महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,77,740

बाजींद भाग २६ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

By Discover Maharashtra Views: 5974 12 Min Read

बाजींद भाग २६ | | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग २६ – एव्हाना दिवस उजाडला होता.
सकाळची कोवळी सूर्यकिरणे घनदाट धुक्याला जाळत वातावरणात उब निर्माण करत होती.

सुर्याची कोवळी सुर्यकिरणे सखाराम च्या मुखावर पडली आणि त्याला जाग आली.
सुर्यनारायणाच्या झिलमीत किरणात समोरच खंडोजी बसला होता.
जणु सुर्य त्राटक लावले आहे..त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रु येत होते.

सखाराम दचकून जागा झाला व त्याच्या साथीदारांना जागे केले.

आसपास केवळ माळरान होते,ते जिथे झोपले होते तिथे केवळ सपाट खडक होता..!

सखाराम व त्याच्या साथीदारांना काहीच समजत नव्हते…रात्री सावीत्री समोर व शिरक्यांच्या छावणीत बसून खंडोजी व सवित्रीचा भुतकाळ ऐकत कधी डोळा लागला समजला नाही, आणि जाग आली या पठारावर..आणि समोर खंडोजी ला पाहुन तर त्याहून अधिक धक्का बसला…!

मोठ्या आवाजात सखाराम, सूर्याकडे पाहत बसलेल्या खंडोजीला बोलला…..

तुम्ही कधी उगवला खंडोजीराव ??

सखाराम च्या बोलण्याने भानावर आलेल्या खंडोजीने सावध होत आपले अश्रूंनी डबडबले डोळे पुसले व चौघांकडे पाहुन बोलू लागला…

“मी ?
हे काय तुम्ही उठायच्या अगोदर इथे येऊन बसलो होतो…”

आणि रात्री अचानक कुठे गायब होता तुम्ही ?
रात्री आम्ही राजे शिरक्यांच्या छावणीत होतो आणि आत्ता इथे कसे काय आलो..? सखाराम बोलला…!

अहो, रात्री हेरगिरी करावे लागते…मी शिवरायांचा निष्ठावान गुप्तहेर आहे…असतात न सांगण्यासारख्या कामगीरी…!
तुम्ही गाढ झोपेत होता आणि शिरक्याची छावणी इथून दूर गेली…मला भेटले ते सारे…फक्त तुमची झोपमोड करणे त्यांना ठीक वाटले नाही…!
सावीत्री व मी उद्या भेटणार आहे..त्या अगोदर तुम्हाला वस्ताद काकांच्याकडे घेऊन जातो…म्हणजे तुमचे काम मार्गी लागेल..व मी सवित्रीसह आमच्या मार्गाने जाऊ…”

खंडोजीच्या स्पष्टीकरनाणे मात्र सखाराम ची शन्का दूर झाली.
आसपास च्या परिसरात सुद्धा रात्रीच्या छावणीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या त्यामुळे शंका दूर झाली….”

समोरच एका गाठोड्यात खाण्याचे पदार्थ पाहून सखाराम बोलला…

हे जेवण तुम्ही आणलं काय खंडोजीराव ?

नाही…हे सावित्रीने तुमच्यासाठी ठेवले आहे…दोन घास खाऊन घ्या…आपण पुढचा प्रवास करु..!

जेवनाकडे पाहताच चौघांचेही चेहरे खुलले..ते चौघेही भाकरीचा तुकडा मोडून खाऊ लागले….”

पोटात थोडी भर गेल्याने सखाराम व त्याचे सोबती तरतरीत झाले.

मल्हारी, सर्जा, नारायण व सखाराम चौघेही आनंदी होते.

