रापूर या छोट्याशा गावात महादेवाचं सुंदर मंदीर आहे. शिरोळ तालुक्यातलं हे गाव कोल्हापूरपासून ५५ किमी तर नरसोबावाडीपासून १८ किमी वर आहे. आम्ही कोल्हापूरहून हुपरी मार्गे सकाळी साडेदहा वाजता खिद्रापूरला पोहोचलो. मंदिराच्या समोरच पार्किंगसाठी जागा आहे. श्री. बिट्टू कागवाडे (9730321018) या गाईडबरोबर आम्ही मंदिर पहायला चालू केलं. श्री. कागवाडे यांना मंदिराबद्दल खूपच माहिती आहे. १२ व्या शतकात बांधलेलं हे कोपेश्वराचं मंदीर त्यावेळच्या कोल्हापूरच्या शिलाहार राजघराण्याने बांधलेलं आहे. कृष्णा नदीच्या काठावर खिद्रापूर वसलेलं आहे आणि नदीच्या पलीकडचा भाग हा कर्नाटक राज्यात येतो. ज्याठिकाणी नदी चंद्राकृती वळण घेते ती जागा पवित्र मानली जाते. इथेही कृष्णेने चंद्राकृती वळण घेतलेलं आहे. म्हणूनच ही जागा या मंदीरासाठी निवडण्यात आली असावी. पंढरपूरलाही चंद्रभागेने असेच वळण घेतलेलं आहे. हे मंदीर पूर्णतः अग्नीजन्य दगडात (Basalt) बनवलेलं आहे. खरतर इथं वापरलेला दगड या गावाच्या आसपास सापडत नाही. हा दगड भोगावती नदीच्या परिसरातून पंचगंगा व कृष्णा नदीमधून वाहून आणला असावा असा अंदाज आहे.

कोपेश्वर या नावामागे एक पौराणिक कथा आहे. इथून जवळच असलेल्या कर्नाटक राज्यातल्या ‘यडूर’ या गावात दक्ष राजाने एका यज्ञाचं आयोजन केलं होतं. दक्षाच्या ‘सती’ (किंवा ‘दाक्षायणी’. सतीला दक्षिणेकडे दाक्षायणी म्हणतात) या मुलीने वडिलांच्या मनाविरूद्ध महादेवांशी लग्न केलं होतं. आणि म्हणून दक्षाने सती व शिवांना आमंत्रण दिलेलं नव्हतं. याबद्दल विचारणा करण्यासाठी सतीने यज्ञाच्या ठिकाणी जाण्याचा हट्ट केला. तेंव्हा महादेवांनी स्वतः तिथे जाण्यास नकार दिला पण तिला नंदीला बरोबर घेऊन जाण्यास सांगितले. नंदीला यडुरच्या वेशीवरच अडवलं गेलं व आत प्रवेश करू दिला नाही. सतीला पाहून दक्षाने महादेवांची निर्भत्सना केली. आणि हा पतीचा अपमान सहन न होऊन सतीने स्वतःला यज्ञामधील अग्नीच्या स्वाधीन केलं. हे जेंव्हा महादेवांना समजलं तेंव्हा ते अतिशय क्रोधीत झाले. कोपलेले महादेव म्हणजेच कोपलेला ईश्वर म्हणून कोपेश्वर हे नाव पडलं. शिवांनी तांडव नृत्य करत आपल्या जटेपासून वीरभद्र नावाचा गण तयार केला व त्याला दक्षाचे डोके उडवण्याचा आदेश दिला. रागावलेल्या महादेवांना शांत करण्यासाठी भगवान विष्णू स्वतः इथं आले. आणि म्हणूनच या मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवांच्या शिवलिंगासोबतच धोपेश्वर या लिंगरूपात भगवान विष्णूही विराजमान आहेत. या मंदिरात नंदी नाही कारण तो सतीबरोबर यडूरला गेला व तिथेच थांबला. यडूरमधे नंदीचं एक मंदीर आहे जिथे नंदी हा मुख्य देव आहे.

