महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

खान्देशांतील मंदिरे भाग १

By Discover Maharashtra Views: 1258 12 Min Read

खान्देशांतील मंदिरे भाग १

भारतीय संस्कृती आणि मंदिरे हे एक अतूट समीकरण आहे, किंबहुना भारतीय संस्कृती आणि त्याची मुल्ये ही मंदिर संस्कृतीच्या अवति-भवतीच विणली गेली.कोणत्याही संस्कृतीची भरभराटी ही त्याने निर्माण केलेल्या स्थापत्य वारश्यावरुनच ठरवली जाते यामुळेच भारतीय संस्कृती ही जगातील सगळ्यात प्राचीनतम आणि संपन्न म्हणून गणली जाते. भारतीय स्थापत्य हे फ़क्त घडवण्यासाठीच म्हणून घडवले गेले नाही तर प्रत्येक निर्मितिमागे त्याला भक्कम असे वैज्ञानिक अधिष्ठान होते. भारतातील प्रत्येक प्रदेशातील स्थापत्य हे स्वत:ची अशी स्वतंत्र शैली,स्वरुप आणि वैशिष्ट्ये बाळगून असल्यामुळे एकच उपखंडात निर्माण झालेल्या स्थापत्यात इतकी विविधता बघून मन अचंभित होते आणि जगातील कदाचित हे एकमेव उदाहरण ही असावे. या आर्यावर्तातील कलाकारांनी त्यांच्या कल्पनाविषकाराला ज्या प्रकारे भौतिक स्वरुपात मूर्त रूप दिले ते बघून चक्षु आणि मुखातून एकच भाव अनायासच प्रकटते ते म्हणजे ‘अविश्वसनीय’. आणि त्याला आपला लाडका खान्देश ही अपवाद नाही. ‘खान्देशांतील मंदिरे’ या लेखमालेतून आपण खान्देशातील प्राचीन मंदिर तर बघणारच आहोत पण त्याच बरोबर इतर महत्वाची मोठे ही मंदिरे बघूया. तत्पूर्वी लेखमालेच्या पुढील काही भागात मंदिर म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, बांधणीच्या शैली कोणत्या, मंदिर वास्तूतील घटक, मंदिर रचना,  शिल्पशास्त्र, मूर्तिशास्त्र, इत्यादी संज्ञांची थोडक्यात ओळख करून घेऊया. जेणेकरून पुढील वेळेस कोणत्याही प्राचीन  मंदिराला भेट देताना, ती फ़क्त एक भेट न ठरता दर्शनतृप्तीचा परिपूर्ण अनुभव ठरावा.