खंडोजी बोलला…गड्यानो आज फक्त एक दिवस..आज मी तुम्हाला वस्ताद काकांच्या सुपूर्द करतो, तुम्ही उद्याच राजश्री शिवाजीराजांच्या खासगी विभागात पोचते व्हाल..तुमची समस्यां कायमची मिटली जाईल……फक्त रात्र होण्याच्या आधी आपल्याला त्या गुप्तवाटेने जंगलात केवळ मला व काकांना माहिती असलेल्या गुहेत पोहचायचे आहे….

खंडोजीच्या बोलण्याने चौघे अजून आनंदी झाली…!

ते पाचही जण चालू लागले….!

धाडस करुन सखाराम बोलला….

खंडोजीराव..रात्री सावीत्री बाईसाहेब बोलत होत्या तुम्ही शिवाजीराजांशी गद्दारी केली असे बहिर्जी नाईकांचे मत झाले होते….ती कथा ऐकता ऐकता झोप आली…तुम्हाला राग येणार नसेल तर ती कथा पुढे संगशीला का ??

एक दीर्घ श्वास घेऊन मल्हारी बोलला….

राग ..?
कसला राग गड्यानो…आता खन्डोजी च्या आयुष्यात मानवी रुसवे फुगवे उरलाच नाहीत…आता जगतोय ते केवळ उपकारासाठी…

असे बोलून खंडोजी त्याचा भविष्यकाळ पुन्हा कथन करु लागला….!

यशवंतमाची

राजे येसजीराव शिरक्यांच्या तालमीत रात्रभर विचारात मग्न असलेल्या खंडोजीला काहीच सुचत नव्हते….भीमाला लढायला आपण उद्युक्त करुन चूक केली असे त्याला वाटत होते…!
एकतर स्वराज्याशी हरामखोरी आणि सवित्रीचा विरह दोन्ही गोष्टी त्याला सतावत होत्या….!
डोळ्यात पश्चात्तापाचे अश्रू ओघळत होते..!

सूर्यराव बेरड आपल्या नेकजात इमानदार कडव्या फौजेला घेऊन यशवंतमाची शेजारच्या डोंगरदरीत लपला होता.
त्यांच्यावर कोणी हल्ला चढवला याचे रहस्य मात्र त्याला उलगडत नव्हते.

इकडे बाजीन्द व त्याच्या फौजेला सूर्यराव ला शोधून मारल्याशिवाय चैन पडणार नव्हता…एकदा जर का “बाजींद” चे गूढ दुसऱ्या व्यक्तीला समजले तर मात्र १०० वर्षाच्या तपस्येची राखरांगोळी होणार हे मात्र नक्की होती.!

दुसरीकडे वस्ताद काका मात्र यशवंतमाची उद्याच्या उद्या स्वराज्यात आणण्यासाठी मावळ्यांच्या प्रमुख शिलेदारांची बैठक घेत होते….ते मोठ्या आवेशाने बोलू लागले….

गड्यानो, उद्या जर यशवंतमाचीवर भगवा नाही फडकला तर सारी मराठेशाही शेण घालेल तोंडात आपल्या….यशवंतमाचीवर हल्ला चढवायला आपली फौज अपुरी आहे,पण ज्यादा कुमक यायला खूप वेळ जाईल…त्यापेक्षा एक युद्धनीती वापरायची आहे…..

शत्रूचा शत्रू तो आपला मित्र…हाकेच्या अंतरावर सूर्यराव बेराडाँची फौज आहे.
त्यांचा पण यशवंतमाची बरोबर जुना बदला आहे,याचा फायदा उठवत त्यांना सोबत घेऊया…यशवंतमाचीच्या हद्दीत असल्याने जंगलवाटा त्यांना चांगल्याच ठाऊक आहेत…!

गड्यानो, तयारीला लागा….!

वस्ताद काकांचा आदेश मिळताच हजार एक मावळ्यांचे पथक क्षणात तयार झाले.
केवळ पायी हल्ला चढवायचा असल्याने पायीच यशवंतमाचीकडे कूच करावी लागणार होती.

