महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 83,96,524

बाजींद भाग २८ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

By Discover Maharashtra Views: 5709 8 Min Read

बाजींद भाग २८ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग २८ – सखाराम आणि त्याचे सवंगडी स्तब्ध उभे होते.
गेले दोन चार दिस या खंडोजी आणि सावित्रीच्या तोंडून जे काही ऐकत आलोय त्याचे उद्यापन म्हणजे बहिर्जी नाईक होते कि असे वाटू लागले होते.
डोके सुन्न झाले होते चौघांची…!
ज्या माणसानं हिंदवी स्वराज्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर पेलली पण कुठेही नाव प्रसिद्ध केले नाही.
काय विलक्षण माणूस असेल हा बहिर्जी…!

खंडोजी बोलू लागला..
लय अजब रसायन आहे बहिर्जी नाईक म्हणजे..!
१०-१० दिस अन्नपाणी शिवाय राहतो, तर महिना महिना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो…!
धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो,पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो..!

तलवार, भाला, फरीगगदा, पट्टा, विटटा, धनुष्य, असे काही चालवतो की समोर महासागर येऊदे शत्रूचा…!
शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो, तर खुद्द औरंगाजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकून बक्षीस घेऊन येऊ शकतो…!

माणूस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही, जनावर म्हणाल तर दिसतो माणसासारखा..!
मोठमोठ्या गोष्टीत अचूक निर्णय, सावध नियोजन आणि स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड…!
खर सांगतो गड्यानो…हा बहिर्जी नाईक जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता..!

आणि शिवराय त्याला इतके मानतात की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ माँसाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जी नाईक…!
गड्यानो,महाराजांचा नाईकांच्यावर इतका विश्वास की हा माणूस चुकून सुद्धा चूक करु शकणार नाही इतका दृढ विश्वास…!

पाची पातशाहिना रणांगणात चारी मुंडी चित करुन जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते इतकी गुप्तता पाळत होते नाईक….!

महाराजांचा अभिषेक सुरु होता, महाराज मुक्त हस्ताने गरीब फकिराना ओंजळ भरभरून द्रव्य दान करत होते आणि एक म्हातारा फकीर त्या रांगेत उभा होता…!
जक्ख म्हातारा हुंदके देऊन रडत होता आणि डोळे भरून महाराजांना पाहत होता…..महाराजांनी जेव्हा त्या फकिरला पाहिले तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला…!
ओठावर मिशा नव्हत्या तेव्हा पासून या बहिर्जी आणि मी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले….आणि आज मराठेशाही स्थापन होत आहे, राज्य आनंदात आहे, आणि ज्याने आजवर सारी संकटे आपल्या छातीवर झेलली तो बहिर्जी फकीर होऊन याचकांच्या रांगेत उभा आहे…!
काय बोलावे या प्रकाराला….कसली वेडी माणस असतील ती…!
एका मंदिराला फरशी दान दिली की साऱ्या घराण्याची नावे टाकणारे तुम्ही आम्ही त्या बहिर्जी नाईकांच्या काळजाला कधी समजू शकू का ?
स्वतःच्या बायकोला सुद्धा अगदी शेवटपर्यंत माहिती नव्हते की ज्याच्या सोबत मी सात जन्माचे बंधन बांधले आहे….तो खुद्द स्वराज्याच्या गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक आहे….इतकी कमालीची गुप्तता…!
आणि एवढा विलक्षण त्याग करुन राजे त्यांना देत तर काय होते ओ …?
काहीच नाही….उलट प्रत्येक मोहिमेत जीवाचा प्रश्न…माघारी येईल का नाही शाश्वती नव्हती…!
हि वेडी खुळी माणसे अशी का जगली असतील ??
बस्स…एवढ्या एका प्रश्नाचे उत्तर ज्याला समजून येईल त्याच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नव्हते….!

पण, ज्याच्या खांद्याला खांदा लाऊन हे सारे ज्याने भोगले होते त्या खंडोजीला मात्र समजून पण उमजत नव्हते….!

