महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,83,171

बाजींद भाग १२ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

By Discover Maharashtra Views: 6182 7 Min Read

बाजींद भाग १२ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग १२ – भिल्ल जाग्यावर गतप्राण झाला. त्याच्या छातीत घुसलेला खंजीर उपसून तो कमरेला लावत खंडोजी ने त्याला खाली ठेवले. सावधपणे चौफेर नजर फिरवत खंडोजी विचार करु लागला……”बाजींद”…काय असेल हे बाजींद…?

एव्हाना सुर्य मावळतीकडे झुकला होता, संध्याकाळच्या संधीप्रकाशाने जंगलातील झाडे झुडपे सुवर्णाची झळाळी मारत होती..!
एक दीर्घ श्वास घेऊन खंडोजी ने पायात घुसलेल्या बाणामुळे झालेल्या जखमेची वेदना सहन करत त्याला जंगलातील पाला बांधला…!

तो चालत जंगलाच्या बाहेर आला, मृत भिल्लांचे शव उचलून एका बाजूला ठेवत तो नदीच्या पात्राकडे पाहू लागला ?
मनात विचारांचे काहूर माजले.
सावीत्री कुठे गेली असेल..?
हे भिल्ल जिवाच्या आकांताने का धावत होते ?
बाजींद ….?
काय असेल हा प्रकार,ज्याचे नाव घेताच त्या भिल्लाने मरण पत्करले पण गूढ नाही सांगितले….!

हा काय प्रकार आहे, हे मात्र आता शोधून काढ्लेच पाहिजे, असा निर्धार करत खंडोजी ने त्या नदीच्या विशाल पात्रात उडी घेतली…!

नदीच्या पाण्याच्या ओढीने तो वाहू लागला, तिरकस पोहत पोहत तो किनाऱ्याकडे पाहू लागला.

बराच वेळ पोहून झाले अन त्यालाही ती गुंफा दिसली.
या स्मशान जंगलात, नदीच्या कडेला गुंफा असणे हे नक्कीच नवल आहे हे त्याने जाणले आणि त्याने त्या गुंफेकडे पोहणे सुरु केले…..!

काही वेळात गुहा जवळ आली आणि खंडोजी चे पाय जमिनीला लागले,दम खात तो गुंफेकडे चालू लागला…!

ती गुहा खूप अंधारी होती,एकेक पाऊल तोलून मापून टाकत खंडोजी गुहेच्या आत जाऊ लागला…एव्हाना गुहेतील पाणी संपून जमीन लागली होती.

बराच वेळ चालून झाले आणि गुहेच्या त्या बाजूला मंद प्रकाश दिसू लागला, नक्कीच त्या बाजूने बाहेर पडायची वाट असेल असा विचार करत खंडोजी ने कमरेची तलवार, खंजीर उपसली आणि एका हातात तलवार, दुसऱ्या हातात खंजीर पेलून सावध पावले टाकत खंडोजी त्या गुहेतून बाहेर आला.

सुर्य पूर्ण अस्ताला गेला होता, खंडोजी जखमी होता, त्याच्या वेदना सहन करत तो सावीत्री चा माग शोधत तिथे आला होता…!

ते अगदी घनदाट अरण्य होते, रात्रपक्षी भिरभिरत होती, रातकिड्यांचा आवाज मेंदूला झिणझिण्या आणत होता.. पाय पडेल तिथे टाकत खंडोजी पुढे चालू लागला आणि अचानक त्याला कोल्हेकुई सोबत रानकुत्रें केकाटल्याचा आवाज आला… त्याच्या सर्दिशी अंगावर काटे आले…आजवर इतक्या मोहिमेत हेरगिरी केली पण या जंगलातील भयनकता खरोखर अंगावर काटा आणणारी होती…!

आवंढा गिळत खंडोजी चालत होता, प्रत्येक पाऊल सांभाळून टाकत होता तितक्यात समोरच मोठ्या वडाच्या झाडामागून कोणीतरी एकदम वेगात धावत त्याच्याकडे येत होते, त्याच्या पावलांचा आवाज स्पष्ट कानी येताच खंडोजी ने विरासन पवित्रा घेतला आणि समोर पाहू लागला, त्याच्या हृदयाचे ठोके वाढले, सर्वांग घामाने भिजले…त्याने मनोमन विचार केला, ही पावले जर माणसाची नसून एखाद्या जनावराची असली, तर आपला खेळ सम्पला आज…आणी नक्कीच ते जनावर असेल, असल्या भयाण जंगलात कोण मनुष्य येतो मरायला….!

