महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

बाजींद भाग ४ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

By Discover Maharashtra Views: 6031 6 Min Read

बाजींद भाग ४ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग ४ – आभाळातून वीज चमकावी तशी त्या स्त्री च्या एकाकी आव्हानाने सखाराम व त्याचे मित्र पुरते गांगारुन गेले. धीर धरुन सखाराम एक पाऊल पुढे आला व बोलू लागला….

“आमी धनगरवाडी चे गावकारभारी हा ओत, रायगडावर निघालोय, पावसाचा जोर वाढला म्हणून निवारऱ्याला हिकडं आलो…”

“खोटं नगा बोलू.. नायतर एकेकांची खांडोळी करीन… इकडं कोणीही फिरकू शकत नाही, बिकट चोरवाट फक्त हेरांना ठाऊक आहे याची…” ती स्त्री बोलली…!

नारायण बोलला… “महादेवाची आण घेऊन सांगतो, आम्ही स्वताहून हिकडं नाय आलो…त्यो खंडोजी म्हणून एकजण भेटला, महाराजांचा हेर आहे म्हणून सांगत होता…”

काय ..?
खंडोजी …कुठं भेटला तो तुम्हाला ?
स्त्री उदगारली….!

मग, घडलेली सारी हकीकत व ज्या कारणाने ते चौघे रायगड वर निघालेत ते त्यांनी त्या स्त्रीला सांगितले.

चौघांची कथा ऐकून त्या स्त्री ने तलवार खाली केली आणि चौघांना आत या म्हणून खुणावले…!

चौघेही आत आली…जवळच एका मडक्यात पाणी होते, ते घेऊन त्या स्त्री ने चौघांना दिले..!

सारे जण पाणी पिऊ लागले, आणि मल्हारी ने जड शब्दात त्या स्त्री ला प्रश्न केला….
ताई, एवढया भयंकार जंगलात, या पडक्या देवळात, या असल्या जीवघेण्या पावसात तुम्ही एकल्या कशा ?
कोण हाय तुम्ही?

किंचित स्मितहास्य करत ती बोलू लागली…..
मला साऊ म्हणतात…..महाड चे सरदार शिर्के यांची मी मुलगी…!
आमचे वडील आदिलशाही चे सरदार.
शिवाजीराजांनी रायगड जिंकला आणि आसपास चे सारे आदिलशाहीचे सरदार त्यांना मिळाले, फक्त आमचे वडील सोडून…पण…शेवटी त्यांनी पण महाराजांना साथ द्यायचे ठरवले…हम्म.. खूप मोठी कथा आहे दादा…वेळ आली की सांगीन…!

पण, खंडोजी तुम्हाला कुठं भेटला…?
आणि, तो कसा आला नाही इकडे…त्यालाच तर शोधायला मी इथवर आली आहे…!

काय ?
त्याला शोधायला…सर्जा बोलला..!
अहो, तो आम्हाला चोरवाट दाखवतो म्हणून हिकडं घेऊन आला आणि स्वता गायब झाला…कुठं आणि कसा गेला काय माहिती…आमाला फकस्त या रात्री हित आसरा द्या…सकाळी येरवाळी आमी आल्या पावली निघून जाऊ…”

का ?
साऊ बोलली…अहो, आजवर कोणालाच आम्हाला मदत करता आली नाय, खंडोजी आणि आम्ही सारे या जंगलात खूप दिवसापासून दबा धरून आहोत… तुमची मदत करायला आम्हाला आवडेल… इथून फक्त 10 कोसावर माझ्या वडिलांची फौज आहे,तिथं आपण जाऊया…माझे आबा तुम्हाला मदत करतील…त्यांचा आणि महाराजांचा संबंध खुप जवळचा आहे….मी नेईन सकाळी गुप्त वाटेने तिकडे…तोवर तुम्ही विश्रांती घ्या….मी जरा बाहेर जाऊन येते…!

सखाराम व त्याचे मित्र खूप आनंदले….चला खंडेरायाची कृपा…आता तर सरळ शिर्के सरदार आपल्याला मदत करणार म्हणल्यावर काम झालं….गाव आणी बारा वाड्याच दुःख कायमच संपलं… चला घ्या दर्शन देवाचं आणि झोपा….”

