महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,76,603

गुढीपाडवा

By Discover Maharashtra Views: 327 8 Min Read

गुढीपाडवा: महाराष्ट्राच्या पहिल्या स्वातंत्र्याचा महोत्सव:

महाराष्ट्राच्या दृष्टीने गुढीपाडवा हा पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात प्राप्त केलेल्या महाविजयाचे स्मरण करणारा आणि त्यानिमित्त सुरु झालेल्या संवत्सराचा उत्सव म्हणून फार मोलाचा दिवस आहे. ज्ञात इतिहासातील महाराष्ट्राचे आद्य राजघराणे म्हणजे सातवाहन आणि याच घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णीने शक नृपती नहपान या महाराष्ट्र गिळंकृत करणा-या सम्राटावर महाविजय प्राप्त करून महाराष्ट्र परकीय जोखडातून मुक्त केला आणि राजकीय दृष्ट्या आजच्या महाराष्ट्राला एक तर केलेच पण आपल्या साम्राज्याच्या सीमा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही विस्तारल्या. महाराष्ट्राला भाषिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रात बलाढ्य तर केलेच पण आजच्या मराठी भाषेची पूर्वज माहाराष्ट्री प्राकृत भाषेलाही देशव्यापी माहात्म्य प्राप्त करून दिले. इतके कि उत्तर भारतातील विद्वानही माहाराष्ट्री प्राकृत भाषेला सर्वश्रेष्ठ मानत आपल्या साहित्यकृती या भाषेत लिहित असत. आजच्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक, आर्थिक आणि भाषिक पाया या राजघराण्याने घातला असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. पण दुर्दैवाने आम्हीच मराठी माणसे एवढी कृतघ्न कि सातवाहन घराण्याचे आमच्यावरील अपार ऋण तर विसरलोच, पण दरवर्षी गुढीपाडवा साजरा करत असताना त्याशी संबंध नसलेल्या भाकडकथांवरच जास्त विश्वास ठेवत गेलो आणि या उत्सवाचे मांगल्य आणि महत्व विसरून गेलो. या दिवशी रावणाला ठार मारून राम अयोध्येत परत आला अशी कथा असो कि या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती करून कालगणना सुरु केली अशी उत्तर काळातील व्रतराजामध्ये येणारी कथा असो, तिच्यावरच आम्ही अंधश्रद्धेने विश्वास ठेवत गेलो आणि या स्वातंत्र्याच्या महोत्सवाचे मांगल्य मात्र हरपून बसलो. त्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा या उत्सवाचा इतिहास डोळसपणे पहायला हवा.

इसवीसनपूर्व २२० मध्ये महाराष्ट्रातील जुन्नर भागात आंद्रा नदीच्या खो-यात धनगर कुटुंबात सातवाहन घराणे उदयाला आले. आंद्राचे कृत्रिम संस्कृत रूप बनवण्याच्या नादात पुराणकारांनी त्याचे रूप आंध्र असे बनवून या घराण्याचे मुलनामही बदलण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला. या घराण्याचा उदय होईपर्यंत महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या एकसंघ नव्हता. अनेक राज्यात वाटला गेला होता. आंदरा नदीच्या खो-यातील असल्याने स्वाभाविकच जुन्नर ही या घराण्याची पहिली राजधानी बनली. छिमुख सातवाहन हा या घराण्याचा मुळपुरुष. पुढे राज्याचा विस्तार वाढल्यानंतर पैठण येथे राजधानी हलवली गेली. ही सत्ता पुढे साडेचारशे वर्ष, म्हणजे इसवी सन २३० पर्यंत कायम राहिली. या घराण्याचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील रायगड (मुळ नांव रायरी), राजमाची अशा शेकडो किल्ल्यांची मुळची उभारणी सातवाहन काळात झाली. “तिनही समुद्रांचे पाणी चाखणारे अश्व असलेले सातवाहन” अशी सार्थ बिरुदावली त्यांनी मिरवली. साडेचारशे वर्षांच्या कालावधीत शेकडो महाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख, विमल सुरी लिखित जगातील रामावरील पहिले महाकाव्य “पउमचरीय’, हालाच्या “गाथा सप्तशती” सारखा नितांतसुंदर काव्यसंग्रह, “लीलावई” सारखे महाकाव्य यातून आद्य मराठीचा पाया तर भक्कम केला गेलाच पण वररुचीच्या “प्राकृतप्रकाश” या व्याकरण ग्रंथाने माहाराष्ट्रीला भाषेला समृद्धी दिली. आजही महाराष्ट्राचे भूषण असलेल्या असंख्य लेणी खोदायची सुरुवातही त्यांच्याच उदार सहाय्याने झाली. पुर्वी रट्ठांचा (रठ्ठ म्हणजे छोटा प्रदेश) समूह तो महाराष्ट्र अशी ओळख पुसून या रट्ठसमुहाला एकाच एक राजकीय पटलाखाली आणले व या भूभागाला महारठ्ठ (संस्कृतमध्ये महाराष्ट्र) हे सार्थ नाव दिले. देशी-विदेशी व्यापारातून आर्थिक समृद्धी आणली व प्रजेला ख-या अर्थाने सुखाचे दिवस दाखवले. हालाच्या गाथांतील काव्यावरून एका आनंदी खेळकर समाजाचे दर्शन जे घडते ते त्यामुळेच. त्यामुळे महाराष्ट्राचे संस्थापक, वर्धनकर्ते हे सातवाहन होत असे म्हणायला काहीही प्रत्यवाय नाही.