यशवंतमाची अजूनही मराठ्यांशी वैर घेऊन दिमाखात मिरवत होती आणि त्याच माचीच्या राजकुमारी बरोबर विवाहाच्या बोहल्यावर खंडोजी चढत होता…!

सारी यशवंतमाची आनंदात होती.
सर्वजण लग्न मंडपात जमा झाले होते.
राजकुमारी सावीत्री मनस्वी आनंदी होती.
खंडोजी चे स्वप्न पूर्ण होत होते…!
अंतरपाट धरुन पंडितजी मन्त्र म्हणू लागले.
देवा ब्राम्हणांच्या साक्षीने खंडोजी व सावीत्री कायमचे एक होणार होते…..!
सारा आनंदी आनंद होता….!

पण, इकडे बाजींद ने समोर उभ्या असलेल्या बहिर्जी नाईकांना पाहून मात्र स्वतःचे भान हरपले होते..!
ज्याच्या केवळ गोष्टी ऐकून रक्त उसळत असायचे, असा महान गुप्तहेर चक्क माझ्या समोर उभा आहे, ही कल्पनाच त्याला आनंदित करत होती..!

बाजींद व त्याची सेना तलवार दोन्ही हातात आडवी धरुन गुडघ्यावर बसली व मान खाली घेत बहिर्जी नाईकांना शरण गेली…!

नाईक पाय उतार झाले…तोंडाला बांधलेले काळे अवलान त्यांनी सोडले व धीरगंभीर पाऊले टाकत बाजींद जवळ आले व दोन्ही खान्दे धरुन उठवत म्हणाले…..!

बाजींद…..तुमच्या शौर्याच्या कथा मी जाणून आहे.
कोनापुढे तुम्ही झुकने हे तुम्हास शोभा देत नाही…उठा.!

बाजींद उत्तरला….नाईक…तुम्ही कोण आणी काय आहात हे केवळ आम्ही जाणू शकतो इतर कोणीही नाही.
केवळ आपली भेट घडावी या साठी आपल्या खंडोजी ला आम्ही चंद्रगड ला बोलवून घेतले व आमच्या पूर्वजांची व प्राण्यांचे अद्भुत आवाज ओळखण्याचे विज्ञान लिहलेली वही तुमच्या कार्यासाठी दिली….”

बहिर्जी हसले…ते मोठ्या विलक्षण पोट तिडकीने बोलू लागले……

गूढ ज्ञान….आणि स्वराज्य…!
माफ करा बाजींद……शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याला आजवर ना कोणत्या गूढ ज्ञानाची गरज भासली होती ना इथून पुढे भासेल….अहो ३५० महाराष्ट्र गुलामगिरीत धडपड करत होता.
जुलमी अगंतुकानी महाराष्ट्राची मसनवाट करुन टाकली असताना आमच्या शिवाजी राजांनी साधारण माणसाना घेऊन असामान्य इतिहास निर्माण केला.
गुलामगिरी मातीत घालून स्वाभिमानाचे, भगव्या झेंड्याचे राज्य आणले ते केवळ मृतवत अंतकरणात स्वाभिमान जागृत करुन….लाथ घालाल तिथे पाणी काढाल ही भावना आमच्यात जागवून आमची मने मोठमोठी महायुद्धे जिंकायला तयार केली ती केवळ महाराजांनी….आणि अशी कणखर मने साक्षात कळीकाळाच्या सुद्धा हाका ऐकू शकतात तिथे ही जनावरांची भाषा जाणणे हे तर फार किरकोळ गोष्ट आहे गड्यानो….तुम्हाला जर शिकायचेच असतील ते देव, देश आणि धर्मासाठी हसत हसत मारु आणि मरु शकणारे शिवाजी शिकायला हवेत…!