वस्ताद काकांनी फौजेचे दोन भाग केले.
यशवंतमाचीच्या पाठीमागून अर्धी सेना जाऊन रात्रीच्या अंधारात दबा धरुन बसेल, इशारतीची खून मिळताच वाऱ्याच्या वेगाने यशवंतमाचीवर मागून हल्ला चढवायचा..उर्वरित सेना घेऊन सूर्यराव बेरडला गाठून मदतीची विनंती करुन समोरुन हल्ला करायचा..!

बस्स, अशी चोख योजना आखून पुढच्याच क्षणात सारी सेना वाटेला लागली..!
प्रत्येक मावळा शिस्तबद्ध होता.
शिस्त हा शिवरायांच्या फौजेचा आत्मा होता..!

दरम्यान, बाजींद च्या सेनेने प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही सूर्यराव सापडत नसल्याने, अर्ध्या धारकर्यांना चंद्रगड कडे जाण्याची आज्ञा केली व पाच पन्नास धारकरी सोबत ठेऊन त्याने सूर्यराव ला शोधून काढण्यासाठी आपल्याजवळ असलेल्या बाजींद च्या गूढ विद्येचा वापर करुन माकडे, घारी-गिधाडे, किड्या मुंग्यांना सांकेतिक आवाज काढून बोलावण्याचा निर्णय घेतला….

बाजींद ने एकाग्र ध्यान करुन आत्मसात केलेल्या गूढ ज्ञानाने सांकेतिक आवाज आसपासच्या वातावरणात सोडले……….
कीटक, मुंगी, घार, गिधाड यांच्या पर्यंत त्यांच्या भाषेत बोलून त्यांना आपले कार्य करायला लावणारे गूढ ज्ञान…खरोखर विलक्षण होते सर्वकाही…!

बघता बघता जंगलातील अणुरेणु शहारले आणि मुंग्यांनी,घार गिधाडांची गर्दी बाजींद च्या भोवताली जमली…..

एक विलक्षण हास्य त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते…जणू सृष्टीचा एक अशक्य भाग त्याचे स्वामित्व त्याच्याकडे असावे असे एकप्रकारचे हास्य होते ते….

त्याने त्या गूढ व विचित्र आवाजात सभोवतालच्या प्राण्यांना संदेश देणे सुरु केले….

सूर्यराव बेरड कुठे लपला आहे…त्याच्याकडे किती लोक आहेत…त्याच्याकडे लौकर जाण्याचा मार्ग काय…त्यांना जिथे आहे तिथे थोपवण्यासाठी मुंग्यांनी हल्ला चढवाव.. आणि या बदल्यात सर्व प्राण्यांना ताज्या मांसाची मेजवानी मिळेल असेही त्याने सांगून टाकले…..”

त्याच्या त्या आदेशाने सर्व प्राणी त्वरित कामाला लागले व मजल दरमजल करत त्या गुप्त जागेत जिथे सूर्यराव यशवंतमाचीवर हल्ले करायची नियोजने करत होता तिथे पोचते झाले…

त्यागोदरच वस्ताद काकांच्या हेरांनी बातमी आणली की सूर्यराव बेरड कुठे लपला आहे…टाकटोक वस्ताद काका व धारकरी हाती पांढरे निशाण घेऊन सूर्यराव च्या गुप्त जागेत शिंग तुताऱ्या फुंकून सूर्यराव ला खून सांगू लागले…

शिवरायांची फौज …?

नुकत्याच बाजींद च्या आकस्मित हल्ल्यातून वाचत गुप्त जागेत पुढे नियोजन करत बसलेल्या सूर्यराव ला शिवरायांच्या खूनेची चाहूल लागली व त्याने त्वरित निशाणबारदार पाठवून कोण,कुठून,कशासाठी आले आहे बातमी काढली…..,

बहिर्जी नाईकांची खास फौज वस्ताद काकांसह चर्चेसाठी सूर्यराव बेरड यांना भेटायला आली आहे…!