या घराण्याने साडेचारशे वर्ष राज्य केले असले तरी हा सर्वच प्रवास निर्वेध झाला नाही. त्यात अडथळेही आले. यात क्षहरात वंशाच्या नहपान या सम्राटाने महाराष्ट्रावर आक्रमण केले. त्यांच्या रानटी आक्रमणात महाराष्ट्र चिरडला गेला. कुशाण सत्ताधा-यांनी विविध प्रान्तांवर नेमेलेल्या शक क्षत्रपांमधून हे घराणे उदयाला आले. मंदसोर येथे राजधानी असलेला नहपान पराक्रमी व महत्वाकांक्षी होता. त्याने सत्तेत येताच आपल्या राज्याचा विस्तार करण्याचे धोरण आखले आणि प्रबळ फौजेच्या जोरावर त्याने सुंदर सातवाहनचा पराजय केला. त्याने नाशिक, पैठण जिंकून तर घेतलेच परंतु पार पुण्यापर्यंत आपल्या सत्तेचा विस्तार केला. कोकणही सातवाहनांच्या ताब्यातून घेऊन तेथील व्यापारी बंदरांवरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले. महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला. सातवाहनांचे राज्य सातारा व क-हाड भागापुरतेच उरले. अशाच काळात सातवाहन घराण्यात गौतमीपुत्र सातकर्णीचा उदय झाला. हा धाडसी, शुर तर होताच पण अत्यंत धोरणी होता. आपली शक्ती कमी आहे तर नहपानाची अवाढव्य हे त्याने ओळखून गनिमी काव्याचा आधार घेत नहपानाशी संघर्ष सुरु केला. स्वातंत्र्यप्रिय मराठी सैनिक त्याला येऊन सामील होऊ लागले. हा लढा सोपा नव्हता. नहपानाचे साम्राज्य आता उत्तर आणि दक्षिणेतही विस्तारलेले होते. तब्बल वीस वर्ष हा संघर्ष चालला. दरम्यान एका आख्यायिकेनुसार गौतमीपुत्राने काही कुशल हेर म्हणून त्याच्या राज्यात घुसवले आणि नहपानाला भरमसाठ दानधर्म करायला उद्युक्त तर केलेच पण त्याच्या सैन्यदलाची अनेक गुपिते माहित करून घेतली. शेवटी त्याने नाशिक जवळ नहपानाची सेना अचानक कोंडीत पकडून अतिशय निकराचे युद्ध केले आणि इसवी सन ७८ मध्ये नहपानाचा समूळ पराभव केला आणि त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- “खखरात वंस निर्वंस करस.” (क्षहरात वंशाला निर्वंश केले.) महाराष्ट्राला तर स्वातंत्र्य मिळालेच पण शेजारील अन्य राज्यातही त्याचा अफाट विस्तार झाला. “पेरीप्लस ऑफ अरेथ्रीयन सी” या तत्कालीन ग्रीक पुस्तकात गौतमीपुत्राच्या काळातील महाराष्ट्राच्या समृद्धीचे वर्णन आलेले आहे.

