भद्रकाली | आमची ओळख आम्हाला द्या

भद्रकाली

भद्रकाली | आमची ओळख आम्हाला द्या –

सोलापूर जिल्ह्यात असलेली मंदिरे मूर्ती शिल्पे ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. येथील मंदिर बांधणीवर विशेषता शैव  पंथथियांचा प्रभाव दिसून येतो. सोलापूर पासून दक्षिणेस १७ किलोमीटर अंतरावर बंकलगी नावाचे छोटेसे गाव आहे .या गावाच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला काही मूर्ती भग्नावस्थेत पडलेल्या आहेत. त्यामध्ये विष्णू ,महालक्ष्मी, सप्तमातृका, दुर्गा, नागशिल्प भद्रकाली इत्यादी मूर्ती आहेत. या मूर्तीमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे प्रस्तुत प्रतिमा अतिशय दुर्मिळ स्वरूपाची आहे.

हे स्त्रीदेवता शिल्प आहे.या देवीस आजवर संशोधकांनी व अभ्यासकांनी लक्ष्मी,दूर्गा,अजमूंडा,चामूंडा,अशा विविध नावांनी संबोधले आहे. देवी आसनावर सव्यललितासनत बसलेली असून ती चतुर्भुज आहे. तिचे खालील उजवा व डावा हात आयुधांसह कोपऱ्यापासून भग्न झालेले आहेत. देवीने मागील उजव्या हाती डमरू, डाव्या हाती त्रिशूल ही आयुधे धारण केलेली दिसतात. समोरील भग्न झालेल्या हातामध्ये उजव्या हाती खड्ग व डाव्या हाती कपालअसावे. देवीच्या डोक्यावर जटामुकुट, कानात कुंडले, गळ्यात हार दंडावर बाहूभूषणे, पायात तोडे असे अलंकार घातलेले आहेत.

कपाळावर रुद्रबंध आहे. ललित आसनात बसलेल्या या देवीच्या डाव्या मांडीखाली मेंढ्याचे शीर(अजमुंड) व उजव्या मांडीखाली नरमुंड (माणसाचे शिर) कोरलेले दिसून येते. या देवीची वर्णने अद्याप कोणत्याही  मूर्तीशास्त्राच्या ग्रंथात आढळलेले नाही. मग ही मूर्ती नेमकी कोणत्या देवतेची आहे यावर आजही संशोधन चालू आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या प्रतिमा क्वचितच आढळतात .म्हणूनच बंकलगी येथील देवीची मूर्ती दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण ठरते. ही देवी दुर्गा देवी म्हणून सर्वपरिचित आहे कारण माणसाला अनेक संकटापासून ती मुक्त करते

आजवर झालेल्या संशोधनात अशा प्रकारची मूर्ती कोठेही आढळलेली नाही. मग ही मूर्ती नेमकी कोणत्या देवतेची आहे यावर आमचे आजही मंथन चालू आहे. अशाच प्रकारच्या मूर्ती सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा. मोहोळ ,धोत्री व उस्मानाबाद येथील जागजी व बीड येथील कंकालेश्वर  मंदिरावर आढळून येतात. मग या देवतेचे मूळ नाव काय? हा प्रश्न शेवटी अनुत्तरितच राहतो या मूर्तीसाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभरातील मूर्ती अभ्यासकांचा आम्ही पाठपुरावा घेतला .तरीही ही मूर्ती कोणत्या देवतेची आहे? तिचे वर्णन कोणत्या धार्मिक ग्रंथात आहे? या प्रश्नाचे उत्तर आजही मिळालेले नाही. त्यामुळे वाचकांना विनंती आहे की ही मूर्ती कोणत्या देवतेची आहे यावर जर कोणता संदर्भ उपलब्ध असेल तर तो कळवावा.तूर्तास हिला आम्हि भद्रकाली संबोधले आहे.प्रजापती दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठि शिवाने जो वीरभद्र निर्माण केला होता त्याची हि शक्ती भद्रकाली असावी.प्रजापतीचा शिरच्छेद केला तेंव्हा त्याला अजमुख अर्थात बकर्‍याचे मुख बसविले त्यामूळे याठिकाणी अज आणि मानवी मुंड दाखविले गेले असावे.त्यामूळे हिला भद्रकाली म्हणणे उचित ठरेल.

जागजी येथील मूर्तीचे फोटो डाॅ.माधवी महाके मॅडम यांनी उपलब्ध करून दिला आहे.

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here