निरोप मिळाला…,

मोठ्या इतमामाणे सर्वांचे स्वागत झाले..!

इकडचे तिकडचे विषय संपवत काकांनी मूळ मुद्द्याला हात घातला…!

आमच्या एक हजार फौजेंसोबत जर तुमची हजार पाचशे फौज मिळाली तर यशवंतमाची सहज पडणार…!

उद्या सकाळी हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा माचीवर फडकला तर तुम्हाला त्याचे सरदार नेमु हा शब्द आहे आमचा….!

हे ऐकून सूर्यराव च्या चेहऱ्यावर हास्य उमलले व तो बोलू लागला…!

काका, मला आपला कौल बिलकुल स्वीकार आहे..पण, यशवंतमाचीचा पाडाव करणे इतकी सोपी गोष्ट नाही.
शेकडो चोरवाटा,निष्ठवान पैलवानांची फौज यासह अजून एक खास गोष्ट त्यांच्या ताफ्यात नुकतीच सामील झाली आहे ती म्हणजे तुमचे गुप्तहेर म्हणून माचीत शिरलेल्या खंडूकडे प्राण्यांचे गूढ आवाज व त्यांना आपल्या सारखे काम करायला लावणारे विलक्षण ज्ञान लिहलेली वही आहे….आता आधीच बिकट असलेली माची अजून बिकट झाली आहे…”

हे ऐकताच काकांना खंडू ने बोललेले शब्द खरे वाटू लागले…पण ती वही केवळ बहिर्जींला देईन असे त्याचे वचन पण आठवले…ज्या खंडोजी ला मी ओळखतो..तो प्राण देईन पण वचन तोडणार नव्हता….पण, पण आता काय उरले होते…स्वतःच्या बांधवांच्या खांद्याला खांदा लावून कुस्ती खेळाला त्यांचे गळे चिरायला ज्याला काही वाटत नव्हते तो स्वराज्याशी हरामखोरी करायला मागे पुढे कसा पाहिलं याची खंत काकांना होती…दीर्घ श्वास घेऊन ते बोलले….

सूर्यराव..यावर दुसरा पर्याय ..??

सूर्यराव उत्तरला….

यावर पर्याय एकच…माचीच्या आतून कोणी जर गुप्तवाट दाखवली तर माची संपली म्हणून समजा….!!

हे विषय सुरु असताना आभाळात घारी गिधाडांची गर्दी होती..आसपास मुंग्यांची दाटी उडाली होती आणि पुढच्याच क्षणी सर्व फौजेवर मुंग्यांची तिखट डंके बसू लागले आणि सर्वच्या सर्व अंग झाडून धावू लागले….एकेकाला पन्नास पन्नास मुंग्या….सर्वजण ती जागा सोडून धावून पठारी भागात आले व त्या मुंग्यापासून सुटका करुन घेऊ लागले….

दुसऱ्याच क्षणी घारी गिधाडांनी वस्ताद काका व सूर्यराव यांच्यात झालेली बातचीत व सूर्यराव चे ठिकाण बाजींद ला सांगितले….

क्षणात बाजींद ने सोबतच्या धारकर्यांना तयारीचे आदेश दिले आणि तो वीरांचा लोंढा पुन्हा सूर्यराव वर पडणार होता…पण आता अजून एक शत्रू वाढला होता तो म्हणजे वस्ताद काका…!

पण असो….बाजींद च्या गुप्ततेशिवाय जगात काहीं महत्वाचे नाही…चला रे….तलवार उचलणारे हात धडापासून वेगळे झाले पाहिजेत…..त्यांच्या सोबत जन्गलातील साप, विंचू, अजगर, वाघ, सिंह, हत्ती चे थवेच्या थवे चवताळून, बेताल ओरडत, किंचाळत धाऊ लागले……असे वाटत होते की आता यांच्या आडवे जो कोणी येईल त्याचे तुकडे पण वाटणीला यायचे नाहीत…….!

