महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

बोधिसत्व अभिताभ | आमची ओळख आम्हाला द्या

By Discover Maharashtra Views: 1177 4 Min Read

बोधिसत्व अभिताभ | आमची ओळख आम्हाला द्या –

भारताच्या प्राचीन इतिहासात मूर्तीशास्त्राचा अनेक प्रकारे उपयोग करून घेतला गेला. या शास्त्राच्या अनेक आयांमाना  देश ,काल, परिस्थिती नुसार विचार करण्यात आला. सामाजिक सामंजस्य ,प्रबोधन, विविध गटांचे संम्मीलन, एकोपा इत्यादीसाठीचे. या शास्त्राचा दूरदृष्टी पणाने समाजधुरीणांनी, पंडितांनी, तत्त्ववेत्त्यांनी अत्यंत परिणामकारकपणे उपयोग करून घेतला. याच काळात मूर्तीच्या प्रकारात वाढ झाली. मूर्ती आणि प्रतिमा यामध्ये फरक आहे. मूर्ती ही सुशोभीकरणासाठी असते. ती मंदिराच्या परिसरात अथवा मंडोरावर असते. प्रतिमा या गाभार्‍यात पूजेसाठी असतात. पण एक मात्र खरे भारतात निव्वळ पूजा म्हणून मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली नाही. या मूर्तीच्या बाबतीत ते नेमक्या शब्दात सांगायचे तर प्रतिमांच्या अनुषंगाने त्यांनी त्यांचे स्वतंत्र शास्त्र व विज्ञानही विकसित केले.(बोधिसत्व अभिताभ)

प्रत्येक मूर्ती अथवा प्रतिमा तयार करण्या पाठीमागे अध्यात्मिक अधिष्ठान असे. धार्मिक ,पौराणिक कथेला अनुसरून अशाच मूर्ती घडवल्या जात असत. अशा मूर्ती आज आपणास अनेक ठिकाणी पहावयास मिळतात. मागच्या पिढ्यातील मूर्ती अभ्यासकांनी उपलब्ध माहितीच्या आधारित आणि आपल्या आकलन शक्तीनुसार मूर्तीची ओळख सांगण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये अशा अनेक मूर्ती सांगता येतील की ज्यांची वेगळीच ओळख इतिहासात नमूद आहे. त्यापैकी एक मूर्ती म्हणजे पानगाव च्या विठ्ठल मंदिरावरील देवकोष्टातील *बोधिसत्व आमिताभ* होय. ज्यांला आजपर्यंत योगविष्णू म्हणून संबोधले जाते.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात पानगाव हे लातूर पासून 30 किलोमीटर अंतरावर असणारे गाव आहे. या ठिकाणी चालुक्यकालीन विठ्ठल मंदिर आहे. या मंदिराच्या स्थापत्य शैलीवर होयसळ, चालूक्य आणि काकतीय शैलीचा प्रभाव जाणवतो. या मंदिराच्या मंडोवरावर विविध देवांगणांचे अंकन केलेले दिसून येते. याच मंदिराच्या देवकोष्टात आपणाला बोधिसत्व अमिताभ ही मूर्ती पाहावयास मिळते. या मूर्तीला बोधिसत्व अमिताभ का म्हणावे? याची कारणे आपणाला मूर्ती शास्त्राच्या दृष्टीकोनातून पुढील पद्धतीने सांगता येतील

योगेश्वर विष्णूची लक्षणे –

मूर्तीचे योगीभोगादी चार प्रकार असतात हे आपण जाणतोच. त्यापैकी योगा अवस्थेतील विष्णुच्या स्थानक तशाच बैठ्या  म्हणजे योगासन मूर्ती आढळतात. योगेश्वर विष्णू पद्मासनात बसलेला असून पुढील दोन्ही हात ध्यान मुद्रेत मांडीवर एकत्र ठेवलेले असतात. त्याचे मागील हातात गदा व चक्र ही आयुधे असतात अशाच प्रकारचे शिल्प धर्मापुरी जिल्हा बीड व उमरगा तालुका उस्मानाबाद येथील शिवमंदिरावर आहेत. पानगाव मंदिराच्या देवकोष्टकात असणाऱ्या मूर्तीमध्ये वरील प्रकारचे कोणतेही लक्षण अथवा आयुध दिसत नाही. विष्णु परीकरामधील कोणत्याही देवता नाहीत. मग तो योगेश्वर विष्णू कसा! हा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहात नाहि.

पानगाव येथील बोधिसत्त्व अमिताभ –

पानगावच्या देवकोष्टातील मूर्ती द्विभूज असून अर्धपद्मासनावस्थेत बसलेली आहे. मूर्तीची उंची 30 सेंटिमीटर आहे. मस्तकावर उंच असा किरीट मुकुट आहे. त्यावर रत्न अंकित केलेले आहेत. चेहरा मोहक असून धनुष्याकृती भुवया, अर्धोन्मीलित मत्स्याकृती नेत्र, चाफेकळी नाक, प्रमाणबद्ध देहयष्टी. कानात मकर कुंडल, गळ्यात एकावली आणि यज्ञोपवीत .बाजूबंद,  मेखला, कटी वस्त्र ,तोडे, पैंजण इत्यादी अलंकार त्यांनी परिधान केलेले आहेत. डाव्या हातावर उजव्या हाताचा तळवा असून उजव्या हाताच्या बोटामध्ये कमळ धरलेले आहे. बोधिसत्व नेहमीच अलंकारांनी मंडित असतात .उपरोक्त वर्णन बोधिसत्व अमिताभ या मूर्तीशी अगदी तंतोतंत जुळते. हे वर्णन टी गोपीनाथराव यांच्या ग्रंथात आहे.

पानगावच्या विठ्ठल मंदिरावरील योगेश्वर विष्णू म्हणून सांगितले जाणारे शिल्प हे विष्णूचे नसून बोधिसत्व अभिताभचे आहे हे सिद्ध होते. मूर्तिशास्त्र संबंधित ग्रंथात योगेश्वर विष्णूची जी लक्षणे सांगितली आहेत. त्यापैकी एकही लक्षण आपणास संबंधित मूर्ती पाहावयास मिळत नाही मग कोणत्या आधारावर त्यास योगेश्वर विष्णू म्हटले गेले? कोणत्याही मूर्तीशी ओळख ही त्याच्या आयुधावरून, वाहनावरून, लक्षणांवरून होत असते. परंतु या मूर्तीत विष्णूचे एकही लक्षण आढळून येत नाही. उलट बोधिसत्व अमिताभची सर्व लक्षणे ह्या मूर्तीत आढळून येत असल्याने ही बोधिसत्व अमिताभाचीच मूर्ती आहे हे साधार स्पष्ट होते.

महाराष्ट्रात अशा प्रकारच्या बोधिसत्वाच्या अनेक मूर्ती आहेत. पण त्यांची ओळख दुसऱ्याच नावाने करून दिली जाते. त्यामुळे अशा मुद्द्यांवर संशोधन होऊन त्यांची खरी ओळख होणे काळाची गरज आहे.

डाँ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

Leave a comment