मंदिर हे मानवी इतिहासात सर्वप्रथम कधी बांधले गेले , कुठे बांधले गेले, कोणासाठी बांधले गेले व कोणत्या स्वरुपात बांधले गेले हे आद्य प्रश्न कदाचित सदा अनुत्तरितच राहतील.. एवढे मात्र नक्की की मंदिराचे निर्माण मानवानी केले आणि हे तो सहस्त्रो वर्षापासून करत आलेला आहे. आणि अगदी चंद्र, मंगळावर पोहचण्याच्या युगात ही करतच आहे. या मन्दिरांच्या निर्माणातून विश्वात आपल्या पेक्षाही श्रेष्ठ आणि शक्तिमान तत्त्व अस्तित्वात आहे याची प्रांजळ कबुलीच मानवाने प्रामाणिकपणे दिली आहे नाही का?. हे लक्षात घेता मानवी जीवनात मंदिराचे स्थान आणि महत्व लक्षात येते. प्रारंभी मानवाने त्याच्या जीवनावर नियंत्रण करणाऱ्या नैसर्गिक तत्वाना उपास्य मानले. जसे पंचमहाभूत , सूर्य, चंद्र , वृक्ष , गिरीपर्वत, शिखरे त्यानंतर पूर्वजांचे व् त्यांच्या भौतिक अवशेष जैसे त्यांचे जतन केलेले शरीर अवशेष त्यांच्या वस्तु इत्यादी गोष्टींना त्यानंतर क्षुद्रदेवतांचा. नंतर त्याला एखादी प्रतिकांमधून त्याच्यासमोर नतमस्तक झाला असावा. सुरवातीला एखाद्या झाडाखाली प्रतिकाना ठेवून निसर्गातच आढळणाऱ्या फल-फुले वाहून त्याना प्रसन्ना करण्याचा प्रयत्न केला असेल. हळूहळू त्या प्रतिकांवर फांद्या, वेलीनी छत बनवून आधारासाठी त्याच फांद्या-वेलींची भिंती बनवल्या असतील. नंतर या फांद्या-वेलींची  जागा रचिव दगड-गोट्याच्या वस्तुनी घेतली असेल. जशी जशी त्याची बुद्धी  विकसित होत गेली व् त्याने चार भिंतींच्या मंदिर पासून ते नभस्पर्श करणाऱ्या उत्तुंग कळसापर्यंत मंदिर निर्माण करण्याचा त्याचा ध्यास उत्क्रांत होत गेला असावा आणि याच्याच समांतर त्याच्या या विकसित बुद्धीमुळे विविध देवता बद्दलच्या त्याच्या कल्पनानी आकार घेत तो हे भौतिक स्वरुपात घडवू लागला.

संस्कृत वाङ्गय मध्ये ‘मंदिर’ शब्द खुप प्राचीन नाही. त्याऐवजी महाकाव्य व् सूत्रग्रंथात ‘देवालय’, ‘देवायतन’, ‘देवकुल’,’देवगृह’ ह्या शब्दांचा प्रयोग झालेला दिसतो. ‘मंदिर’ शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख महर्षि याज्ञवल्क्य यांच्या ‘शतपत-ब्राम्हण’ या ग्रंथात सापडतो. मंदिर शब्द संस्कृत असून जो मुळत: ‘मंद’ शब्दापासून बनलेला आहे. हां शब्द शिथिलता व् विश्रांति असल्यामुळे. मुळात गृहसाठी वापरला जायचा. जो कालांतराने देवगृहासाठी प्रचलित झाला. अनेक अभ्यासक मंदिर शब्दाची व्युत्पत्ति ‘मन’ शब्दापासून मानतात, ज्याचे आशय आध्यात्मिक मनन सांगितले जाते. पण याचा आधार व्याकरणसंमत होत नाही. मंदिर( मन्द धातू+ किरच प्रत्यय)भारतातील प्रमुख भाषांमध्ये मंदिरसाठी खालिल शब्द येतात ‘कोविल’ तामिल भाषेत, कन्नड़ मध्ये ‘देवस्थान’ व् ‘गुड़ी’. तेलगुत ‘आलयम’, मलयालम मध्ये ‘क्षेत्रम’ या शब्दांचा प्रयोग केला जातो. तर अरबी-फ़ारसीत मंदिरसाठी ‘माबद’ शब्द योजिला आहे. मंदिरांच्या स्थापत्यविषयी अग्निपुराणात लिहलेले आढळते. नागरशैली वर वराहमिहिरचा बृहत्ससहिता आणि मालव्याचा राजा भोज यांचा समरांगणसूत्रधार हां महत्वाचा संदर्भ मानला जातो. तर द्रविड़शैलीवर ईशानशिवगुरुदेवपद्धति हा ग्रंथ आहे.मंदिरातील वेगवेगळ्या कालखंडातील घडवलेल्या वेगवेगळ्या देवतांच्या मूर्तीवर ‘शिल्परत्न’ हां ग्रंथ आहे

भारतमधील स्थापत्यकला मध्ये मंदिराचे स्थान अग्रगण्य आहे. त्याची महती अग्निपुराणात उल्लेख केल्याप्रमाणे देवालय हे केवल भगवंताचे निवास नसून ते भगवंताचे शरीरच आहे. अश्या प्रकारे आलेली आहे.