त्याने डोळे मिटून एक क्षण शिवछत्रपतींचे स्मरण केले ज्यांनी केवळ खंडोजीची नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राची भीती घालवून आयुष्याला अर्थ प्राप्त करून दिला होता, त्यांचे क्षणभर स्मरण करुन तो मरायला, मारायला तयार झाला..!
आता क्षण दोन क्षण बस्स…काहीही होणार हे त्याने ताडले..अन…

क्षणार्धात त्याच्या मागून त्याचे कोणीतरी तोंड दाबले आणि त्याला ओढत ओढत एका झाडाच्या मागे नेले…..त्याचे तोंड दाबणार हात खूप शक्तिशाली वाटला, पण एकप्रकारची नाजूकता होती त्या हातात….त्याने ताकतीने त्या हाताची मिठी सोडवली आणि क्षणात सावध होऊन मागे पाहतो, तर ती प्रत्यक्ष “साऊ” होती…त्याने डोळे वठारले आणि भीतीने मागे सरकू लागला….तो मागे हटतोय हे पाहताच तिने त्याचा हात पकडला आणि त्याच्या ओठावर हात ठेवत मान नाकारार्थी हलवू लागली..!

हा प्रसंग सुरु असतानाच तो आवाज पुन्हा तीव्र झाला आणि झाडामागून दौडत गेला आणि जोरदार मोठ्या आरोळीने तो आवाज शांत झाला..!

आकस्मित घटनेने भांबावून गेलेल्या खंडोजीला नेमके काय सुरु आहे समजेना, त्याने प्रश्नार्थक नजरेने सवित्रीकडे पाहिले, सावित्रीने त्याच्या ओठावर दाबून ठेवलेला हात सैल करत बोलली….तुम्हाला माहिती नाही किती महाभयानक धोक्यात फसलोय आपण..!

लहानपणापासून या भागाबद्धल मी केवळ ऐकून होते, इथे घडत असणारे चित्रविचित्र प्रकार, आकस्मित घटना जे काही ऐकले होते ते आज नशिबाने भोगणे माझ्या वाटेला आले, आणि भरीस भर म्हणून तुम्हीही इथे आलात…मला खात्री आहे आपल्या दोघांपैकी कोणी जिवंत राहील असे वाटत नाही, पण नेमके आपले मरण कसे असेल याचाच मी विचार करत आहे, असे बोलत सावीत्री धाय मोकलून रडू लागली…!

तिला सावरण्याचा प्रयत्न करत खंडोजी बोलला, बाईसाहेब शांत व्हा, नेमका काय प्रकार आहे मला सांगा..असे काय आक्रीत घडले जे तुम्ही धीर सोडून बोलत आहात ते….?
मी शिवछत्रपतींचा शिलेदार आहे..संकटांशी लढणे हा माझा छंद आहे…सांगा….काय आहे इथे ….?

आलेला हुंदका आवरत ती बोलू लागली…आपण अनावधानाने एका महाभयानक जंगलात आलोय, जिथून परत जाणे यमलाही अशक्य आहे…हे जंगल “बाजींद” चे आहे………..बाजींद नाव उच्चारताच वाऱ्याची मोठी झुळूक आली, आणि सावित्रीचे केस वाऱ्यावर उडवुन गेली…..!

“बाजींद”…?
काय आहे हा प्रकार ?
मगाशी तुमच्या पाठीमागे लागलेल्या भिल्लाने जीव दिला पण बाजींद बाजींद बोलत प्राण सोडला..!
मला सांगा नेमके बाईसाहेब…मला जाणून घ्यायचे आहे ते…!

सावीत्री गूढ आवाजात सांगू लागली….बाजींद…!

असेल ही १०० एक वर्षांपूर्वीची गोष्ट, मी खूप लहान होते तेव्हा माझ्या आजीने सांगितली होती.
तशी ती आमच्या गावातल्या सर्व लोकांना माहिती आहे.

मोगलांच्या टोळधाडी महाराष्ट्रावर कोसळू लागल्या होत्या आणि गावेच्या गावे होरपळत होती…अन्याय, अत्याचार याने कहर माजला होता..!
यशवंतमाची पलीकडे १०० कोसावर असलेल्या चंद्रगड गावात तो राहत असे..!

एक अजिंक्य मल्ल, सावध नेता, कुशल राजकारणी, मुत्सद्दी सरदार..!
“बाजीराव सरदेशमुख”
त्याच्या बेडर स्वभावामुळे आणि कधीच पराभूत न होणाऱ्या चालीमुळे त्याला पंचक्रोशीतील “बाजींद” म्हणत होते…!

एक दिवस मोगली सरदार हुसेनखान आपल्या ४ हजार स्वारांना घेऊन तळकोकणात उतरला आणि त्याचा मुक्काम पडला चंद्रगड पासून अवघ्या १० कोसावर…!

क्रमशः बाजींद भाग १२ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

Leave a comment