महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,02,266

फलकलेखा | कोरवलीच्या सुरसुंदरी

By Discover Maharashtra Views: 1216 3 Min Read

फलकलेखा –

कोरवलीच्या सुरसुंदरी लेख क्र. ७ –

कोरवली येथील सुरसुंदरीच्या समूहातील सर्वात उठावदार व नजर खिळवून ठेवणारे आणि पाठमोर्‍या सौंदर्याचे अप्रतिम शिल्प म्हणजे फलकलेखा होय.वेगवेगळ्या कलाकारांनी वेगवेगळ्या ठिकाणच्या मंदिरावर फलकलेखा कोरलेल्या असल्या तरीही सर्वांपेक्षा जास्त मोहक व सुंदर आणि कमनीय बांध्याची फलकलेखा ही कोरवली याठिकाणी आहे हे विशेष होय .ही फलकलेखा अभंग स्थितीत या ठिकाणी उभी असलेली दिसते.

कलाकारांनी आपले कौशल्य वापरून पाठमोर्‍या सौंदर्याचा आविष्कार अप्सरेच्या रूपाने दाखवला आहे. इतर सुरसुंदरी समोरून पाहत असताना त्यांची उभे राहण्याची पद्धत विपुल केशसंभार, ठसठशीत आभूषणे आणि किंमती वस्त्रप्रावरणे  कलाप्रेमी रसिकांना पहावयास मिळतात. अतिशय कमनीय आणि लयदार बांध्याची हि फलकलेखा नखशिखांत सौंदर्याने परिपूर्ण आहे. इतर स्वर्गीय अप्सरांच्या देखणेपणाची  स्तुती केली जाते तसे या फलकलेखे बाबत होत नाही कारण ती पूर्णपणे पाठमोर्‍या अवस्थेतच कलाकाराने दाखविली आहे.

आपल्या दोन्ही नाजूक करकमलामध्ये तिने फलक धरलेला आहे .उजवा लेखनात गुंतलेला असून डाव्या हातानी तिने फलकाचा पट्टा घट्ट पकडलेला आहे. तिच्या कमनीय बांध्यास फुलवणारी तिची नाजूक लांबसडक बोटे तिच्या सौंदर्यात भरच टाकतात. उजव्या हाताचा अंगठा व पहिल्या बोटात कलात्मक रीतीने पकडलेली लेखणी सुद्धा स्पष्टपणे नजरेत भरणारी आहे. तिचे मुखकमल आणि तिची केशरचना त्याच बरोबर कर्णकुंडले एका बाजूनेच दिसत असले तरीही मुखकमलावरिल भाव मनाला मोहून टाकतात. लांबट परंतु गोलाई प्राप्त झालेला तिचा चेहराही फलक लेखन किती मग्न झालेला आहे हे दर्शवतो.

मस्तकावरील तिचे कुंतल अत्यंत रचनाबद्ध वाटतात. तिचा केशसंभार फलकलेखनात मग्न झालेला तिचा चित्तभाव दाखवणारा आहे. कारण फलक लेखनाच्या आठवणीने तिने आपल्या लांबसडक केस घाईघाईने बांधलेले आहेत आणि राहिलेला भाग तिने पाठीवर मोकळे सोडून दिला आहे. याचाच अर्थ तिने अतिशय गडबडीने आपली केशरचना उरकली आहे .तिच्या करांची किंचित अशी झालेली तिरपी कमान आणि तिच्या पाठिस आलेला लयबध्द बाक लेखनातील तिची तन्मयता स्पष्ट करणारा आहे.तिच्या नाजूक सिंहकटी ची कल्पना जशी मोकळ्या सोडलेल्या केशसंभारावरून येते ,तशीच तिने परिधान केलेल्या कटीवलयामुळे येते.

फलकलेखन करण्यात ती एवढी गढून गेली आहे की, तिने आपले उजवे पदकमल किंचितसे केंव्हा वर उचललेले हे तिचे तिलाच कळाले नाही. ज्याप्रमाणे एखाद्या तारुण्यसुलभ सौंदर्यललनेचे सुस्नात लावण्य असते. तसेच या फलक लेखिकेचे पाठमोरे लावण्या रसिकांना खिळवून ठेवणारे आहे.विविध आभूषणांनी नटविण्यात कलाकार अजिबात विसरलेला नाही. केयूर, हेलकावणारी भलीमोठी कर्णभूषणे तिला शोभून दिसणारी आहेत.

कट्टी सूत्र,उरूद्दाम  आणि मुक्तदाम पाठीमागून ही किती सुंदर दिसतात हे या अंगाने परिधान केलेल्या आभूषणांनी आणि वस्त्रप्रावरणे यावरून स्पष्ट होते. नाजूक पदक कमलाची शोभा वाढवणारी  पादवलय आणि पादजालक तिने परिधान केली आहेत. ग्रांथिक वर्णनात हिला जरी पत्रलेखा म्हटले तरीही पत्रलेखा वाटत नाही. कारण हीच्या लिखाणाच्या पद्धतीवरून ही पत्र लिहिते असे कुठेही वाटत नाही. परंतु ही फलकलेखन करीत उभी आहे असे तिला पाहता क्षणी वाटते. म्हणून हिला पत्रलेखा म्हणण्याऐवजी फलकलेखा म्हणणे उचित ठरेल.( भ्यासकांना विनंती आहे की,पत्र कसे धरले जाते आणि फलकलेखन कसे केले जाते हा मूलभूत फरक लक्षात घ्यावा.ज्यांनी हिला पत्रलेखा संबोधायचे आहे त्यांनी खुशाल संबोधावे आमचे काहि एक म्हणने नाहि.)

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

Leave a comment