“एवमेष हरि: साक्षातं प्रासाद त्वेनम संस्थित:”,

अशाप्रकारे हे साक्षात श्री हरिच प्रासाद(मंदिर) रुपाने अवस्थित आहे. (असे समजावे). ह्याच संकल्पनेच्या आधारे देवालयरूपी शरीराचे अवयव( विभाग) अग्निपुराणात पुढीलप्रमाणे असे दिले आहे.

शिखरं शिर इत्याहुगर्भगृहे गलस्तथा l  मंडपम कुक्षिरित्याहु: प्राकारं जानूजङघकं l गोपुरं पाद इत्याहुर्ध्वजो जीवनमुच्यते l

अर्थ- मंदिराचे शिखर हे शिर, गर्भगृह है गळा, मंडप ही कुस, प्राकार है मांड्या व् पिंढऱ्या, गोपुर हां पाय आणि ध्वज हे शरीरातले जीवन असे म्हंटले आहे.

धर्माची शिकवण व् आचरण लोकाना सहज आणि सुलभ प्रकार उपलब्ध व्हावी याविचाराने सुद्धा मंदिर निर्माणची प्रेरणा दिली असावी. मानवी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच नियंत्रित करणाऱ्या अतिमानवी शक्ति म्हणजे देवी देवता ही श्रद्धा जगातील प्रत्येक मानव-समुदयात आढळते. या देवीदेवतांचे भौतिक रुपत भाविकास दर्शन घडवणारा स्थान म्हणजे मंदिर होय.अतिप्राचीन कालापासूनच जगात सर्वत्र मंदिर बांधलेली दिसतात जरी त्यांचे बाह्य-आंतर स्वरुप आणि संरचना वेगळी असली तरी त्यांच्या निर्माणची मूळप्रेरणा समान होती.  कुषाण काळाच्या नंतर गुप्त काळात देवतांच्या पूजन बरोबरच देवालायांची निर्मिति प्रारंभ झाली होती.सुरवतीच्या मंदिरांची बांधणी ही बौद्ध विहारांशी प्रभावित होती. सुरवातीला कळस रहित चैत्य छतांचे व् गर्भगृह यांचाच समावेश मंदिर वास्तुत होत असे. चौथ्या शतकात भागवत धर्माच्या अभ्युदयानंतर मंदिर व् भौतिक प्रतिकांच्या स्थापनेची आवश्यकता वाटायला लागली. साँचीचा दोन स्तंभयुक्त खोली असलेला मंदिर गुप्तकालातील प्रथम चरणातील मंदिर समजले जाते. त्यानंतर गुप्तकाळात व्यापक पातळीवर मंदिरांची निर्मिति सुरु झाली ज्यात शैव व् वैष्णव या दोन्हीपंथातील मन्दिरांचा समावेश होतो. प्रारंभिक मंदिर अत्यंत साधे स्वरुपातील होते. ज्यात स्तंभ अलंकृत नसून शिखर ऐवजी सपाट छत असे. तसेच गर्भगृह , मुख्यदेवताची प्रतिमा आणि ऊंच जगती यांचा समावेश असे. नंतर कालक्रमाने गर्भगृह समोर मोठी खोली बनवण्याची पद्धत सुरु झाली. मंदिराची रचना मुख्यत्व पूजनीय व उपास्य प्रतिकांचे स्वरुप, पूजा उपासनेचे विधि व उपचार, मंदिरांच्या प्रदेशातील प्रचलित वास्तु शिल्प पद्धत या पैलूंवर अवलंबून असे.

