महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 8,381,001

छत्रपती संभाजी महाराजाना फितुरीने अटक कोणी केली ?

By Discover Maharashtra Views: 10504 11 Min Read

छत्रपती संभाजी महाराजाना फितुरीने अटक कोणी केली ?

छत्रपती संभाजी महाराजांना मोगल सरदार शेखनिजाम याने ३ फेब्रुवारी १६८९ रोजी अटक केली जेधे शकावलीतील नोंदीनुसार “ विभम संवछरे शके १६१० माघ वद्य ७ शुक्रवासरी ( १ फेब्रुवारी ) संभाजीराजे व कविकलश रायगडास जावयास संगमेश्वरास आले असता शेकनिजाम दौड करून येऊन उभयतांस जीवितच धरून नेले. वरकड लोक रायेगडास गेले. “

मद्रास वखारीतील २७ मार्च १६८९ मधील नोंदीनुसार “ दक्षिणेकडील ताजी बातमी अशी आहे कि संभाजीस त्याच्याच लोकांच्या फितुरीमुळे पकडले.” संभाजी महाराज हे फितुरीमुळे पकडले गेले याबाबत कोणतीही शंका नाही परंतु हि फितुरी नक्की कोणी केली याबाबत मात्र मतभेद आढळतात याबाबत जी नावे येतात त्यात गणोजी शिर्के किंवा शिर्के परिवारातील अन्य कोणी , कवी कलश , आणि पाली मठाचे रंगनाथस्वामी. सदर संशयित व्यक्ती व त्यांचे व संभाजी महाराजांचे व्ययतिक संबंध याविषयीच्या नोंदी अभ्यासू.

गणोजी शिर्के किंवा शिर्के परिवारातील अन्य कोणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी पिलाजीराजे शिर्के यांना आपली मुलगी राजकुवर बाई यांना पुत्र झाल्यावर देशमुखीचे वतन देण्याचे मान्य केले होते. शिवचरित्र साहित्य खंड ३ लेखांक ४३८ यात छत्रपती शाहू महाराजांनी शिर्क्यांना दिलेल्या वतनपत्रात या संबधी उल्लेख आढळतो. संभाजीराजे छत्रपती झाले त्यावेळी येसूबाई यांचे वडील पिलाजीराजे आपल्या सैन्यासह संभाजीराजांच्या मदतीस आले. त्यामुळे गणोजीराजे शिर्के या वतनासाठी आग्रही होते परंतु स्वराज्यात वतन देण्याची पद्धत बंद असल्याने त्यांना वतन दिले नाही. त्यामुळे गणोजी शिर्के नाराज होते.

ऑगस्ट १६८२ च्या दरम्यान कान्होजी शिर्के हे मोगलांना सामील झाले. त्यांना पाच हजारी मनसब देण्यात आली.

कवी कलश व शिर्के यांच्यात वाद निर्माण झाला यासबंधी आपणास चिटणीस बखर, मराठा साम्राज्याची छोटी बखर , पंतप्रतिनिधीची बखर यात माहिती मिळते.

चिटणीस बखरीनुसार शाहू महाराजांना गादीवर बसवून राज्य चालवावे असे राजकारण शिर्के करत असल्याची बातमी संभाजी महाराजांना कळली व त्यांनी शिर्क्यांवर हल्ला करून त्यांना पराभूत केले. यात शिर्के मारले गेले घरे जाळली गेले अशी नोंद आढळते . मराठा साम्राज्याची छोटी बखरीनुसार कवी कलशास मारावे म्हणून शिर्क्यांनी २५००० लोकांचा जमाव केला याची बातमी कलशास कळताच त्याने संभाजी महाराजांना सांगून शिर्क्यांवर हल्ला करवला त्यात अनेक जण मारले गेले.

चिटणीस बखरीतील नोंदीनुसार दौलतराव शिर्के , गणोजी देवजी वैगरे सर्व पळोन हबसाणात गेले. चहूकडे चार जाऊन मोगलाईत चाकऱ्या करू लागले. शिर्के व कवी कलश यांच्यात भांडण झाले व यामध्ये संभाजी महाराजांनी कवी कलश याची बाजू घेतली व शिर्क्यांवर आक्रमण केले त्यामुळे गणोजी शिर्के व संभाजी महाराज यांच्यातील वाद वाढून गणोजी शिर्के हे १६८८ मध्ये मोगलांना मिळाले.

