चामरा १ | कोरवलीच्या सुरसुंदरी

चामरा | कोरवलीच्या सुरसुंदरी

चामरा –

कोरवलीच्या सुरसुंदरी लेख क्र.१२ –

कोरवलीच्या सुंदरीच्या समूहात आपल्या अनुपम सौंदर्याने भर टाकणारी आणखी एक ललना पहावयास मिळते .स्वर्गीय अप्सरेमध्ये हिचा देखील समावेश करता येतो. द्विभंगा अवस्थेत वर्षानुवर्ष कलाप्रेमींना आणि गुणग्राही रसिकांना आकर्षित करणारी ही तिलोत्तमा तिच्या स्वर्गीय स्वरूपामुळे उठावदार दिसतेच, परंतु लक्ष वेधतो तिचा सेवाभाव, देवसेविका असणारी ही तारुण्यसुलभ ललना चेहऱ्यावर देखील सेवा वृत्तीचा वसा घेतलेली आहे.चामरा.

अतिशय सडसडीत, उंचीपुरी, लयदार व मधाळ तुनुची ही स्वामिनी आहे. पाहणाऱ्यास ज्याप्रमाणे तिचे देखणे रूप आकर्षित करते ,त्याच प्रमाणे तिची नम्रता आणि सेवाशीलता मनामध्ये घर करून जाते. मस्तकाशी दुहेरी प्रभावळ असणारी आणि डोक्यावर एखाद्या मुकुटाप्रमाणे केशरचना केलेली ही चामरा कानाच्या पाळी मध्ये दौलडार आणि लक्षवेधक कर्णभूषणे ल्यायलेली आहे. तिच्या लयदार तनुला शोभा देणारी मान आणि रुंद भारदस्त असणारी तिचे दोन खांदे कलाकारांनी इतक्या खुबीने रेखाटले आहे की,त्यामूळे  तिच्या सौंदर्यास एक वेगळीच अनुभूती चढलेली आहे. तिच्या दोन्ही पायामुळे तिच्या कटि खालील काया एक लयदार पण सुबक वळण लाभलेली आहे. दोन्ही हातांच्या नाजूक बोटां प्रमाणेच तिच्या पदकमलाची ही देखणी उतरण शिल्पकारांनी कौशल्याने समोर मांडली आहे. अलंकार आणि वस्त्रे प्रावरणे यांच्याशिवाय कलाकारास कधीही स्त्री सौंदर्यास पूर्णत्व देता येत नसते. याची प्रचिती या चामरेच्या नखशिकांत आभूषणावरून येते. स्कंदमाला, केयूर, हिकासूत्र, स्तनसूत्र आणि कर्णभूषणे ल्यायलेली आहेत. उजव्या हातातील चामर आणि डावीकडील बीजपूरक यासाठी तिने पकडलेले आहे की, आपण एक सेविका आहोत हे तिला शब्दांशिवाय पटवून द्यायचे आहे .इतर अप्सरांच्या गोतावळ्यात असल्यामुळे तिलादेखील कलाकारांने कटिसूत्र,उरुद्दाम, मुक्तद्दाम परिधान करण्यास भाग पाडले आहे. दोन्ही पायांची शोभा वाढवणारे पादवलय व पादजालक हिच्याकडेहि आहेत. अशी ही स्वर्गीय यौवना  म्हणून सुरसुन्दरीच्या समूहामध्ये सामील झाली आहे.

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here