महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

खानदेशातील स्वातंत्र्यसंग्राम भाग २

By Discover Maharashtra Views: 2486 6 Min Read

खानदेशातील स्वातंत्र्यसंग्राम भाग २ –

दामोदर हरी चापेकर व बंधू यांनी पत्करलेल्या हौतात्म्याचे पडसाद खानदेशात पडले आणि सावरकरांच्या अभिनव भारत यांच्या शाखा जळगाव व एरंडोल येथे स्थापन झाल्या. बाळ गंगाधर टिळक हे पुर्व खानदेशात येत असत त्यांच्या जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, अमळनेर, जामनेर आणि पाचोरा येथे बैठका झाल्या होत्या. वासुदेव विठ्ठल तथा अण्णासाहेब दास्ताने, आ.रा. म्हाळस, नारायण बंकट तथा गुलाबशेट, महादेव केशव माळी, गंगाधर देवचंद शेट, बाबुराव घाटे, विनायक परशुराम भागवत, भिडे वकिल, भैय्यासाहेब ब्रम्हे, नारायण मुठ्ठे हे काही टिळकांचे चाहते आणि खानदेशातील कार्यकर्ते होते.(खानदेशातील स्वातंत्र्यसंग्राम भाग २)

१८९३ मध्ये पासून सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव तर १८९५ मध्ये सुरू झालेल्या शिवाजी महोत्सव या उपक्रमांना बराच प्रतिसाद मिळाला. भुसावळ, जळगाव, धुळे, नंदुरबार येथे असे मेळे कार्यरत झाले. नंतर हे लोण गावागावात पसरले.सुरवातीचा उद्देश हा राष्ट्रीय विचारांचा प्रसार हाच आणि लोकांना एकत्र आणण्याचा होता. या गणेश ऊत्सवात गाणी, नाटके, सभा, ज्ञानप्रबोधन हेच प्रामुख्याने असायचे. १९०६ च्या कलकत्ता काॅंग्रेस नंतर स्वराज्य- स्वदेशी- राष्ट्रीय शिक्षण आणि परदेशी मालाची होळी हे धोरण राबविले गेले आणि त्यादृष्टीने दत्तात्रय दामोदर काळकरांनी राष्ट्रीय शाळा उघडली तर क्रांतीकारकांना प्रशिक्षण देण्यासाठी “दामोदर गुरू” ही व्यायामशाळा उघडली. जनतेला वेठीस धरणाऱ्यांना, व्यापाऱ्यांकडून माल घेऊन पैसे न देणारे, अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात काळकरांनी संप व हरताळ घडवून आणला होता.

वंगभंग आंदोलन चालू असतांना शेंदूर्णीचे रामचरण तिवारी व धरणगाव येथील कन्हैयालाल बाजपेयी या क्रांतीकारकांनी सरकारी दडपशाहीचा दहशतवादी मार्गाने प्रतिकार केला. ते अभिनव भारतमध्ये होते. कलकत्ता बाॅंम्ब प्रकरणात भाग घेतल्याने १९०७ मध्ये फाशी झाली होती. ते दोघे खानदेशातील पहिले हुतात्मा क्रांतीकारक होते.

१९०६ साली खानदेशात राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. आणि लगेचच खानदेश विभागणी केली गेली. याविरोधात बरेच पडसाद उमटले. सन १८८८ पासून खानदेशात बराच प्रभाव सुरू झाला होता. अलाहाबाद येथे भरलेल्या अधिवेशनात धुळे, जळगाव आणि भुसावळ येथून प्रतिनीधी जाण्यासाठी निवड करण्यात आली आणि या निवडीमुळे सभा होऊन खानदेशातील पुढारी एकत्र येऊन चर्चा होऊ लागल्या. जळगाव येथील आबाजी राघो म्हाळस तर भुसावळ येथून चिंतामण बापूजी लाड यांची निवड करण्यात आली. अधिवेशन झाल्यावर त्याचा प्रसार खानदेशभर झाला.

दुसरे अधिवेशनात धुळे येथील माधव कृष्ण कुलकर्णी तर बरीच वकिल मंडळी गेली होती जे १८८९ मध्ये मुंबई येथे झाले. या अधिवेशानामुळे एका प्रकारे खानदेश ढवळून निघाला. गावोगावी जी मंडळी मुंबई येथे शिकत होती त्यांचे प्रतिनिधी तयार झालेत आणि स्वतंत्र्याच्या विचारांचे वारे वाहू लागले. यातील काही नावे गोविंद रामचंद्र गरूड, सदाशिव हरी सोमण, जनार्दन भिका खरे, महादेव नारायण, यादव व्यंकटेश, वामन नारायण रानडे, दामोदर लक्ष्मण देशपांडे, गोविंद गणेश गोडबोले ही सात जण ब्राम्हण वकिल होती तर मार्टींन लुसमत हे सेवानिवृत्त नाझर होते. टिळकांच्या पासून स्फूर्ती घेऊन ते काम करत होते. यामुळे शिक्षणालाही चालना मिळाली आणि गावोगावी शाळा आणि हायस्कूल सुरू झाले. वाचनालये निघाली, स्वदेशी चळवळींचा तसेच विदेशी कपड्यांची होळी सुरू झाली.

