बाजींद भाग ११ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

By Discover Maharashtra Views: 5742 6 Min Read

बाजींद भाग ११ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग ११ – सडसडीत देहाचे,अंगावर,शरीरावर चित्रविचित्र पांढरे पट्टे ओढलेले, केवळ लज्जारक्षणाएवढे कपडे घातलेले ते भिल्ल जमातीचे लोक कमालीचे क्रूर असावेत हे त्यांच्या चेहऱ्यावरुनच दिसत होते…!

एकाने पुढे होऊन सावित्रीच्या दंडाला पकडायचा प्रयत्न केला, पण सावित्रीने त्याचा हात वरच्यावर पकडून हिसडा मारला, त्याचा तोल जाऊन तो खाली पडला.आपल्या साथीदाराला खाली पडलेले पाहताक्षणी ते भिल्ल बेताल किंचाळत सावित्रीच्या रोखाने धावत सुटले आणि ते पाहताच सावित्री सुद्धा पुन्हा नदीच्या दिशेने धावू लागली…पुढे नदी,पाठीमागे भिल्ल अश्या विचित्र परिस्थितीत तिने कशाचाही विचार न करता नदीच्या प्रवाहात उडी टाकली.
नदीच्या वेगवान धारेत ती वाहून जाऊ लागली,आणि तिच्यापाठोपाठ ते सर्वच्या सर्व भिल्लही नदीत उडी मारून सवित्रीचा पाठलाग सुरु ठेवला.

बराच वेळ पाण्यात वाहत गेल्यानंतर एका वळणावर असलेल्या गुंफेत सावित्रीने पोहणे सुरु केले आणि काही वेळ पोचल्यानंतर गुंफेत पोहचली…!

पोहून दमलेली सावीत्री त्या गुहेत दमछाक होऊन पडली, पण आपल्या पाठीमागून भिल्ल येत आहेत याची जाणीव तिला होताच ती गुहेतील पाण्यात हळू हळू चालू लागली…!

बराच वेळ चालून झाला आणि गुहेतील पाणी कमी होत जमीन लागली…क्षणात ती आत धावत सुटली.
बराच वेळ तिने धावणे सुरु ठेवल्यानंतर सूर्यकिरणांचा दूरवर प्रकाश दिसू लागला.

ती त्या प्रकाशाकडे धावली आणि तिला जाणवले की आपल्या पाठीमागे भिल्लांचा पाठलाग अजूनही होत आहे.
ती त्या प्रकाशाजवळ आली.
एक पुरुष आत जाईल इतक्या उंचीची ती एक वाट होती जी जंगलाच्या दुसऱ्या टोकाकडे निघत होती..!
ती त्या वाटेतून बाहेर पडली आणि जंगलात पोहचली…!

समोर एक विशाल शिळेवर चित्रविचित्र आकृत्या कोरल्या होत्या….एका उंच झाडाच्या फांदीवर एक मनुष्याच्या हाडाचा सांगाडा लटकत होता, ज्याचे पाय वर आणि हात खाली अशी स्थिती होती…!

सवित्रीचा पाय एका दगडाला थडकला व तिचा तोल गेला आणि पडली…!

काहीच अंतरावर ते भिल्ल तिचा पाठलाग करत तिच्या पर्यंत पोहचले होते….ते मनस्वी खुश झाले की बऱ्याच दिवसांनी त्यांची भूक मिटणार होती, पण…पण तितक्यात एका चित्रविचित्र आवाजाने त्या सर्वांचे लक्ष समोरच्या दगडावर गेले.
आणि भीतीने त्यांचे डोळे विस्फारले गेले….!

त्या भिल्लांचा म्होरक्या हात जोडून भीतीने बोलू लागला…ब… ब…ब बाजींद…. बाजींद…!

असे बोलत बोलत अक्षरश वाऱ्याच्या वेगाने आल्या पावली परत धाऊ लागले.

धावताना कोणी धडपडत होते,कोणी किंचाळत होते, तर कोणी जीव वाचावा म्हणून फक्त धावतच होते…त्या गुहेतून ते कोणताच विचार न करता पुन्हा नदीत उडी टाकून पोहत पोहत मागे येऊ लागले…….!

इकडे,सावित्रीला समजेना, की या भिल्लानी असे काय पाहिले ज्याला बघून हे इतके घाबरले आहेत….!

तिने स्वतःला सावरले. मन खंबीर केले आणि समोर च्या भव्य पाषणाकडे पाहू लागली आणि क्षणात अनेक वटवाघुळ पक्षी एकाच वेळी बाहेर पडले….!

