कंधारचा किल्ला

कंधारचा किल्ला

कंधारचा किल्ला –

कंधारचा किल्ला हा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्हयातील कंधार या तालुक्याच्या गावी असलेला एक भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याचे बांधकाम राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने सुरू केले होते. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणार्‍या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घालण्याचे काम केले. इ.स. १४०३ साली तुघलकाने वारंगळ जिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने याठिकाणी नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली. परंतु नसरत सुलतानाने येथे अयशस्वी उठाव केला. त्याच्यानंतर काही काळ खतलब व खतलबानंतर इ.स. १३१७ ते इ.स. १३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी राहिला. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे. हा शिलालेख हिजरी ७४४ म्हणजेच इ.स. १३३६ सालातील आहे.

इब्राहीम आदिलशहा याच्या काळातील अंदाजे इ.स. १५९०च्या सुमाराचा एक लेख शाही बुरूजावर आहे तर किल्ल्यातीलच मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स. १६०५ सालातील लेख आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदीलशहा याने बांधलेल्या आहेत. धनबुरुजावर अंबारी नावाची तोफ आहे. मलिक अंबर या प्रसिद्ध कारभार्‍यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण केल्या व बांधल्या. मुहम्मदी मशिदीवर त्याचाही शिलालेख आहे. मुर्तजा निजामाच्या कारकीर्दीत पोलाद खान व घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करून बुरूज बांधले. औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख बाग-ए-रश्के कश्मीर असा आहे.

हा किल्ला १५ एकरात असून त्याच्या भोवती खंदक आहे. रष्ट्रकुल घराण्यात हा किल्ला राजधानी होता. किल्ल्यावर एक टेहळणी बुरूज असून अनेक तोफा अजून चांगल्या स्थितीत आहेत.

कंधारचे पूर्वीचे नाव पंचालपुरी असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह याच स्थळी झाला अशी आख्यायिका आहे.

© कऱ्हाळे चांदोजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here