बहिर्जी बेभान होऊन बोलत होते आणि बाजींद सर्वांगाचे कान करुन ते सर्व ऐकत होता.
आत्ता पर्यंत “बाजींद” हेच जगातील सर्वात श्रेष्ठ ज्ञान समजत असलेल्या बाजींद ला बहिर्जी नाईकांच्या तोंडून ब्रम्हज्ञान ऐकायला मिळत होते..!

पण, चंद्रगड ची गुप्तता आसेतु हिमाचल अबाधित राखणे हे बाजींद चे कर्तव्य होते.
नाईकांच्या हाकेला कधीही धावून येऊ असे आश्वासन देऊन बाजींद ने बहिर्जी नाईकांची रजा घेतली व टाकटोक तिथून चंद्रगड च्या रस्त्याला निघाले….!

नाईक मागे फिरले….आता त्यांची चवताळलेली नजर वळाली ते यशवंतमाचीकडे…..!

दरम्यान राजे येसजीरावांच्या व सावित्रीने केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी भीमा जाधव व त्याचे सहकारी यशवंतमाची च्या जंगलात फिरताना मराठ्यांच्या हाती लागले…!
वस्ताद काकांनी ते कोण कुठले याची खडा न खडा माहिती काढली..एका शत्रूचा शत्रू जर आपल्याला मिळाला तर तो मित्र होतो….!
काकानी जर भीमाने आम्हाला यशवंतमाची कडे जाणारी गुप्तवाटेने नेले तर यशवंतमाची ची जहागिरी त्याला देऊ असे कबूल केले..!
सुडाच्या संतापात चवताळलेल्या भीमाने हा कौल त्वरित स्वीकारला….!

आणि भीमाने यशवंतमाची कडे जाणारी गुप्तवाट मराठ्यांच्या फौजेला दाखवून दिली….!

इकडे यशवंतमाची त साऊ आणि खंडोजी चे विधिवत लग्न पार पडले होते…!

एका उंच डोंगराच्या पायथ्याला खंडोजी व ते चौघे थांबले…!
दम खात खंडोजी बोलला….
बरं मंडळी…रामराम घ्या आमचा…!
वर डोंगरावर एक मंदिर हाय…तिथं जो कोणी आसल त्याला “उंबराच फुल” ह्यो सांकेतिक परवलीचा शबुद सांगा…त्यो तुम्हास्नी म्होरं वस्ताद काकाकडं घेऊन जाईल…त्यांना सांगा तुमची अडचण, ते महाराजांच्या कानी त्वरित घालतील तुमची व्यथा…पर एका गोष्टीच भान पाळा…. चुकून बी मी तुम्हाला हितवर आणलय सांगू नगासा…!
जातो म्या,
परत भेट होईल असं वाटत नाय…लय कामं पडली हायती स्वराज्याची…माझी आण तुमची साथ आता हितवर च…!

सखाराम आश्चर्याने बोलला….अहो खंडोजीराव..आस का बोलताय ?
खंडोबाच्या आशीर्वादान जणू तुम्हास्नी आम्हा गरिबांच्या मदतीला धाडलय….तुमची कथा ऐकून रगात उसळतया गड्या….लय लय भोगलया तुम्ही खंडोजीराव…….पुढं काय झालं हे तर सांगा आण मग जावा….”

खंडोजी हासत बोलला….नाही सखाराम….सुर्य मावळला की मला जावे लागते रे…..आणि आजची ही माझी शेवटची रात्र…तुम्ही बिगीन वर जावा….तुमचा गाव कायमचा सुखी व्हणार….

डोळ्यात आलेले अश्रू पुसत खंडोजी तरातरा चालत जंगलात जाऊ लागला….त्याच्या त्या अधीर शब्दात एक प्रकारची उदासीनता जाणवली….सखाराम ला का कोणास ठाऊक असे वाटू लागले की जणू माझ्या कोणीतरी जवळचे मला सोडून जात आहे….!

क्रमशः बाजींद भाग २८ | बहिर्जी नाईक यांची कहाणी | बाजींद भाग २८

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

Leave a comment