इकडे यशवंतमाची अजूनही विजयाच्या धुंदीत होती.
वास्तविक शत्रू पुन्हा येईल म्हणून योजना करायच्या सोडून भीमा स्वतःच्या लग्नाची स्वप्ने पाहत होता…!
सकाळीच तो राजांना भेटायला गेला होता…समोर राजकुमारी सावीत्री पण होती….!

भीमाला पाहून राजे बोलले….!

भीमा,तू यशवंतमाचीची अब्रू , मान काल राखलास.
प्रत्यक्ष शिवाजीराजांच्या सेनेला पराभूत करणे म्हणजे आदिलशाही दरबारी मानाची गोष्ट..!
पण,तुझी सावित्रीची अट मला मान्य नाही मला माफ कर….!
सावित्रीला सूर्यराव बेरदडाच्या हल्ल्यातून वाचवणारा खंडेराय हा तिने पती म्हणून स्वीकारला आहे…!

हे ऐकताच भीमा संतापला….काय…?
खंडेराय ..?
राजे…जीवावर उदार होऊन केवळ साऊ साठी मी लढलो…आजवर फक्त तीच्यासाठी जगलो..!
नाही…मी लग्न करेन तर साऊ शी….भलेही मला खंडेराय चा खून करायला का लागू नये…असे बोलून त्याने समशेर उचलली आणि तरातरा तालमीकडे खंडेराय ला गाठून मारायच्या उद्देशाने तो निघाला….!

जाताना सावीत्री फक्त माझी आहे अश्या आरोळ्याने सारी माची तालमीजवळ आली होती..!

धाडदिशी त्याने तालमीच्या दरवाजाला लाथ मारली आणि तो आत गेला….!

राजे व साऊ सोबत हजारो यशवंतमाचीचे नागरिक धावत तालमीजवळ आले होते…आता भीमा खंडेराय ला जीव मारणार…ते तालमीच्या दरवाज्यातून आत जायला जाणार इतक्यात त्याच दरवाजातुन एकाच वेळी ३-४ पैलवान धाडकन बाहेर फेकले गेले…आणि आपल्या प्रचंड हातात भीमा ला अंतराळी उचलून खुद्द खंडेराय तालमीतून बाहेर आला व त्याला सावित्रीच्या पायात आदळून त्याच्या छातीवर पाय ठेऊन बोलू लागला..

सावीत्री……सावीत्री तुझी नव्हे…जन्मोजन्मी फक्त या खंडेरायाची आहे….तिच्यासाठी मी माझ्या देवाला विसरेन एकवेळ हरामखोर कुत्र्या…!

असे म्हणत त्याने तलवार त्याच्या छातीवर रोखली…पण त्वरित साऊ पुढे झाली व ती रोखत म्हणाली…नको खंडोजीराव…याला प्राणदान द्या….

याने माची वाचवून उपकार केलेत सर्वावर….याला प्राणदान द्या…..राहिली गोष्ट या सावित्रीची….हि साऊ फक्त आणि फक्त तुमचीच राहील ..

असे म्हणत तिने घट्ट मिठी खंडेरायाला मारली….!

उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवल्या व त्या विवाहाला जणू अप्रत्यक्ष संतमती दिली…!

भीमा व त्याच्या पाच पन्नास साथीदारांना यशवंतमाचीच्या फौजेने हाकलून माची बाहेर काढले..!

साऊ व खंडेरायाचे लग्न उद्याच सकाळी लावून दिले जाईल असे राजे यशवंतरावांनी जाहीर केले….!

सारी माची आनंदात होती पण अपमानाचा सूड घेण्याची तीव्र इच्छा मनी बाळगून भीमा व त्याचे साथीदार माचीबाहेर पडले……!

क्रमशः बाजींद भाग २६,बाजींद भाग २६,बाजींद भाग २६ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

Leave a comment