महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

किल्ले जुन्नर

By Discover Maharashtra Views: 3023 3 Min Read

किल्ले जुन्नर…

जुन्नर हे पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण.कुकडी नदीच्या तीरावर डोंगरांनी वेढलेल्या परिसरात वसलेले आहे.इथल्या डोंगररांगेत माळशेज घाट, नाणेघाट व दाऱ्याघाट या प्रमुख घाटवाटा आहेत.सातवाहन काळात कल्याण-नाणेघाट-जुन्नर-नगर-पैठण हा महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्ग होता. त्या काळी जगभरातील व्यापारी कल्याण बंदरावर आपला माल घेऊन उतरत असत. पुढे नाणेघाट मार्गे घाटमाथ्यावर येऊन जुन्नर मार्गे पैठणला व्यापार करत जात असत. व्यापारपेठेला आणी मूळ शहराला संरक्षण देण्यासाठी जुन्नरचा गढीवजा नगरकोट बांधला गेला.अस्तित्वात असलेला किल्ले जुन्नर भुईकोट हा मध्ययुगीन काळात अस्तित्वात आला.जुन्नर एसटी स्थानकासमोरच जुन्नर भुईकोट असून लोकांना फारसा माहित नाही. स्थानिक लोकांत हा भुईकोट दादोजी कोंडदेव वाडा म्हणुन प्रचलीत आहे.

साधारण आयताकृती आकाराचा हा किल्ला १२ एकरवर पसरलेला असुन किल्ल्यातील शासकीय कचेऱ्या, न्यायालय, दुकाने यांच्या अतिक्रमणात किल्ल्याचे अस्तीत्व नष्ट झाले आहे. या भुईकोटाला एकुण तेरा बुरूज असुन तटबंदीत अकरा व मुख्य दरवाजाशेजारी दोन अशी त्यांची रचना आहे. किल्ल्याची तीन बाजुची तटबंदी पुर्णपणे ढासळलेली असुन केवळ एका बाजुची तटबंदी पुर्णपणे शिल्लक आहे. असे असले तरी कोटाचे सर्व म्हणजे तेराही बुरूज आजही पहायला मिळतात. पुर्वाभिमुख दरवाजा पहायला मिळतो. या दरवाजाची चौकट आजही शिल्लक आहे. या भागात शासकीय कचेऱ्या असल्याने छायाचित्रणास मनाई आहे. या भागात दोन प्राचीन विहिरी असुन आत प्रवेशास मनाई आहे. कोटाच्या बाहेरून फेरी मारताना  एक शरभशिल्प दिसुन येते. या तटबंदीची उंची वीस फुट असुन खालील दहा फुट बांधकाम दगडात व वरील दहा फुट बांधकाम विटांनी केलेले दिसते. बुरुजांचे बांधकाम देखील असेच केलेले असुन.शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी आले असता या किल्ल्याला अवश्य भेट द्यायला हवी.

जीर्णनगर, जुन्नेर म्हणजेच जुन्नर हे शहर इ.स.पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. सातवाहन राजे हे महाराष्ट्राचे पहिले राजे. इ.स.पुर्व २५० ते इ.स.२५० या कालखंडात महाराष्ट्र समृद्धीच्या शिखरावर होता. प्रतिष्ठान म्हणजेच आजचे पैठण ही सातवाहन राजांची राजधानी आणि जीर्णनगर म्हणजे जुन्नर ही उपराजधानी होती. सातवाहन राजसत्तेच्या काळात कोकण व देश यांना जोडणारा नाणेघाट जन्माला आला अन् त्याच्या संरक्षणासाठी कुकडी नदीच्या खोऱ्यात जिवधन, चावंड, हडसर, निमगिरी, शिवनेरी या किल्यांची निर्मिती झाली. नाणेघाट या पुरातन व्यापारी मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. त्या काळी नाणेघाटा पासून काही अंतरावर जीर्णनगर म्हणजेच आजचे जुन्नर या गांवी बाजारपेठ वसली गेली. सातवाहनांनंतर जुन्नर चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता.

Team- पुढची मोहीम

Leave a comment