आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक १

आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक १ २

आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक १ –

आजपासून जवळपास ३०० वर्षांपूर्वी आर्य-द्रविड आणि कोण एतद्देशीय कोण परकीय असा वाद नव्हता, किंबहुना, आज प्रचलित असलेला अर्थही या शब्दांना मुळीच नव्हता. मग या वादाचा उगम कसा झाला ?(आर्य आणि त्यांचे मूळ स्थान)

युरोप तथा भारत यांचा संबंध आपल्याला अगदी प्राचीन काळापासून दिसतो. सातवाहन काळात रोमपर्यंत व्यापार चालायचा हे सर्वश्रुत आहे. पण इस्तान्बुल नगर ऑटोमन (ओस्मानी) तुर्कांनी जिंकले आणि त्यानंतर समुद्री मार्गाने भारताकडे येण्याने इतिहासास कलाटणी मिळाली. याच काळात युरोपात अनेक वैचारिक क्रांतींचे बीज रोवले जात होते ज्याचा कित्येक क्षेत्रांवर प्रभाव पडला, आणि विविध शास्त्रांच्या अभ्यासाला वेगळे वळण मिळाले.

या आणि या नंतरच्या भारतात आलेल्या युरोपीय लोकांना उत्तर भारतीय (महाराष्ट्र-गोवा सह), इराणच्या, युरोपीय भाषांमध्ये परस्पर सादृश्य आणि साधर्म्य जाणवू लागले. हे साधर्म्य थोडो-थोडके, वरवरचे आणि काही विशिष्ट शब्दांत नसून अतिशय मूलभूत शब्द, धातु, प्रत्यय, व्याकरण या सर्व बाबींत होते. निरीक्षणावरून साहजिकच या सर्व भाषांचे मूळ एकच असावे असा अंदाज त्यांनी लावला. या भाषाकुळास संबोधनाच्या सोयीसाठी, आधी इंडो-जर्मानिक (Indo-Germanisch) आणि नंतर इंडो-युरोपीयन (Indo-European) असे नाव देण्यात आले.

सुरुवातीला सर्वात प्राचीन आणि व्यापक असल्यामुळे संस्कृत हीच भाषाकुळाची जननी आहे असे त्यांना वाटले, ज्यानुसार भारतातून हे लोक जगभरात पसरले असावेत असा अंदाज त्यांनी बांधला. संस्कृत भाषेतील वेद हे या इंडो-युरोपीयन भाषाकुळातील सर्वात जुने साहित्य असून त्यात वैदिक जनांसाठी ‘आर्य’ हा शब्द वापरला गेला आहे. त्यावरून या भाषाकुळाच्या भाषकांसाठी त्यांनी आर्य (Aryan) हे नाव वापरण्यास सुरुवात केली.

कालौघात भाषातज्ज्ञांना उच्चारशास्त्र आणि व्याकरणाच्या अभ्यासावरून संस्कृत हे मूळ नसून संस्कृतहूनही जुनी कोणती तरी भाषा इंडो-युरोपीयन भाषाकुळाचे मूळ असावी असे वाटू लागले. तेव्हा संस्कृतसकट युरोपीयन भाषाकुळाचे मूळ असलेल्या या अज्ञात भाषेला त्यांनी प्रोटो-इंडो-युरोपियन (Proto-Indo-European) असे नाव दिले.

ज्या भाषांमध्ये साम्य आढळून आले अशा युरोपीय इंग्रजी, जर्मन पासून ते उत्तर भारतीय हिंदी, बंगाली तथा दक्षिणेकडील मराठी, कोंकणी आणि थेट श्रीलंकेतील सिंहलीपर्यंत या समस्त भाषा एकाच इंडो-युरोपियन भाषापरिवारातील जर आहेत तर कधीकाळी इंग्लंडपासून श्रीलंकेपर्यंत प्रोटो-इंडो-युरोपियन ही एकच भाषा बोलले जाणे शक्य नाही हेही तर्कसंगत जाणवले. कारण दक्षिण भारतात द्राविड, आ᳴स्ट्रो-एशियाटिक इत्यादि भाषाकुळातील भाषा बोलल्या जात. तेव्हा, प्रोटो-इंडो-युरोपियन भाषक ज्या ठिकाणाहून सर्वत्र पसरले असावेत त्या देशास अभ्यासक प्रोटो-इंडो-युरोपियन होमलँड म्हणजे मूळस्थान असे म्हणू लागले.

हे प्रोटो-इंडो-युरोपियन होमलँड मूळस्थान कुठे तरी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच दक्षिण रशियात असावे असा आधारहीन विचार यातून काही अभ्यासकांनी केवळ आपल्या तर्कशक्तीच्या विस्तारावर मांडला. यामुळे वेद रचणारे संस्कृतभाषक आर्य म्हणवले जाणारे लोक बाहेरून भारतात आले असा मतप्रवाह रूढ झाला. आणि इंग्रजांच्या काळात त्यांच्या पथ्यावर पडत असल्यामुळे तो आणखीन प्रबळ करण्यात आला. या आर्य बाहेरून आले असे अंदाज लावणाऱ्या मतास Aryan Invasion Theory (AIT/AMT) म्हणतात. त्याचेच एक गोंडस स्वरूप म्हणजे Aryan Migration Theory (AMT).
या मताची काही प्रमुख विधाने आहेत

१) युरोपीय, उत्तर भारतीय, मध्य आशियातील अनेक भाषांमध्ये साम्य आहे.
२) या सर्व भाषांचे मूळ एक असेल ज्यास प्रोटो-इंडो-युरोपियन म्हणता येईल.
३) प्रोटो-इंडो-युरोपियन ही भाषा एका विशिष्ट ठिकाणी विकसित झाली ते स्थान म्हणजे प्रोटो-इंडो-युरोपियन होमलँड.
४) हे प्रोटो-इंडो-युरोपियन होमलँड कुठे तरी दक्षिण रशियात असावे, म्हणजे वेद रचणारे आर्य बाहेरून भारतात आले.

उपरोक्त पहिली ३ विधाने संयुक्तिक असली तरीही चौथे विधान का निराधार आहे हे भाषाशास्त्र, ऋग्वेदीय वाङ्मय, पुरातत्वशास्त्र इत्यादि काही महत्वपूर्ण घटकांवरून पुढे इतिहास आणि भाषा संशोधक श्रीकांत तलगेरी यांनी कसे सिद्ध केले आहे हे आपण पुढे बघू.

स्रोत :
१) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda : A Historical Analysis
२) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda and the Avesta : The Final Evidence

– शुभम् जयंत सरनाईक©

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here