सर्जा, नारायण आणि मल्हारी त्वरित झोपी गेले.
दिवसभर खूप हाल झाले होते त्यांचे…पण मल्हारी …?

त्याला बिलकुल झोप येईना…उलट त्याची विचारचक्रे सुरु झाली होती….!

कोण ह्यो खंडोजी…हे जंगल या आधी आम्हाला का नजरेस पडले नाही, हे मन्दिर जर एवढे पुरातन आहे, तर मग शिवाजी महाराजांसारखा शिवभक्त राजा आजवर इथं येऊन या मंदिराची डागडुजी का केली नाही?

तारुण्याने मुसमुसलेली ही सौंदर्यवाण साऊ इतक्या भीषण काळरात्री एकटी इथं काय करते आहे ?
आणि शिरक्यांची फौज १० कोसावर ?
१० कोसावर तर नुसतं जंगलच आहे….फौज कशी आणि कुठे असेल….!

हे विचार चक्रे चालू असतानाच मंदिरा बाहेर एक जीवघेणी वाघाची डरकाळी सखाराम च्या कानावर पडली आणि दचकून तो उठला…आसपास पहिले पण ते तिघे तर घोरत होते…हिम्मत करुन त्याने त्या खुंटीवर असलेली तलवार घेतली आणि समोर असलेल्या महादेवाच्या पिंडाला नमस्कार करत मनात प्रार्थना केली….”माझ्या देवा…गावासाठी आम्ही जीवावरचा खेळ खेळतोय, तू काय पदरात टाकशील ते खर, फकस्त आमच्या हातून काय चूक होऊ देऊ नगो, तुझा आशीर्वाद नेहमी पाठीशी असावा”

सखाराम तडक मागे फिरला आणि त्या निमुळत्या मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर निघाला….बाहेरनिळसर चांदणे पडले होते, पाऊस बिलकुल नव्हता, झाडांच्या पानावरुन निथळणारे पाणी चेहऱ्यावर झेलत तो बाहेर आला, व वाघाच्या आवाजाचा कानोसा घेत, तो पुढे गेला व पाहतो तर काय ?
वाघाचे ते भयानक धूड रक्ताच्या थारोळ्यात निपचिप मरुन पडले होते……तो त्या वाघाकडे निरखून पाहू लागला, त्याच्या हृदयाची कम्पने वाढली, जो हळू हळू मागे जाणार इतक्यात…पाठीमागून त्याच्या पाठीवर कोणीतरी कोणीतरी हात ठेवला….”

जिवाच्या आकांताने तो ओरडला आणि मागे वळून पाहतो, तर ती साऊ होती…!

दीर्घ श्वास घेत त्याने तिच्याकडे नजर टाकली आणि म्हणाला…खर सांगा बाईसाहेब तुम्ही कोण आहे ?
ह्या वाघाला कुणी मारलं ?
आम्ही गावासाठी हिकडं आलोय…तुम्ही कस काय ऐकलंच हित हाय ?

अस बोलताना भीतीने सखाराम चा घसा कोरडा पडला व अश्रू येऊ लागले…”

स्मितहास्य करत साऊ बोलली….घाबरु नका भाऊ….मी इथं कशी हे ऐकायचं आहे ना तुम्हाला…?

तर मग ऐका……..!

मी “सावित्री येसाजीराव शिर्के”
आदिलशाहीचे नेकजात सरदार राजे येसाजीराव शिरक्याची एकुलती एक मुलगी…….लहानपनापासून हौस मौज करत वाढलेल्या माझ्या आयुष्याला कधी न संपणारे दुःख ज्या हरामखोराने दिले त्याच्यामुळेच मी आज इथे आहे……!

माझ्या साऱ्या जीवनाची कथा मी तुम्हाला सांगते….ऐका आणि मग विश्वास ठेवा न ठेवा तुमची मर्जी……!

“यशवंतमाची”हे माझे जन्म गाव…!

क्रमशः बाजींद भाग ४ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

बाजींद कांदबरी भाग 3

बाजींद कांदबरी भाग 5

Leave a comment