कावळा गड

कावळा गड

कावळा गड –

पुणे जिल्हा व रायगड जिल्हा यांच्या सीमेवर असलेल्या भोर तालुक्यातील वरंध घाटात (प्रत्यक्ष हद्द महाड तालुक्याची आहे की भोर तालुक्याची हे माहित नाही .) असलेल्या कावळा गड. भोरपासून जवळ असलेल्या कावळा गड या दुर्गावर जाण्याचा योग आला नव्हता कारण पावसाळ्यात शिवथर घळ व वरंध घाटात अनेक वेळा जाणे झाले पण पावसाळ्यात असलेले गवत व निसरडी पाऊलवाट यांचा अंदाज येत नाही. निरा देवघर धरणापासून वळणावळणाच्या रस्त्याने जाताना धरणातील निळाभोर पाणीसाठा व सह्याद्रीच्या डोंगरावरील हिरवाईने नटलेली वृक्षसंपदा मनाला सुखावते. वरंधघाट दुरूस्तीसाठी बंद असल्याने वाहतूक जवळजवळ बंदच होती, क्वचितच एखाद दुसरी दुचाकी ये जा करीत होती.

पुणे जिल्हा हद्द समाप्त होते व रायगड जिल्हा हद्द सुरू होते तेथील खिंडीत पोहोचलो. दुचाकी उभी करून उजव्या बाजूला समोर दिसणा-या काळ्याकातळातील सह्याद्री पुरुषाच्या पायथ्याशी असलेल्या सुमारे पंधरा पायऱ्या खुणावतात. पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूने अतिशय निसरडी पाऊलवाट असून खाली खोल दरी आहे. शारीरिक समतोल साधण्यासाठी भक्कम मानसिक तयारी हवी व पूर्वानुभव देखील गरजेचा आहे तसेच निष्णात सहकारी हवा, अन्यथा न गेलेले उत्तम. दहा मिनिटांत दांडांच्या सपाटीवर पोहोचतो.

भव्य कातळातील टेकडी पाठीमागे राहते तर समोर एक टेकडीकडे जाणारी मळलेली पाऊलवाट दिसते. उजव्या बाजूला खोल दरीत असलेले शिवथर घळ हे ठिकाण स्पष्ट दिसते. लहान टेकडी चढून जाताना बुरूजासम बांधकाम केल्याचे पुरातन अवशेष गवतात झाकून गेलेले आहेत तर वर माथ्यावर चौकोनी आकाराच्या इमारतीचे जोते दिसून येते. पुन्हा उतार उतरून येणाऱ्या लहान टेकडीच्या उजव्या बाजूच्या वनराईतून जाणाऱ्या पाऊलवाटेने गेल्यावर समोर पुन्हा एक लहान टेकडी दिसते.ह्या टेकडीची चढण सुरू होण्यापूर्वी उजव्या हातास काळ्याकातळात खोदलेले सुमारे सहा फूट रुंद व दहाबारा फूट लांबीचे प्राचीन पाणी टाके दिसून येते. यातील पाणी पिण्यास योग्य नाही.

समोरील टेकडी चढून गेल्यावर जवळच दिसणारा कावळा गडावरील बुरूजाचा भगवा ध्वज आकर्षित करतो. बुरूजावरून काळ व सावित्री नदीचे खोरे,मढे घाट,वरंधघाट, महाड इत्यादी ठिकाणे स्पष्ट दिसतात. बेधुंद वारा व समोरचा नैसर्गिक देखावा पाहताना देहभान हरपते. सह्याद्रीची खासीयतच आहे की तुम्ही अलौकिक आनंदाचे स्वामी होऊन जाता. निसर्गाच्या कुशीत दैनंदिन समस्या ताण तणावापासून क्षणभर का होईना मुक्ती मिळते.

ह्या किल्ल्यावर निवासी इमारतीचे कोणतेहि अवशेष आढळून आले नाहीत परंतु शिवपूर्व व शिवकाळात कोकणातून देशावर होणाऱ्या व्यापारी घाटवाटेचा पहारेकरी म्हणून नक्कीच येथे काही असामी असाव्यात मात्र सैनिकी तळ नसावा असे वाटते. ह्या किल्ल्याबाबत ऐतिहासिक संदर्भ जवळजवळ उपलब्ध नाहीतच. मात्र असे असले तरी याचे ऐतिहासिक महत्त्व तीळमात्र कमी होत नाही. थोडावेळ किल्ल्यावर विसावून परतीच्या वाटेला लागलो.

कावळा गड पाहून घाटातील वाघजाई मातेचे दर्शन घेतले व मंदिराच्या बरोबर वर असणाऱ्या नऊ पाण्याची टाकी पाहण्यासाठी गेलो. ते पाहून पवार यांच्या उपहागृहात गरमागरम कांदा भजी व चहा घेऊन सांयकाळी ५:३० वा.परतीच्या वाटेला लागलो.

© सुरेश नारायण शिंदे, भोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here