बाजींद भाग ३ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

By Discover Maharashtra Views: 6387 10 Min Read

बाजींद भाग ३ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग ३ – आभाळातून वीज चमकावी तसे ते दोन बाण वाऱ्याच्या वेगाने येऊन समोर जमिनीत घुसले अन जिवाच्या आकांताने ते वाघांचे धूड पळताना पाहून सखाराम व मित्रांना आश्चर्य वाटले.

एव्हाना जिवाच्या भीतीने पळत सुटलेले ते चौघेही जणू काही झालेच नाही अश्या आवेशात उठली आणि आपल्या बचावासाठी एवढया पावसात आणि या दुर्गम जंगलजाळीत कोण आला आहे याचा कानोसा घेऊ लागली.

तो कोणीही असो,त्यांच्यासाठी देवदूत होता.
एक दीर्घ श्वास घेत ते चौघे वडाच्या झाडाकडे पाहू लागले…आणि त्यांना हातात धनुष्य घेतलेल्या एका योध्याचे दर्शन घडले…!

सहा साडेसहा फूट उंच,अनवाणी पण भव्य पाय,दोन्ही पायात काळा दोरा,अंगात धोतर आणि काळा अंगरखा ज्यावर रक्ताचे डाग…गळ्यात चांदीची पेटी लटकत होती.
कमरेला समशेर व पाठीला ढाल होती.

कमरेला पांढरा शेला बांधला होता,डोक्याला मराठी पद्धतीचे मुंडासे व भव्य कपाळावर भंडारा लावला होता..आग ओकणारे लाल भडक डोळे,सरळ सळसळीत नाक,कल्लेदार मिशा….एक विशी पंचविशीत तो तरुण धिप्पाड मल्ल भासत होता…!

चेहऱ्यावर एक प्रकारची गंभीरता स्पष्ट जाणवत आपले भव्य अनवाणी पाय त्या ओढ्याच्या भिजलेल्या मातीवर ताकत तो एक एक पाऊल त्या चौघांच्याकडे येत होता.

चौघांनाही कुतूहल,आश्चर्य,अनेक प्रश्न पडले होते…कोण असावा हा धीरगंभीर पुरुष…!

चौघांनीही धीर एकवटून त्या पुरुषांकडे जायला पावले उचलली आणि तितक्यात आभाळातून सरसर मेघधारा बरसू लागल्या..!

तो धिप्पाड पुरुष तसाच मागे सरकला आणि वडाच्या डोलीत थांबत त्या तिघांनी तिथे येण्यासाठी खुणावले..!

ती खून मिळताच तिघेही धावत त्या डोलीकडे धावू लागली…धावताक्षणी एवढ्या मुसळधार पावसातही वाघांच्या डरकाळ्या मात्र पुन्हा एकदा ऐकू येत होत्या….!

चोघेही त्या युवकाजवळ आले,निशब्द शांतता भंग करत सखाराम त्याला बोलला…!

“पाव्हणं… कुण्या गावचं तुमी ?
लय उपकार झाले बगा तुमचे,माझ्या खंडेरायानेच तुम्हाला हित पाठवलं बगा..तुमचे लय उपकार झाले”
सखाराम च्या शब्दाला मान डोलवत तिघेही सुरात सुर मिसळून मान हलवू लागली..!

क्षणभर शांतता पसरली,अन काही क्षणात त्या युवकाचा धीरगंभीर आवाज ऐकायला मिळाला…”कोण तुम्ही ?
का आला आहात तुम्ही इकडे ?”

निर्धारी प्रश्न विचारत त्याचे ते अंगार ओकणारे डोळे त्या चौघांवर पडले अन चौघांनाही काय बोलावे क्षणभर समजेना…!

आम्ही धनगरवाड्याचे,रायगड ला निघालो आहोत…सखाराम बोलून गेला…!

रायगडी ? कशासाठी ?
क्षणाचाही विलंब करता त्या युवकाने प्रतिप्रश्न केला…!

मग,सखाराम ने त्यांच्या येण्याचे कारण सांगितले.
टकमकावरुन येणाऱ्या मढ्यांच्या मास रक्ताला चाटवलेले वाघ,जनावरे माणसावर हल्ले करत आहेत..सारे पंचक्रोशीतील गाववाले हैराण आहेत या गोष्टीवर…म्हणून आम्ही हे प्रकरण रायगड च्या सरकारी लोकांच्या कानावर आणि गरज पडली तर महाराजांना भेटून सांगायचे म्हणून घराबाहेर पडलो आहोत…!

मूर्ख आहात तुम्ही…मोठ्या आवाजात तो युवक बोलला…तुमची गाऱ्हाणे ऐकायला असे कसेही भेटतील काय सरकारी अधिकारी आणि महाराज ?

आणि रायगड सोडून या दरीत का आलाय मरण्यासाठी ?