जेधे शकावलीतील नोंदीनुसार “ शके १६१० कवी कलश याजवरी शिर्के पारखे जाले. “ “ कवी कलश हा पळोन खिलनियावर गेला तेच मासी संभाजीराजे रायगडाहून कलशाचे मदतीस आले. समागामे स्वारी सिरकीयांसी युद्ध करून त्यास पळवून खळणीयास आले. “

मासिरे आलमगीरीतील नोंदीनुसार “ मुकर्रबखानाने एखाद्या धोरणी व सावध माणसाप्रमाणे त्याने त्या काफिराची ( संभाजी ) बातमी आणण्यासाठी स्वतःचे हेर नेमले. अकस्मात त्याला खात्रीशीर बातमी लागली कि संभाजीराजे आणि त्याचे नातेवाईक शिर्के यांचे भांडण झाले. त्याकरिता रायरीहून खेळण्यास गेला. तेथून तो संगमेश्वरास गेला.

औरंगजेबाला शिर्के व संभाजी महाराजांच्या वादाविषयीची बातमी मिळाली व त्याने मोगल सरदार शेखनिजाम यास पत्र लिहिले “ तो जहागीरदार ( संभाजी ) रायरीहून एकटाच खेळण्यास गेला आहे. त्याचे कारण म्हणजे शिर्क्यांशी भांडण देणे हे आहे.”

संभाजी महाराजाना संगमेश्वरला कैद झाली त्या भागाची खडानखडा माहिती शिर्के यांना होती त्यामुळे शिर्क्यांचे मार्गदर्शन मोगल सरदार शेखनिजाम यास झाले असावे असा तर्क करू शकतो.

संभाजीराजाना औरंगजेबाने हाल हाल करून मारले . रायगडावर हल्ला केला १९ ऑक्टोंबर १६८९ रायगड मोगलांच्या ताब्यात गेला. महाराणी येसूबाई आपला पुत्र शिवाजी व इतर लोकांसह कैद झाल्या . यावेळी गणोजी शिर्के व कान्होजी शिर्के हे औरंगजेबाचे सैन्यात चाकरीस होते.

छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीस आश्रयास गेले असता डिसेंबर १६९७ रोजी मोगली सैन्याचा वेढा पडला त्या वेढ्यातून सुटका करण्यासाठी गणोजी शिर्के यांनी दाभोळचे वतन घेऊन राजाराम महाराज यांना या वेढ्यातून सुखरूप बाहेर पडण्यास मदत केली.

मोगल दरबाराच्या बातमीपत्रातील नोंदीनुसार दहा मार्च १७०१ रोजी कान्होजी शिर्के याने बादशाहाची भेट घेतली. गणोजी शिर्के ( पाच हजारी ) याच्या मनसबित वाढ करण्यात आली. मुगलांच्या तर्फे लढणाऱ्या मराठा सरदारांची नावे आढळतात या बातमीपत्रात आढळतात . त्यांत सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जतचे डफळे, बुधपाचगावचे घाटगे, म्हसवडचे माने अशी नावे आढळतात. कान्होजी आणि गणोजी शिर्के हे शेवटपर्यंत मोगलांना चिकटून होते.

गणोजी शिर्के यांचे संभाजी महाराजांशी वाद होते त्या वादातून ते औरंगजेबास मिळाले. परंतु त्यांनी फितुरी केली यास कोणताही ठोस संदर्भ नाही. फितुरी म्हणजे स्व:पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षास गुप्तपणे मदत करणे. गणोजी शिर्के उघडपणे औरंगजेबास मिळाले होते. अनेक मराठा सरदार औरंगजेबाच्या पदरी होते.

