महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

बाजींद भाग २ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

By Discover Maharashtra Views: 7154 7 Min Read

बाजींद भाग २ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग २ – मल्हारी,सर्जा आणि नारायण प्रश्नार्थक मुद्रेने सखाराम कडे पाहू लागली. सारा गाव ज्या गोष्टीमुळे गेली ५-६ वर्षे भीतीच्या दडपणाखाली आहे,त्या गोष्टीजवळ येऊन हा माणूस त्या गोष्टीला जवळून पाहूया कसा काय म्हणत असेल हा प्रश्न तिघांना पडला होता.

सखाराम ने तिघांच्याकडे पाहत उचश्वास टाकत बोलला..!

अरे आजवर घर-संसार पाहतच आलोय आपण,देवाच्या दयेने आसपास च्या बारा वाड्यात चांगलं नाव हाय आपलं.
ही असली मेलेली मढी किती दिस भ्या घालणार आपणाला.
हे बगा, खंडोबाचा भंडारा लावलाय आपण भाळाला, जरा धीर धरुन ती मढ बघुया,म्हणजे वर गडावर गेल्यावर बोलायला तोंड मिळलं आपणाला,राजा देवमाणूस हाय आपला,आपल संकष्ट नक्की त्यांच्या ध्यानी येईल…चला,खंडेरायाच नाव घ्या आणि या माझ्या मागं…!

सखाराम च्या असल्या बोलण्याने तिघांनीही धारिष्ट्य केले आणि मान हालवून टकमक दरीकडे पाय वळवले.

एव्हाना रिमझिम पाऊस थांबला होता,आणि कोवळे उन्ह अंगावर पडू लागले होते.
घोड्याला पण उन्हामुळे चांगली उब मिळत होती,तो पण मनोमन सुखावला होता.
रायगड ची उंची स्वर्गाला भिडली होती.
वर पडलेला पाण्याचा थेंब न थेंब सरळ खाली येत होता.
त्यामुळे वरुन धबधबणारे पाणी ओढ्यात मिळून छोटे छोटे नाले तुडुंब भरुन वाहत होते.
पायात कातडी पायतान पाण्याने आणि चिखलाने जास्तच जड झाल्याने चौघांनी ते काढून मधोमध कासरा बांधून घोड्याच्या पाठीवर बांधले आणि एका मोठ्या चिंचेच्या झाडाला घोडा बांधून,कुऱ्हाडी आणि घोंगडे अंगावर घेऊन ते ओढ्यातून वाट काढत टकमक दरीकडे निघाले.

चौघेजण ओढ्यातून पुढे पुढे जाऊ लागले,चांगले मध्यावर गेले आणि चिंचेला बांधलेला घोडा दोन्ही पाय वर करत जोरजोराने किंचाळू लागला..!
काय होतय चौघांना कळेना,आसपास पहिले तर गार वाऱ्याशिवाय चिटपाखरु पण नव्हतं..मग ह्येला काय झाले ओरडायला समजेना…!

त्याने हिसका मारुन लगाम,दावे तोडले आणि सुसाट वेगाने बाजूच्या जंगलात पळून गेला..!

घोड्याच्या या विलक्षण वागण्याने नारायण मात्र पुरता घाबरला,तो म्हणाला …”गड्यानो, मला काय लक्षण ठीक दिसणा…माझा घोडा आजवर असा कवाच वागला नाय…माझं ऐका,मागं फिरुया..चार दोन दिसान पाचाड ला सांगावं धाडून सगळी हकीकत महाराजांच्या खासगीत सांगूया…पण आत्ता बाहेर पडूया…!

सखाराम त्यावर रागात बोलला…”महाराजांची खासगी तुझ्यासारख्याच ऐकून घ्यायलाच बसली हाय जणू…सारा महाराष्ट्र सांभाळायचा हाय त्यास्नी…तुझ्या घोड्यान साप-पान बघितलं असलं म्हणून तो गेला पळून… दरीकड जाऊन लौकर मागं येऊन त्याला शोधूया…चला पाय उचला लौकर…!

सारे जण त्या भयाण ओढ्यातून पुन्हा चालू लागली.
चांगलं छातीपर्यंत पाणी आलं आणि पाण्याचा जोर जाणवू लागला.
चौघांनी एकमेमेकांना हात देऊन कड केलं..!
ओढ्याच्या बरोब्बर मध्यावर आलं तस वाघांच्या एका गगनभेदी किंचाळीने पावसाने गारठून अंग चोरून बसलेली चिमणी पाखर आभाळात उडू लागली आणि चौघांच्या अंगावर भीतीने शहारे आले….ओढ्याच्या पाण्याच्या वेगाने ते एकसारखे वाहू लागले आणि चौघांची हाताची कडी तुटली आणि ते उत्तरेकडे वाहू लागली…!
जो तो आता जीव वाचवायचा प्रयत्न करु लागला..!

मल्हारी पूर्वी महाड ला सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या तालमीत 3-4 वर्षे राहून आलेला गडी होत.
सिंहगड लढाईत सुभेदार गेलं आणि तालमीतल्या पैल्वाणांच्या वर उपासमारी आली..म्हणून चौघांनी पण कुस्तीला रामराम ठोकून गाव गाठला होता.
पण त्या कुस्ती मुळे पुरात पोहायचे कसे त्यांला चांगलेच ठाऊक होते,त्याने सर्वाना ओरडून सांगितले की काठावर असलेल्या वडाकडे बघत पोहा….!