काही इतिहासकारांच्या मते या भागाचं पूर्वीचं नाव ‘कोपम’ असं होतं. त्यावरून ‘कोपेश्वर’ हे नाव पडलं असावं. या मंदीरात एकूण १२६ खांब आहेत. इथल्या आतल्या प्रत्येक आणि प्रत्येक खांबावर कोरीव काम आहे आणि बाहेरच्या बाजूने खालपासून वरपर्यंत अगणित शिल्पं कोरलेली आहेत. रामायण, महाभारत, पुराण यातले प्रसंग व त्यातली महत्वाची पात्रं, देवादिकांच्या मुर्त्या अशा असंख्य गोष्टी इथं पहायला मिळतात. गाभारा किंवा गर्भगृह, अंतराळ, सभामंडप व स्वर्गमंडप अशी या मंदिराची रचना आहे. गर्भगृहात मुख्य देवता आहे. अंतराळात पालखी वगैरे गोष्टी ठेवलेल्या असतात. सभामंडप व स्वर्गमंडपात गायन वादन अशा सेवा सादर केल्या जातात किंवा धार्मीक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.

एका दारातून आम्ही मंदीराच्या आवारात आलो. हा बाहेरच्या दाराचा भाग इतका साधा आहे की आतमधे एवढं सुंदर मंदीर आहे अशी कल्पनासुद्धा करता येणार नाही. प्रथम गाभाऱ्यात देवाचं दर्शन घेऊन बाहेरच्या स्वर्गमंडपापासून मंदीर पहायला सुरू केली. हा स्वर्गमंडप एकूण ४८ खांबांवर उभा आहे. या मंडपात चारही बाजूंनी प्रवेश करता येतो. मंडपाच्या मधोमध वरच्या बाजूला छत गोलाकार उघडं आहे. आणि याच्या बरोबर खाली त्याच आकाराची अखंड शिळा आहे. याला रंगशीळा असही म्हणतात. काहींच्या मते ही शिळा वरती ठेवायची राहून गेली आहे. पण ते तितकसं बरोबर नसावं कारण पावसाचं पडणारं पाणी वाहून जाण्यासाठी चारही बाजूने व्यवस्था केलेली आहे. या जागेचा उपयोग गायन, वादन, नृत्य या कला सादर करण्यासाठी किंवा होम हवन करण्यासाठी केला जात असावा.

या रंगशीळेच्या भोवती गोलाकार १२ खांब आहेत. या बाराही खांबांवर खाली वेगवेगळ्या मदिरांच्या गोपुरांचं डिझाइन कोरलेलं आहे तर मधल्या भागात जाळी कोरलेली आहे. जाळीमधे बोट आत जाऊ शकतं. अखंड दगडात ही जाळी कशी काय तयार केली असेल? काय हत्यारं वापरली असतील? कुशल कारागीरच हे करू जाणे! या बारा खांबांवर वरच्या भागात आठ दिशांचे देव (दिक् पाल) आणि विष्णू व कार्तिकस्वामी यांची शिल्पं आहेत. पूर्वेचा व इतर दोन अशा तीन खांबांवर शिल्पं नाही आहेत. ही तीन शिल्पं काळाच्या ओघात पडून गेली असावीत. या शिल्पांचं वैशिष्ठ्य असं की यातले देव आपापल्या वहानांवर सपत्नीक ‘डबलसीट’ बसलेले आहेत! कार्तिकस्वामी ब्रम्हचारी असल्यामुळे ते फक्त एकटेच मोरावर दाखवले आहेत. वायव्येला वायू सपत्नीक हरिणावर आरूढ आहेत तर उत्तरेला कुबेर घोड्यावर आहेत. या मंडपात जे काही कार्यक्रम होत असतील त्याला या सर्व देवदेवतांना आमंत्रण दिलेलं असायचं अशी कल्पना!

कार्तिक पौर्णिमा आणि माघ पौर्णिमेला चंद्र स्वर्गमंडपाच्या खुल्या गोलाकाराच्या बरोबर मध्यावर येतो. हा सोहळा पहाण्यासाठी बरीच लोकं इथं गर्दी करतात.

स्वर्गमंडपातून सभमंडपात आलो. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला पाच पाच द्वारपाल कोरलेले आहेत आणि वरच्या बाजूला सरस्वती आहे. हा सभामंडप ६० खांबावर उभा आहे. इथल्या खांबांवर खूप वेगवेगळ्या प्रकारचं कोरीव काम बघायला मिळतं. इथं एक सुंदर व्याल शिल्प बघायला मिळतं. व्याल म्हणजे वेगवेगळ्या प्राण्याचं एकत्रीत शिल्प. यात मगरीचं तोंड आहे, पाय वाघ किंवा सिंहाचे आहेत, पाठीमागे मोराचा पिसारा आहे. मगरीच्या तोंडाच्यावर हत्तीचा दात आणि सोंड दिसते आहे आणि सोंडेत कमळाचे फूल आहे. (सर्व फोटो कृपया झूम करून बघा.)
शैव द्वारपालाची ७ फूटी अखंड शीळेतील मूर्ती आहे. हा शिवाचा द्वारपाल असल्यामुळे याच्या मुकुटात मानवी कवट्या आहेत, गळ्यात साप आहे आणि बाजूबंदात रूद्राक्ष आहे. द्वारपाल असल्यामुळे त्याची शारिरीक तंदुरूस्तीही व्यवस्थित दाखवली आहे.