त्याच्या या प्रश्नाने नारायण बोलला…आर कोण र तू ?
मगापासून ऐकून घेतोय तुझं..वाघापासून वाचवलं म्हणून तुझं उपकार मानायला लागलो तर आम्हाला कायदा शिकवायला लागलास काय ?
आधी तू सांग कोण आहेस, आणि हे अंगावर रगात कसलं ?

नारायण च्या या बोलण्याने तो युवक थोडा आकसला….!
मोठा श्वास घेऊन बोलला…मी …मी कोण ?
हाच प्रश्न जन्मापासून स्वतःला विचारत लहानाचा मोठा झालोय….!
अजून उत्तर सापडत नाही,आणि आता सापडून पण उपयोग नाही..!

खंडोजी नाव माझं..!
महाराजांच्या हेर खात्यात बहिर्जी नाईकांच्या समवेत 10 वर्ष काम केलंय… पण…पण आता भटकतोय या दरीत एकटाच..!
वाट बघतोय कोणाची तरी…!

खंडोजी च्या या बोलण्याने चौघेही आश्चर्यचकित झाले..!
चौघांना चूक झाल्याची जाणीव झाली आणि सखाराम ने खंडोजी ला माफी मागत बोलू लागला….

“माफ करा सरकार,आम्ही गरीब लोक,ह्यो नारायण,ह्यो मल्हारी,ह्यो सर्जा आणि आन म्या सखाराम”
मल्हारी पण महाराजांच्या फौजेत जायला गेला हुता सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या तालमीत,पण हत्यारे शिकत व्हता आणि सिंहगड च्या दंग्यात सुभेदार गेलं आण मग ह्यो परत आला गावाकडं…आमची लय इच्छा व्हती की राजांच्या फौजेत सामील व्हावं पण एवढं नशीब कुठलं ओ आमचं…पण खंडेरायाच्या कृपेनं गावगाडा सांभाळतो आमी.. गावसाठीच सरकार ला हे टकमक वरची मढी काढायला कोणाची तरी नेमणूक करा म्हणून आर्जव करायला निघालोय आम्ही…तुम्ही नाईकांच्या जवळचे म्हणजे महाराजांचे पण जवळचेच… आम्ही हात जोडतो एवढं पुण्य घ्या पदरात….आमची गाऱ्हाणी सांगा सरकारी दरबारी…”

चौघांनी खन्डोजी ला हात जोडलेलं बघितलं आणि खन्डोजीने हातातलं बाण खाली टाकत सखाराम चा हात पकडत म्हणाला….नका हात जोडून अजून पापात पाडू मला….आधीच लय पापाचे ओझं घेऊन वावरतोय मी….चला मी तुम्हाला मदत करतो…”

खंडोजी च्या आश्वासनाने चौघांना धीर आला.

खंडोजी म्हणाला…पण गड्यानो..मी फक्त तुम्हाला मार्ग दावीण आणि युक्त्या सांगीन…मी स्वता काय बी करणार नाही…मला कोणीही प्रश्न विचारायचा नाही..मी सांगल तस जर वागायचं वचन देत असशील तर मी नक्कीच या कामात तुम्हाला मदत करीन..”

चौघांनीही होकारात्मक मान हलवली.
खंडोजी ने वडाच्या डोलीत ठेवलेली एक कानाबरोबर उंचीची काठी काढली आणि चौघांकडे पाहत बोलला….चला निघूया, आता जोवर तुमच काम होत नाही तोवर माघे यायचे नाही…”

सखाराम,नारायण,सर्जा,मल्हारी चौघांनाही खंडोजी च्या रुपाने आशेचा किरण दिसू लागला.

ते चौघे खंडोजी च्या पाठोपाठ पावले टाकत त्या जंगलात निघाली..!
एव्हाना पाऊस बंद झाला होता,सूर्य मावळतीला झुकत निघाला होता.
“मंडळी,रात्र होण्याच्या आधी इथून तीन कोसावर एक चोरवाट आहे दाट जंगलात,पण गेल्या 15-20 वर्षात तिकडं कोणी फिरकला नसेल.
आपल्याला रात्र काढायला चांगलं ठिकाण आहे,आजची रात्र तिथं काढूया आणि सकाळी दिवस उगवायला रायगड च्या हमरसत्याला लागूया…!
मोर्चे,मेटे आडवे आहेत,पण तिकडं गेला तर परवाने,ओळख सगळं विचारतील आणि विनाकारण तुरुंगात पण डांबून ठेवतील जर ओळख नाही पटली तर…!
मला ह्यो परिसर घरच्या वाणी आहे,मी तुम्हास्नी निम्म्या वक्तात चित दरवाजा जवळ नेतो…आणि मग पुढ काय करायचं मी संगतोच…चला लौकर पाय उचला…!

खंडोजी तरातरा चालू लागला.पायात पायतान नसताना त्याचा चालायचा वेग बघून चौघेही पाहातच राहिले,त्यांना पायात पायतान असून चालन जमत नव्हतं एवढया वेगाने…!