पुरात जर फसला तर हात पाय हलवून काय उपयोग नसतो..अश्यावेळी एक करायचं की काठावर असलेलं कोणतही मोठं झाड त्याकडे लक्ष देत तिरकस पोहत पोहत जायचं…पाण्यात साप,विंचू,काटे काहीही येवो लक्ष द्यायचे नसते…चौघेही पुराची धार तोडून एका महाकाय वडाच्या झाडाजवळ पोहोचले…!

चिंब भिजलेल्या चौघांच्या कुऱ्हाडी पाण्यात वाहून गेल्या होत्या.
घश्यात पाणी गेले होते त्यामुळे चौघेही ठसके देत देत काठावर दम खात पहुडले होते…!

साधारण दम कमी कमी झाला आणि सखाराम क्षणात सावध झाला आणि मल्हारी,नारायण,सर्जा कुठे आहेत पाहू लागला..!
हाकेच्या अंतरावर तिघेही दम खात पहुडले होते.
सावकाश पावले टाकत तो तिघांच्या जवळ जाऊन तिघांना सावध केलं..!

नारायण,दम खात बोलला…तुम्हाला म्या सांगत हुतो,आरं जनावरं ते बघू शकट्यात जे तुम्हाला आमाला दिसत नसतया… खण्डेरायचा आशीर्वाद म्हणून वाचलो,पण आता हिकडं वाघाची डरकाळी ऐकली नव्ह…आता काय करायचं…?

सखाराम ने धीर देत त्याला सांगितले,अरे नको काळजी करु.. या सगळ्या भाकडकथा आहेत.
तस जर नसत तर ३५० वर्षे महाराष्ट्र गुलामगिरीत राहिलाच नसता…देव देवरस पण काय कमी होत काय आपल्याकडं….पण शिवाजीराजानं तलवारीच्या जोरावर संपवलीच ना गुलामगिरी…पण विचारांची गुलामगिरी कवा संपणार आपली देव जाणे…चला धीर धरा…वाड्या जवळची हजारो घरटी आपल्या चौघांच्या नजरेला नजर लावून बसली असतील…या असल्या फालतू गोष्टीत भिऊन बसला तर शेण घालतील लोकं आपल्या तोंडात..उठा बिगीन आणि चला…!

सखाराम च्या निर्वाणीचा बोलणे तिघांनाही ऊर्जा मिळाली,चौघेजण पुढे चालू लागले…!

तो महाकाय वडाचा बुंधा पाहून कोणीही भयकंपित होईल.
त्याच्या त्या विशाल पारंब्या पाहून जणू ब्रम्हराक्षस वाटेत ठाण मांडून बसला असावा असा भास होत होता.

चौघे जण वर टकमक टोकाकडे पाहत दरी कुठे असेल अंदाज बांधत त्या वडाला बगल देऊन चालू लागले..!

ओढ्याच्या काठापासून जंगली भाग फारसा दूर नव्हता,म्हणायला म्हणून ते पठार होते,पण सारी जंगली झाडे फार.
एव्हाना सूर्य माथ्यावर आला होता,पण पावसाळी ढगाने इतकी गर्दी केली होती की संध्याकाळ झाल्याचा भास होत होता..!

तिघेही जंगलात घुसणार इतक्यात वाघांची ती प्रचंड डरकाळी समोरच्या झाडा झुडपातून येऊ लागली..!
चौघांची सर्वांगें थरारली.
जंगलातील झुडपे हालवत ती श्वापदे बाहेर पडत होती.
किती होती काय माहित,नक्कीच एक पेक्षा जास्त होती हे नक्की.
आता मात्र सखाराम च्या धीराच्या गोष्टी ऐकण्यात नारायण,सर्जा,मल्हारी तिघांनाही रस नव्हता…आणि त्या गोष्टी सांगायला सखाराम कडेही वेळ नव्हता…आल्या पावली ते वडाच्या झाडाकडे धावू लागली…!

डरकाळी चा आवाज मोठा होत गेला आणि सखाराम चा पाय फांदीत अडकून सखाराम पडला…नारायण ने ते पहिले आणि सर्जा व मल्हारी ला थांबवत त्याला उचलायला गेली तितक्यात ते पावसाने भिजलेले वाघाचे प्रचंड धूड जंगलाबाहेर पडले…त्यापाठोपाठ अजून एक..अजून एक…चौघांची डोळे विस्फारली गेली आणि हात पाय गाळून चौघे बसल्या जागी भीतीने गारठून ओरडू लागली…

किमान ५-६ धिप्पाड वाघ छलांग मारत मारत चौघांचा वेध घेत येत होती…चौघांनी जगण्याचा धीर सोडला आणि डोळे मिटून त्यांचा इष्ट देव खंडेरायचा धावा सुरु केला…..वाघ चवताळत आले…बस्स आता एकच झेप आणि खेळ संपला…तितक्यात…….

सुं.. सुं… सुं…. करत एकापाठोपाठ एक बाण वडाच्या झाडापाठीमागून कोणीतरी सोडले….वाघांचा तो वादळी आवेग आणि वाऱ्यासारखा वेग क्षणात कमी झाला…ते बाण बरोबर सखाराम आणि त्या तिघांच्या पुढे काही अंतरावर जमिनीत घुसले…ज्याने ते बाण सोडले त्याकडे भयभीत नजरेने ते 5-6 वाघांचे प्रचंड धूड पाहत..आल्या पावली वाऱ्याच्या वेगाने पुन्हा जंगलात पळून गेली…!

चौघांनी डोळे उघडून ते पळून जाणारे वाघ पाहिले आणि आश्चर्यकारक नजरेने उभे राहिले व समोर घुसलेल्या बाणाकडे पाहत एकदम मागे फिरले…!

क्रमशः बाजींद भाग २

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी भाग १

बाजींद कांदबरी भाग 3

Leave a comment