इथलं कोरीव काम कसं केलं गेलं असेल त्याची एक झलक बघायला मिळते. खालच्या पहिल्या फोटोतल्या डाव्या भागात डिझाईन काढून घेतलं आहे. आणि उजव्या भागात कोरीव कामाला सुरवात केलेली आहे. तर दुसऱ्या फोटोत काम पूर्ण झालेलं आहे. थोडा भाग तुटलेला आहे पण अंदाज लावता येईल. हेच डिझाईन आणखी काही खांबांवर आहे. त्यामुळे हे डिझाईन बनवताना साच्याचा वापर झाला असावा.
याचप्रमाणे आणखीनही काही गोष्टी इथे अपूर्ण आहेत. कदाचित कारागीर सोडून गेला असावा किंवा त्याचा मृत्यू झाला असावा. कदाचित युद्धामुळे काम बंद पडलं असावं.
एका खांबावर किर्तीमुखाचं सुंदर काम बघायला मिळालं. किर्तीमुख हा सतत खातच असतो. यामागची कथा अशी आहे की एका राक्षसाचा नाश करण्यासाठी शिवांनी एका भयानक सिंहाची निर्मिती केली. पण तो राक्षस शरण आल्यामुळे त्या सिंहाला शिवांनी निघून जाण्यास सांगितलं. पण मी आता काय खाऊ असं सिंहानी विचारल्यावर स्वतःलाच खा असं शिवांनी त्याला सांगितलं. या आज्ञेचं पालन करत सिंहाने स्वतःचं शरीर खाऊन टाकलं. फक्त तोंड तेवढं शिल्लक राहिलं. हे पाहून शिवांनी त्याला किर्तीमुख हे नाव दिलं व त्याला सांगितलं की मी जिथे असेन तिथे तुला अग्रस्थान मिळेल. म्हणून सर्व शिवमंदिरात किर्तीमुख पहायला मिळतं. किर्तीमुखाला सर्व वाईट गोष्टी खाऊन टाकायला सांगितलं. पण मनुष्याची पापं काही संपत नाहीत आणि किर्तीमुखाचं खाणं काही थांबत नाही! किर्तीमुख चित्रीत करताना फक्त तोंड आणि लांबलचक सुळे दाखवलेले असतात.
पंचतंत्रातल्या बडबड्या कासवाची तसच गोड गोड बोलून माकडाचं काळीज मागणाऱ्या मगरीची गोष्टही इथे कोरलेली आहे.

यानंतर आम्ही मंदीर बाहेरून बघितलं. ९२ हत्तींवर हे मंदीर उभं आहे आणि प्रत्येक हत्तीचे अलंकार वेगवेगळे आहेत. एक काळभैरवाचं शिल्प बघितलं. काळभैरव हा नेहमी नग्न आणि सापाने त्याला गाठ मारलेली असा दाखवतात. त्याच्या डाव्या हातात मानवी शीर असतं आणि त्याच्या खाली एक कुत्रा दाखवलेला असतो. तो रागीट असतो त्यामुळे त्याच्या जटा फैलावलेल्या दाखवतात.
ब्रम्हा आणि विष्णू यांची मुर्ती बघितली. खालच्या बाजूला ब्रम्हदेव आणि बाजूला दोन सेवक आहेत आणि वरच्या बाजूला शंख आणि गदा धारण केलेली बसलेल्या अवस्थेतील भगवान विष्णूंची मुर्ती आहे.
नंतर दक्षिण दरवाज्यापाशी आलो. या दरवाज्याची सुरवात दक्षिणमुखी गणेशाने होते. आणि इथल्या द्वारपाल या स्त्रिया दाखवल्या आहेत.