दोन प्रचंड वाघ हळू हळू सवित्रीकडे येऊ लागले…!
एखाद्या राजाच्या ऐटीत, आणि राजबिंड्या चालीत ते दोघे चालत होते, आणि त्यांच्या मधोमध एक धिप्पाड युवक, सिंहासमान चालीने चालत होते, ते दोन वाघ जणू त्याच्या अंगरक्षकासारखे त्याच्या बरोबर चालत होते.
सरळ नाक, आग ओकणारे त्याचे घारीसारखे डोळे, चेहऱ्यावर एखाद्या राजपुत्रासारखी चमक, कमरेला लटकत असलेली तलवार, एखाद्या पुराणपुरुषांसारखे अजस्त्र बाहू, पिळदार दंड, भरीव छाती……पाहताक्षणीच कोणाच्याही हृदयाचा थरकाप उडावा असे त्या युवकाचे एकंदरीत व्यक्तिमत्व पाहत सावीत्री उभी होती…!

जंगलात सर्वत्र पक्षांचा किलबिलाट सुरु झाला, आसपास सरपटणारे निशाचर एकाच वेळी बाहेर आले….जंगली प्राणी अस्वस्थ होऊन किंचाळू लागली….जणू काही तो युवक या सर्व जंगलाचा नव्हे तर सभोवतालच्या अणूरेणुचा स्वामी होता….!

तो महत्वकांक्षी नजरेचा युवक जसाजसा सावित्रीच्या जवळ येऊ लागला, तसे तसे रात्रकिडे, पक्षी, वटवाघुळे, असंख्य लहान मोठे जीवांचा गोंगाट प्रचंड वाढू लागला, सावित्रीच्या कानाला ते सहन होईना, तिने तिचे दोन्ही हात कानावर ठेवले….तो आवाज वाढू लागला…….बस्स आता काही पावले…एकतर ते वाघ सवित्रीवर तुटून पडणार नाहीतर, हे जंगली जीव तरी सवित्रीचा प्राण घेणार….तिला हे सर्व असह्य झाले आणि तिने डोळे बंद करत प्रचंड किंचाळी फोडली……..!

तीची किंचाळी ऐकताच तो युवक जाग्यावर थांबला…एक स्मित हास्य करत त्याने चहूबाजूला नजर फिरवली तसे सर्व पशुपक्षी, जीवजंतू शांत झाले….एका क्षणात सारा गोंगाट मौन झाला….!
सावीत्री ने डोळे उघडले…तिथे फक्त तो पुरुष तिच्याकडे स्मितहास्य करत उभा होता…!

इकडे, जिवाच्या आकांताने ते भिल्ल पुन्हा जिथे खंडोजी बेशुद्ध होता तिथे आले…!
धडपडत, धापा टाकत ते खंडोजी कुठे दिसतो का ते पाहू लागले, अन क्षणात सपा-सप वार त्या भिल्लांच्या वर कोसळू लागले.
कोणाचा हात तुटून पडतो,तर कोणाचा पाय…काही क्षणात १०-१२ भिल्ल कर्दळीसारखे तुटले गेले…काही जंगलात पळून गेले, उर्वरित तिघे चौघे हे जीवाची भिक्षा मागत जमीनीवर लोळू लागले….!

समोर पाहतो तर, खंडोजी ने विरासन घालून त्या भिल्लांच्यावर तलवार रोखून उभा होता….!

जे जीवाची भीक मागत होते, त्यातल्या एकाच्या छातीवर पाय ठेवत खंडोजी गर्जून बोलला….सांग, माझ्याबरोबर असणारी मुलगी कुठे आहे, काय केले तुम्ही…?

जिवाच्या भीतीने थरथर कापत त्यातल्या एकजण बोलला…..बाजींद……बाजींद…बाजींद…..!

असे म्हणत ते उर्वरित तिघे चौघे जंगलात धाऊ लागले…!

खंडोजी ने त्यांचा पाठलाग करायचा प्रयत्न केला आणि एकाला पकडले आणि बोलू लागला….!

बाजींद काय ??
बोल नाहीतर ही खंजीर तुझ्या छातीत घुसवेन…!

त्याचे ते बोल ऐकताच त्या भिल्लाने स्वतावर रोखलेले खंजीर धरले आणि खसकन स्वतःच्या छातीत खुपसले…आणि मान नाकारार्थी हालवत, डोळ्यात एका भीषण संकटाची खून देत तो पुट्पुटू लागला…बाजींद….बाजींद…!

क्रमशः बाजींद भाग ११ | बहिर्जी नाईक यांची कहाणी | बाजींद भाग ११

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे, © राजमुद्रा चैनल

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बहिर्जी नाईक यांची कहाणी | बाजींद भाग १
खांदेरीचा रणसंग्राम

Leave a comment