प्राचीन मन्दिरांकडे बघून एक गोष्ट निश्चितपणे संगता येते की मंदिर स्थापत्य हे अत्यंत खोलपणे विचार करून अभ्यासंती परिष्कृत झालेले असे शास्त्र आहे. मंदिर वस्तूच्या प्रत्येक भागाचे स्वतंत्र असे धर्म तत्वज्ञान तर आहेच शिवाय त्याला असे वैज्ञानिक दृष्टिकोण सुद्धा आहे. मुळात कोणतीही भारतीय कला मग ती गायन,वादन, नृत्य, चित्रकला, वास्तुकला , शिल्पकला अशी कोणतीही असेल , भारतीत कलाकारांनी केवळ कलासाठी कला म्हणून या दृष्टिकोनातून कधीच बघितले नाही. तर त्याची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘रसनिष्पत्ति’ ही रसनिष्पत्ति दोन्हीकड़े असावी लागते.म्हणजे एखादी कलाकृति निर्माण करताना कलाकारला स्वत:ला रसानुभति व्हावी लागते. त्याचबरोबर कलाकृतीचा आनंद घेणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्याची अनुभूति प्राप्त व्हावी लागते, तरच त्या कलाकृतिमागील उद्देश्य सफल होते. मग मंदिर स्थापत्य तरी त्याला अपवाद कसा असेल. एखादी प्राचीन मंदिर बघताना त्याचा भिंतीवर कोरलेली असंख्य अद्भुत शिल्प बघून व समजून घेताना आपली दृष्टी काही क्षण स्तब्ध होते, दिपुन जाते. मंदिर भाविकांना आत्मिक संतुष्टी देते आणि निरामय संतुष्टीसाठी भाविकाचे मन रसिक व त्याच बरोबर संस्कारित ही असले पाहिजे.मंदिर स्थापत्यातली प्रत्येक बारीक-सारिक शिल्पांमधून काहीतरी संदेश किवा शिकवण देण्यासाठीच घडवलेली असतात.

उदा म्हणून मंदिराची जगती किवा जोत किवा ओटा हा जमीनपासून बराच उंच बनवला जातो. काही पायऱ्या चढून आपण मंदिरात प्रवेश करते. आपल्या सामान्य जीवनाच्या पातळीपेक्षा देवतांची पातळी वरची, म्हणून देवदर्शनाला जाताना आपणही स्वत:ची आध्यात्मिक पातळी वाढवून स्वत:ला त्याअनुरूप करावे हे त्यामागील भाव. बऱ्याच प्राचीन मंदिरांच्या बाहेरील भिंतीवर सुंदर प्रमाणबद्ध असे स्त्रियांची शिल्प उकरलेली असतात त्याना ‘शालभंजिका’ किवा ‘सुरसुंदरी’ म्हणतात. तसेच काही मन्दिरांच्या भिंतीवर मैथुनरत युगल कोरलेले असतात. हे सर्व शिल्प आपल्या दैनदिन भौतिक जीवनाचे प्रतिक असतात. मानवी जीवनात काम ,क्रोध आदि षडरिपु असा शिल्पातून बाहेरच दाखवले जातात. हे सर्व रिपु बाहेर ठेवूनच भक्ताने आपल्या देवतेच्या शरण यावे, हा या मागचा भाव होता. कित्येक मंदिरांच्या गर्भगृहाच्या द्वार शाखेवार गंगा-यमुना यांची स्त्री रुपात शिल्प बनवलेली असतात. गंगा ही पवित्र्याची प्रतिक तर यमुना ही भक्तीचे प्रतिक. मनातले सर्व क्षुद्र विचार मंदिर बाहेर सोडून भक्ताने पवित्र मनाने दर्शनाला यावे हेच जणू दोन्ही नद्यांचे शिल्प भाविकांना सांगत असतात.