दक्षिण दरवाज्यापाशी एक देवनागरी लिपीतला शिलालेख ठेवला आहे. त्यात असं लिहलं आहे की ‘शके १२३६ (इ.स. १२१३) मधे देवगिरीचा राजा सिंघन यादव द्वितीय याने शिलाहार राजा भोज द्वितीय याचा पराभव केला. यादव शासनकालात मिरज प्रांतात जिथे संगम झाला आहे (नरसोबाची वाडी) तिथपर्यंतची जमीन मंदिराच्या पूजा व सेवांसाठी दान केली आहे.’ आणि त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे शिलालेखाच्या वरती चंद्र आणि सूर्य कोरलेले आहेत. याचा अर्थ असा की चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आकाशात आहेत तोपर्यंत हे दानपत्र वैध आहे. गर्भगृहाच्या बाहेरच्या भिंतीवर देवकोष्ट आहे. देवकोष्ट म्हणजे ज्या देवाचं हे मंदीर आहे त्याचीच प्रतिमा बाहेरही दाखवलेली असते. वरती मंदिराचा दगडी कळस आहे. मधे गर्भगृहाचं दार व त्यावर देवादिकांच्या प्रतिमा आहेत. त्याखाली किर्तीमुख आहे आणि सगळ्यात खाली बलदंड नंदीवर उमा महेश आणि बाजूला शैवद्वारपाल आहेत.
बाहेरच्या भींतींवर बरीच देवदेवतांची शिल्पं आहेत. फोटोत एका बाजूला महिशासुरमर्दिनीचं शिल्प आहे व त्यात पायाजवळची म्हैस व्यवस्थित दिसती आहे. दुसऱ्या बाजूला अर्धा भाग शंकराचा आणि अर्धा भाग विष्णूचा असं हरिहराचं शिल्पं आहे. काही रामायण महाभारतातले प्रसंग कोरलेले आहेत. एका बाजूला श्रीराम आणि हनुमान यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग आहे तर दुसऱ्या बाजूला द्रौपदी भीमाला सांगते आहे की दुशाःसनाला मारल्याशिवाय मी केस बांधणार नाही.

या मंदिराची अदिलशाहीत आणि मुघल काळात काही प्रमाणात मोडतोड झाली आहे. तसच कित्येक शतकांचा उन, वारा आणि पाऊस यांचाही परिणाम झाला आहे. पण तरीसुद्धा अजुनही हे मंदीर बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.
‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातलं ‘शिव बोला भंडारी’ हे गाणं या मंदिरात चित्रीत करण्यात आलं आहे. तसच ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातही हे मंदीर दाखवण्यात आलं आहे.
खिद्रापूर हे खूप छोटं, शांत गाव आहे. जाण्यायेण्याचा रस्ता हिरव्यागार शेतातून आहे. जवळूनच कृष्णा नदी वहाते. फक्त मंदिरात येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांसाठी टॅायलेटची व्यवस्था अगदीच गैरसोयीची आहे. स्थानीक प्रशासनाने यात लक्ष घातलं तर खूप बरं होईल.

माझं याच भागात खरतर लहानपण गेलं आहे. प्राथमिक शाळेत असताना सहलीच्या निमित्ताने हे मंदीर पाहिलंही होतं. पण त्यावेळेला या कलाकृतीचा आस्वाद घेण्यापेक्षा खेळ आणि एकत्र डबा खाणं याला प्राधान्य दिलं गेलं. पुढे संसाराच्या धबडग्यात याचा पूर्णतः विसर पडला. तीन वर्षांपूर्वी हे मंदीर अचानक पहाण्याचा योग आला. मंदीर पहात असताना आनंद, अभिमान आणि दुःख या तीनही भावना एकत्रीत उचंबळून आल्या. एका अप्रतिम कलाकृतीचा आस्वाद घ्यायला मिळाला याचा आनंद आणि समाधान, माझ्या भागात ही कलाकृती आहे याचा अभिमान आणि इतकी वर्षे याकडे दुर्लक्ष झालं याचं दुःख! यानंतर तीन-चार वेळेला या मंदिरात जाण्याचा योग आला. प्रत्येक वेळेला काहीतरी नव्याने सापडतं! कोणार्क आणि मोधेरा सूर्यमंदीर, खजुराहो, हंपी अशी अनेक मंदिरे आवर्जून बघितली जातात. पण त्याच तोडीचं हे मंदिर आहे. याला पश्चिम महाराष्ट्राचं खजुराहो असही म्हणतात. पाहिलं नसल्यास अवश्य पहा! आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर अर्धा-पाऊण तास इथल्या कलेचा आस्वाद जरूर घ्या!

मृदुला मंगळवेढेकर

Leave a comment