आणि केवळ अर्ध्या एक तासात एका दाट अरण्यात त्यांचा प्रवेश झाला.इतके दाट की झाडाला झाड लागून असावे इतकी झाडांची गर्दी…!
जमिनीवर लाकडे कुजून काळा थर चढला होता,त्यावरून खंडोजी च्या मागे ते निघाले होते.
त्या भयप्रद जंगलाला बघून मल्हारी बोलला…सखा,लगा हयात गेली मेंढर चरवण्यात इकडं कधी येन झालं नाही,कितीतरी येळा जवळन गेलोय मी,इतकी दाट झाली आईच्यान सांगतो बघितली नव्हती,ही झाडी कशी काय आली असलं इथं ?
गप र…भिऊन काय बी बरळु नको,महाराजांचा हेर आहे खंडोजी, असलं त्याला गुप्तवाट माहिती..चला गुमान..”

जंगलाच्या मध्यावर येताच जंगली किड्यांची किरकिर आवाज अतिशय वाढला,सूर्य मावळातील गेल्याने पुढचं काय दिसत नव्हतं..!
एका पाऊलवाटेने ते चालत होते आणि एका वळणावर खंडोजी बाजूला गेला आणि सखाराम पुढे आला तर खंडोजी कुठे नजरेस पडेना..!
त्याने मागे पाहिले आणि सर्जा,नारायण,मल्हारी ला सांगितले की खन्डोजी कुठे गेला ?
एव्हाना पूर्ण रात्र झाली होती,ते चालत चालत जंगलाच्या मध्यावर एका पडक्या मंदिराजवळ पोहचली.
या इतक्या दाट जंगलात हे मन्दिर कुठले असावे हा प्रश्न चौघांना पडला..!
पावसाने मंदिराच्या शिखरापर्यंत हिरवे शेवाळ दाटले होते,समोर दगडी नंदी सुद्धा पावसाने भिजून त्यावर सुद्धा शेवाळाची हिरवी झालर चढली होती..!

सखाराम म्हणाला…अरे ह्यो खन्डोजी कसा आणि कूट गेला ?
आता र काय करायचं ?
एक काम करुया आजची रात्र या मन्दिराचा आसरा घेऊया आन उद्या आपण आपलं हमरस्ता हुडकून आपल्या मार्गानं जाऊया…!
तिघांना हे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता…!

ते चौघे आत शिरले.
ते प्राचीन दगडी मन्दिर महादेवाचे होते.
कित्येक वर्षे हे दुर्लक्षित असावे असे वाटले,पावसाने पाणी आत थेंब थेंब झिरपत होते..!

नारायण बोलला, चला माझ्या महादेवाच्या गाभाऱ्यात तर आसरा मिळणार.. म्हणत ते मंदिरात घुसणार इतक्यात शेकडो वटवाघळे एकाच वेळी मंदिराच्या बाहेर पडली.
चौघांनी डोळे बंद करून डोळ्यासमोर हात ठेवत मागे पाय घेतले पण तितक्यात सर्व वटवाघळे उडून गेली….!
त्यामन्दिरात चौघे जाऊ लागले..पूर्ण अंधारात असलेल्या त्यामन्दिरात थोड्याच अंतरावर आत निरंजनाचा प्रकाश दिसला…!
चौघांनी डोळे विस्फारले…अंगावर काटे आले आणि भीतीने गागारुन गेले …अरे इतक्या पडक्या मंदिरात निरंजन लावायला कोण आले .असा प्रश्न पडून ते धावत मागे पळणार इतक्यात बाहेर धो धो पाऊस सुरु झाला होता….आता मंदिराच्या आत प्रवेश करुन काय प्रकार आहे हे पाहिल्याशिवाय पर्याय नव्हता….!
धीर धरुन ते आत आत सरकू लागले…धूप ,अत्तराचा सुगंध आणि निरंजनांच्या सोनेरी प्रकाशात महादेवाचे शिवलिंग झळाळत होते आणि उजव्या अंगाला एक जातीवन्त कुळवंत स्त्री फुलांची माळ करण्यात व्यस्त होती…..!
चौघांची भिवये वर झाली…पडके मन्दिर,वटवाघळे आणि आत इतकी सुंदर आरास करणारी हि बाई कोण ?
मल्हारी ची बोबडी वळण्याचा मार्गावर होती,त्याने सखाराम चा हात घट्ट पकडला…..!

क्षण दोन क्षण…त्या स्त्री चे लक्ष दरवाज्या कडे गेले आणि तिने खुंटी ला अडकवून ठेवलेली तलवार उपसून अंधारात लपलेल्या त्या चौघांच्यावर तलवार रोखत लढाईचा पवित्रा घेत बोलली….कोण आहे दरवाज्यात…सरळ पुढं या नाहीतर खांडोळी करीन…..!

क्रमशः बाजींद भाग ३ | बहिर्जी नाईक यांची कहाणी | बाजींद भाग ३

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

बाजींद कांदबरी भाग 2

बाजींद कांदबरी भाग 4

Leave a comment