शकांपासून महाराष्ट्राला मुक्त केले हे गौतमीपुत्राचे महाराष्ट्राच्याच नव्हे तर राष्ट्रीय इतिहासातले सर्वात महान कार्य. या स्वातंत्र्योत्सवाचे स्मरण चिरकाळ राहावे म्हणून त्याने नवीन सालाहन संवत्सर त्या दिवशी सुरु केले. जैन मराठी प्राकृतात सातवाहनचा उच्चार सालाहन असा केला जात असे. त्याच शब्दाचे संस्कृत रुपांतर शालिवाहन शक होय. हा आनंद घोषित करण्यासाठी घरोघरी गुढ्या उभारल्या गेल्या. तेव्हापासून या दिवसाला गुढीपाडवा म्हणायची प्रथा निर्माण झाली जी आजतागायत सुरु आहे, पण मुळचे कारण मात्र आपल्याला माहित नसावे हे एक दुर्दैव होय.
सातवाहन घराणे हे तत्कालीन खुल्या समाजव्यवस्थेतून आलेले. त्यांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. बौद्ध-जैनांना त्यांनी उदार आश्रय दिला. जैनांची लोहगड, पाले व खानदेशातील लेणीही याच काळात निर्माण झाली. नाशिकच्या तसेच इतर अनेक लेण्यात त्यांचे महत्वाचे शिलालेख कोरलेले आहेत. यात भिक्षुसंघाला दिलेले दानलेखही आहेत. त्यांनी मंदिरांना सहाय्य तर केलेच पण वैदिकांसाठी काही यज्ञही करवून घेतले. पण या धार्मिक कार्यासोबतच त्यांची स्मृती चिरकाळ टिकणारी झाली ती त्यांनी बांधलेल्या चेउल आणि कल्याण येथील व्यापारी बंदरांमुळे. त्यांनी बांधलेल्या व्यापारी मार्गांमुळे. उद्योग-व्यवसायाला व विदेश व्यापाराला दिलेल्या अपार प्रोत्साहनामुळे. महाराष्ट्राचा तो सुवर्णकाळ होता असे म्हटले तरी त्यात यत्किंचितही अतिशयोक्ती होणार नाही. साहित्यदृष्ट्या हा काळ अपार समृद्धीचा होता. रामावरील पहिले महाकाव्य मराठी प्राकृतात त्यांच्याच कारकिर्दीत इसवी सन ४ मध्ये लिहिले गेले असावे ही बाब तर मराठी माणसाला अभिमानास्पद वाटावी अशी. शास्त्र-विज्ञान यातही त्यांच्या काळाने अद्भुत प्रगती केली. एकंदरीत सातवाहन हे आजच्या महाराष्ट्राचे सर्व दृष्ट्या संस्थापक होत.

आणि याच घराण्याच्या बलशाली सम्राटाने, गौतमीपुत्र सातकर्णीने शक आक्रमकावर जो महान विजय प्राप्त करून त्याला युद्धात ठार मारले या महाविजायाची आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्वातंत्र्योत्सवाची ही स्मृती आजही आपण गुढीपाडव्याच्या रूपाने ठेवतो. घरोघर गुढ्या उभारून या महान सम्राटाला मानवंदना देत असतो. फक्त त्यामागील इतिहास तेवढा आपल्याला माहित नसतो. एक बाब लक्षात घेतली पाहिजे कि जेथेही सातवाहनांचे साम्राज्य होते तेथेच हा उत्सव साजरा केला जातो, अन्यत्र नाही.
हा उत्सव आपला स्वातंत्र्योत्सव आहे हे आपण विसरता कामा नये. या स्वातन्त्र्याचा शिल्पकार गौतमीपुत्र सातकर्णी होता आणि त्याला आपण मानवंदना देण्यासाठीच गुढी उभारत असतो याचे भान ठेवले पाहिजे. हा कोणत्याही धर्माचा सण नाही, तो सर्वच मराठी माणसांचा उत्सव आहे हे सर्वांना माहित असले पाहिजे.

-संजय सोनवणी
(दै. पुढारीमध्ये प्रसिद्ध)

Leave a comment