कवी कलश –

कवी कलशविषयी मराठी साधनातून स्वराज्य बुडवल्याचा व मोगली साधनातून तो मोगलांचा हेर असल्याच्या नोंदी आढळून येतात

चिटणीस बखर, मराठा साम्राज्याची छोटी बखर , पंतप्रतिनिधीची बखर या साधनातील एकसमान नोंदीनुसार कवी कलशाने राज्य बुडवले, संभाजी महाराजाना कलशाने वश केले अशी नोंद आढळते

इटालियन प्रवासी निकोलाय मनूची लिहितो “ संभाजीविरुद्ध यश मिळवण्यास कारस्थानाचाच उपयोग केला पाहिजे असे औरंगजेबास वाटू लागले. त्याने संभाजीचा मुख्य कारभारी कवी कलश यास एक पत्र लिहिले , त्याला त्याने मूल्यवान भेटी आणि भक्कम रकमा पाठविल्या. याचा परिणाम असा झाला कि कवी कलशाने संभाजीला जिवंत पकडून देण्याचे मान्य केले. “ कवी कलशाने संभाजी महाराजांना एक सुंदर स्त्री एका गावात असल्याचे सांगितले व त्याच वेळी औरंगजेबास संभाजी महाराज त्या गावी येणार असल्याची खबर दिली त्यानुसार संभाजी महाराज त्या गावी येताच त्यांना मोगली सैन्याने कैद केले.

निकोलाय मनूची पुढे लिहितो “ कवी कलशाची जीभ मुळापासून उपटून काढण्यात यावी अशी औरंगजेबाने आज्ञा केली. हेतू असा कि आपण हि फितुरी औरंगजेबाच्या सांगण्यावरून केली हे कवी कलशास सांगता येऊ नये. “

मनुचीने सदर हकीकत ऐकीव माहितीवरून लिहिलेली आहे. त्याला शिर्के व व संभाजी महाराज यांच्यात झालेल्या वादाची माहिती दिसून येत नाही. कारण संभाजी महाराजांना कैद झाली त्यावेळी तो मद्रासच्या बाजूस होता. चार वर्षापूर्वीच तो १६८६ च्या सुमारास तो मोगलाना फसवून मद्रासला पळून गेला. रॉबर्ट ऑम हा लेखक देखील त्याच्या उत्तरकालीन 70 वर्षांनी लिहिलेल्या साधनात कवी कलश हा औरंगजेबाचा हेर असल्याचे सांगतो. रॉबर्ट ऑम हा देखील ऐकीव माहितीवर व मनुचीच्या माहितीची नक्कल करत आहे.

औरंगजेबाच्या दरबारातील इश्र्वरदास नागर फुतुहात –ए-आलमगिरी यात लिहितो “ कवी कलश हा औरंगजेबाचा हेर होता कवी कलशाने संभाजी विरुद्ध फितुरी केली”. “ औरंगजेबाने रायगडाची प्रतिमा कवी कलशाच्या मुलाच्या मदतीने बनवून घेतली” अशी नोंद करतो.

कवी कलश हा शिर्क्यांच्या विरोधात होता त्यामुळे औरंगजेबाने शिर्क्यांसारखे शूर सरदार कवी कलशामुळे नाराज होऊ नयेत म्हणून त्याला मारले असावे का ? हा फक्त तर्क आहे. कारण औरंगजेबाचा पूर्वइतिहास पाहता त्याने स्वतःच्या वडिलांना , भावाला हाल हाल करून मारले. मिर्झाराजे जयसिंग सारख्या सरदाराचा मृत्यू औरंगजेबाने घडवून आणला. दिलेरखान याने आत्महत्या केली त्यावर हि वेळ आणणारा देखील औरंगजेबच.

संभाजी महाराज व कवी कलश यांना साखळदंडामध्ये कैद करून औरंगजेबासमोर आणण्यात आले. औरंगजेब सिंहासनावरून खाली उतरला व जमनीवर डोके ठेऊन अल्ल्हाची पार्थना करू लागला. त्यावेळी कवी कलश यांनी एक काव्य केले. ,”हे राजा (छत्रपती संभाजी महाराज) तूला पाहिल्यानंतर बादशाह आलमगीराला आपल्या दिमाखदार आणि ताकदवान असलेल्या त्याच्या सिंहासनावर बसणे अशक्य झाले आहे आणि तो तूला सलाम करण्यासाठी आपले सिंहासन सोडून खाली आला आहे !

सदर काव्य ऐकून औरंगजेबाने कवीकलशाची जीभ छाटण्याचा आदेश दिला. मुन्तखबुल्लुबाब, फार्सी, खंड २, कवी कलशाने केलेले काव्य कलशाची संभाजी महाराजांविषयीची एकनिष्ठता दर्शवते.

