महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

वाचा कट्यारीचा देदीप्यमान इतिहास !

By Discover Maharashtra Views: 1351 4 Min Read

वाचा कट्यारीचा देदीप्यमान इतिहास !

ऐतिहासिक विषयांचा धांडोळा घेताना कुठंतरी जाणवलं की ज्या शस्त्रांमुळे आपला ज्वलंत देदीप्यमान असा इतिहास घडलाय ती शस्त्रच आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे आजचा विषय अश्याच एका शस्त्रावर ज्याला इतिहासात मानाचं पान आहे, ते शस्त्र म्हणजे कट्यार.(कट्यारीचा इतिहास)

आपल्यापैकी अनेक जणांना आठवत असतील पूर्वीची लग्न. लग्न साधीच असायची पण त्यामध्ये जे विधी व्हायचे ते पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने आणि आपल्या कुळाला, कुलदैवतेला स्मरून व्हायचे. लग्नसोहळा देखील पाच- पाच दिवस चालायचा. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटी, लग्नघराची चाललेली धांदल, एकूणच गोड वातावरण तयार व्हायचं.

विवाहप्रसंगी नवरदेवाने कट्यार बाळगायची असते असं शास्त्र आहे आणि त्याचबरोबर वधूवरांच्या मागे उभे असलेले त्यांचे मामा यांच्या हातात तलवारी असायच्या. तलवारीवर आपण स्वतंत्र लेख लिहुया, तूर्तास कट्यारीचा इतिहास बघू, तर कट्यारीचा इतिहास तसा खूप प्राचीन पण त्याचा पुरेपूर आणि योग्य उपयोग मराठ्यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक नियम होता की प्रत्येक मावळ्याकडे तलवारीसोबतच एक कट्यार असावी. कट्यार हे एक छोटे शस्त्र असून ते सोबत बाळगायला सोपे जायचे आणि ऐनवेळी तलवार जर नसली तर कट्यारीच्या साहाय्याने आपण लढू शकतो.

हे झाले कट्यारीचे महत्व,

पण मग विवाहप्रसंगी नवरदेवाने कट्यार सोबत का बाळगायची असते ?

मी ज्याप्रमाणे सांगितलं की कट्यार हे शस्त्र मराठे कायम जवळ बाळगायचे, त्याचप्रमाणे प्रत्येक मावळ्याचं पहिलं लग्न हे तलवार आणि कट्यारीसोबत होत असतं. कट्यार असो किंवा तलवार ही मराठयांची अर्धांगिनी होती. त्यामुळे तिला कंबरेवर बसायचा मान होता. कमरेच्या दुशेल्यात कट्यार खोवल्या जायची. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचं मूळ चित्र जर बघितलं तर त्यामध्येही कट्यार दाखवली आहे म्हणजेच महाराज कट्यार कायम सोबत बाळगायचे.

एवढंच काय पण अफजलखान वधप्रसंगी महाराजांनी अफजलखानाला कट्यारीने वार करूनच संपवले.

विवाहप्रसंगी वर आणि आप्तेष्ट हे शस्त्र नेहमी बाळगत याला शास्त्र (तर्क) देखील आहे, पूर्वीच्या काळी जेव्हा यवनी पातशाह्या असतील किंवा दरोडेखोर, लुटारू यांच्यापासून जनतेला धास्ती असायची.

किंवा एखादे परकीय आक्रमण असेल त्यावेळी प्रचंड गदारोळ व्हायचा. स्त्रिया मुली यांना डोळ्यादेखत पळवून न्यायचे अशावेळी सर्व पुरुषांकडे शस्त्र असायची. वराकडे कट्यार आणि इतरांकडे तलवारी. याने काय व्हायचं की आपण आक्रमण किंवा हल्ला जरी परतवून लावू शकत नसलो तरी पण बचावात्मक हेतूने ( डिफेन्स ) करायचो.

तर अशी ही कट्यार ! मराठयांचं आवडीचं एक शस्त्र. ज्या शस्त्रांनी इतिहास घडवला तीच शस्त्रं आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याला कारण म्हणजे जेव्हा इंग्रजांचं राज्य भारतात सुरू झालं त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रं नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मग धोप तलवारी असतील, पट्टा, किंवा कट्यार ही शस्त्र नष्ट करण्याचा प्रयत्न केला ; का ? कारण त्यांना भीती होती की मराठ्यांच्या हातात शस्त्रं असली तर यांना पुन्हा एकदा इतिहास घडवायला वेळ नाही लागणार.

आजकाल काही लग्नांमध्ये वराने कट्यार बाळगणं दुर्मिळ होत चाललंय. एकतर कुणाकडे कट्यार नसते, ती भाड्याने किंवा इतरांकडून आणावी लागते (खरंच खंत वाटते, की आपल्या पूर्वजांनी ज्या शस्त्रांनी इतिहास घडवला, ती शस्त्रं बघायला मिळणंही दुर्मिळ होतंय) ज्या शस्त्रांनी आपला इतिहास घडवला, ज्यांच्यामुळे आज आपलं अस्तित्व टिकून आहे त्या शस्त्राला नेहमी वंदन.

टीप : लेखामध्ये मराठा हा शब्द फक्त जातीवाचक घेऊ नये.

लेखन :  रोहित पेरे पाटील © इतिहासवेड

Leave a comment