इ.स. १८९३ मध्ये धुळे येथे सत्कार्योत्तजक सभेची स्थापना झाली आणि समाजसुधारणेला चालना मिळाली. नानासाहेब शंकर कृष्ण देव आणि रणदिवे यांचा यात पुढाकार होता. क्रांतीकारकांना प्रेरीत करण्यासाठी पांझरा नदी काठी रणदिवे यांनी तालीमही सुरू केली.

कॉंग्रेस अधिवेशनात खानदेशातील प्रतिनिधी जायला लागल्यामुळे शिक्षणाची चळवळ खानदेशात उभी राहिली. “खानदेश वैभव” आर्यावर्त यासारखे पाक्षिक सुरू झाले. गोविंद रामचंद्र गरूड यांसारखे वजनदार पुढारी तालुकापातळीवर तयार झाले. चाफेकर बंधूंच्या बलीदानानंतर मात्र स्वदेशी आणि परदेशी मालाची होळी हे आंदोलन खानदेशात इतक्या कानाकोपऱ्यात पसरले आणि सभा ,हरताळ यांचा सपाटाच सुरू झाला. १८९४ मधील कॉंग्रेस अधिवेशनात यादव गोविंद पारखे, आबाजी राघो म्हाळस आणि भुसावळ येथून चिंतामणराव गेले होते. १८९२ मध्ये कौन्सिल ॲक्ट नुसार लोक आयुक्त निवडीचा अधिकार देण्यात आला पण सातारा, सोलापूर, नाशिक, पुणे, नगर आणि खानदेश वगळून त्याचेही पडसाद उमटले तो कायदा यायला १८९५ साल उजाडले. आणि याच वर्षी नारो ढाकदेव यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव येथे मोठी सभा घेण्यात आली.

राष्ट्रीय बहिष्कार यांचा मोठा प्रतिसाद खानदेशात मिळाला सभा आणि विदेशी कपड्यांची होळी या विचाराने आंदोलन गावोगावी पेटले. १९०५ सालीचे वंगभंग आंदोलनाच्या प्रतिसाद देण्यासाठी एरंडोल येथे हिंदू मुस्लिम एकत्र सभा झाल्या. इतरही ठिकाणी झाल्या आणि राष्ट्रीय बहिष्कार करण्याच्या शपथा घेतल्या गेल्या. नशिराबाद येथे रा.रा.पांडुरंग शास्री काळे, यांच्या अध्यक्षतेखाली तर भुसावळ येथील आठवले वकिल यांच्या अध्यक्षतेखाली, नवापूर, नंदुरबार, अमळनेर,यावल,बहादरपूर, पारोळा येथे शंकरदास गुलाबदास यांच्या अध्यक्षतेखाली दोन हजार लोक तर गोवर्धन दास यांनी स्वदेशी माल ठेवण्यासाठी दुकानदारांना आर्थिक मदत जाहीर केली. रावेर तालुक्यातील निंभोरे सारख्या लहानशा आणि शेतकरी गावातही श्रीरामचंद्र नाना पाटील यांनी राममंदिरातच सभा घेतली. तर नंदूरबार येथील मंदिरात भिक्षुक लोकांनी विदेशी साखर वापरून केलेल्या भोजनावर बहिष्कार टाकला. यावल तालुक्यातील बामणोद गावात अंगातील सदरे काढून जाळण्यात आली. या सर्व घटनांकडे बघितले तर लक्षात येते की हे आंदोलन आणि असंतोष केवढा सर्वसामान्य लोकांच्या मनात धुमसत होता.

चाफेकर बंधूंच्या हौतात्म्यानंतर खानदेशातील तरूणांनी १८९९-१९०९ मध्ये अभिनव भारत संघटना उभारली. नाशिक, दोंडाईचा, धुळे, जळगाव, येवला, एरंडोल, अमळनेर, येथे परदेशी कपड्यांची होळी आणि सभा झाल्यात.

धुळे येथील वृध्द मुल्ला शेख चांद यांनी मुस्लिम लोकांना एकत्र आणून विदेशी कपड्यांची होळी केली. याचेच पडसाद आणि प्रतिसाद उत्राण, तळई ,कासोदा,फरकांडे येथेही उमटले. हे प्रतिनिधी फक्त देशप्रेम यामुळे झपाटलेले नव्हते तर विकास आणि सामाजिक सुधारणा याचा भाग म्हणून गावोगावी शाळाही उभ्या राहिल्या.

क्रमंश : खानदेशातील स्वातंत्र्यसंग्राम भाग २.

संदर्भ:
देवराम नारखेडे,स्वातंत्र्य लढ्यातील जळगाव जिल्हा,स्वातंत्र्यदिन रौप्य महोत्सव स्मरणिका १९७२
धुळे जिल्हा गॅझेटियर
महाराष्ट्र राज्य गॅझेटियर जळगाव जिल्हा १९९४.

माहिती संकलन  –

खानदेशातील स्वातंत्र्यसंग्राम भाग १

Leave a comment