कवी कलश संभाजी महाराजांशी एकनिष्ठ होता. औरंगजेबासमोर केलेल्या काव्यातून ते दिसून येते. कवी कलशाला औरंगजेबाचा संशयी व विश्वासघातकी स्वभाव माहिती होताच . औरंगजेबाचा मुलगा अकबर हा जीव वाचवण्यासाठी मराठ्यांच्या आश्रयास आला त्याचे उदाहरण देखील कवी कलशासमोर होते. कवी कलशाला संभाजी महाराजांनी मित्राप्रमाणे मान सन्मान दिला होता . मराठा राज्यात कवी कलशाला फार महत्व होते. शिर्के हे औरंगजेबाला सामील झाले होते त्यामुळे औरंगजेबाकडे कवी कलशाला महत्व प्राप्त झाले नसते. त्यामुळे कवी कलश फितुरी करणे शक्य नाही.

पाली मठाचे रंगनाथस्वामी –

रामदास स्वामींचे शिष्य पाली मठाचे रंगनाथ स्वामी हे संगमेश्वरच्या ठिकाणी संभाजी महाराजांन सोबत असल्याची नोंद श्रीसमर्थ संप्रदायाची कागदपत्रात आढळते. कवी कलश व संभाजी महाराजांना पकडले त्यावेळी रंगनाथ स्वामी तेथून निसटले व वाघापुरीस गेले . या सदर नोंदीच्या आधारे रंगनाथस्वामी यांनी संभाजी महाराजांची बातमी औरंगजेबास दिली असे विधान करतात. मुळात रंगनाथ स्वामी व संभाजी महाराज यांच्यात कोणतेही वाद न्हवते तसेच कोणतेही संदर्भ साधनात रंगनाथस्वामी यांच्यावर आरोप केले गेलेले नाहीत. त्यामुळे रंगनाथ स्वामी यांचा सदर घटनेशी दुरान्वयेहि संबंध दिसून येत नाही.

संभाजी महराज बेसावध होते का ?

मासिरे आलमगिरी व खाफिखानाच्या नोंदीनुसार हेरांनी मोगली फौज येत असल्याची बातमी दिली परंतु संभाजी महाराजांनी या बातमीवर विश्वास ठेवला नाही व हेरांना ठार मारण्यात आले , त्यांच्या जीभ छाटण्यात आल्या.

संभाजी महाराजांनी हेरांनी बातमी आणली म्हणून शिक्षा दिली ह्या वरील लेखनकर्त्यांच्या नोंदी ह्या अतिशयोक्तीपूर्ण आहेत.

भीमसेन सक्सेना , चिटणीस बखर संभाजी महाराज व कवी कलश अनुष्ठान करण्यात व्यस्त होते अश्या नोंदी करत आहेत.

संभाजी महाराजांनी अनुष्ठान करण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु त्यामुळे ते हेरांच्या बातमीकडे दुर्लक्ष नक्कीच करणार नाहीत. औरंगजेब स्वराज्यात दाखल झाल्यापासून संभाजी महाराज त्याच्याशी यशस्वी झुंज देत होते. संगमेश्वर हे ठिकाण दुर्गम होते त्यामुळे त्या भागातील जाणकार व्यक्ती फितूर झाल्याशिवाय मोगल सरदार शेखनिजाम त्या ठिकाणी अकस्मात येणे शक्य न्हवते.

संभाजी महराजाना कैद करण्यात फितुरी झाली हे नक्की परंतु हि फितुरी नक्की कोणी केली याबाबत कोणताही ठोस संदर्भ नाही . इतिहास याबाबत मौन बाळगतो त्यामुळे फितूर कोण याबाबत फक्त तर्कानेच आरोप केले जातात. भविष्यात एखादा ठोस संदर्भ मिळून याबाबतचे उत्तर मिळावे हीच एक आशा.

श्री. नागेश सावंत

संदर्भ :- जेधे शकावली , चिटणीस बखर , पंतप्रतिनिधीची बखर , श्रीसमर्थ संप्रदायाची कागदपत्र , असे होते मोगल निकोलाय मनूची , शिवचरित्र साहित्य खंड ३ ,मासिरे आलमगिरी , मोगल दरबाराची बातमीपत्रे, शिवपुत्र संभाजी – कमल गोखले, ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा : -सदाशिव शिवदे, छायाचित्र साभार गुगल.

छत्रपती संभाजी महाराजाना फितुरीने अटक कोणी केली ? } Who arrested Chhatrapati Sambhaji Maharaj?

Leave a comment