मंदिर निर्माणची सूरवात ही मौर्य काळातच होऊन गेली होती, परंतु कालक्रमणे यात सुधारणा होत गुप्त काळात मंदिर बांधणी अजुन परिष्कृत झालेली बघायला मिळते. ईसवी सन सहाव्या शतकापर्यंत उत्तर आणि दक्षिण मंदिर स्थापत्य शैली जवळ जवळ एकसमान होती. पण सहाव्या शतकानंतर त्यात प्रत्येक क्षेत्राच्या वेगवेगळ्या दिशांमध्ये विकास झाला. गुप्त रजवटीच्या काळात भारतभर ज्या ज्या प्रादेशिक राजवटी होत्या. त्यांचा प्रभाव त्या त्या प्रदेशातील मंदिरावर स्पष्टपणे जाणवतो. हिंदू धर्मात सुरवातीस मुर्तीपूजेला वेगळे स्थान नव्हते.ज्याला ‘निगम’ काळ म्हणून सुद्धा ओळखले जाते. या काळात ईश्वरोपासना यज्ञाद्वारे होत असल्यामुळे, स्तुति, प्रार्थना हेच मौखिक साधन प्रमुख होते.परन्तु मुर्तीपूजेची पद्धत अस्तित्वात नव्हती. त्यामुळे मूर्तीपुजेशी किवा देऊळ वा मंदिर सम्बंधित ऋचा वेदांमध्ये आढळत नाही.  देवतांच्या मुर्त्या घडवून त्यांची पूजा करणे आणि त्यासाठी स्वतंत्र वास्तु उभारणे ही संकल्पना आगम काळात सुरु झाली.

सध्याच्या प्राचीन मंदिराचे संदर्भ गुप्त व कुषाण राजवटी पासून मिळायला सुरवात होते. जे ईसवी सनचे दूसरे शतक समजले जाते. पण मंदिर त्याआधीही उभारली जात असावी पण त्यांचे अवशेष किवा भौतिक पुरावे अजुन आढळलेले नाही. मात्र अग्निपुराणात मंदिर स्थापत्य हे मानवशरीराच्या अनुरूप कसे हवे याचा उल्लेख आहे. यामुळे मंदिराच्या वास्तुशास्त्राविषयी आगम काळातील ग्रंथाचा विचार करावा लागतो. अजुन एक निरिक्षणद्वारे जुन्या मन्दिरांमध्ये शंकराची पिंड जास्त करून स्थापित असते. त्यामुळे जवळजवळ सगळेच जुने मंदिरे हे शिवमंदिर म्हणून आढळतात. मूर्तिपूजेच्या प्राथमिक टप्प्यात म्हणजे आगम काळात  शिव हे लोकप्रिय दैवत होते.  तसेच शंकराची पिंड घडवणे व कोरने तुलनेत सोपे असे. त्यामुळे अनेक ठिकाणी मंदिर पाषणाच्या मूळस्वरुपातच पिंडींच्या आकारांचा सहभाग होतो. त्यामुळे खुपठिकाणी स्वयंभू पिंड असल्याचे लोककथेत ऐकायला मिळते.

व्यपारानिमित्त प्राचीनकाळी भारताचा मध्य,दक्षिण तसेच आग्नेय आशियातील अनेक देशांशी संबंध होता. साहजिकच भारतातील संपन्न अश्या स्थापत्य वारशाचा प्रभाव पडणे साहजिकच होते. त्यामुळे बृहत्तर किवा भारतीयकरण झालेली ही राष्ट्रे म्हणून या देशांचा अभ्यास काही प्रमाणात भारतीय अभ्यासाकांनी केला. नाव घेण्याचे ठरवल्यास, व्हिएतनाम, लाओस, कम्बोडिया, थायलंड, म्यांमार, इंडोनेशिया, या देशांचे  नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. या देशातील सांस्कृतिक प्रतिकांवर जैसे परंपरा चालीरिती, उत्सव, शिल्प, स्थापत्य , धर्म, व्यक्तिनामे, ग्रामनामे यांवर झालेला भारतीय परिणाम स्पष्टपणे दिसून येतो. पाचव्या शतकापासून शिलालेख, नाणी, भांडी यांद्वारे भारतीय संस्कृतींचे अवशेष या देशात आढळून येतात. हिंदू धर्माबरोबरच बौद्ध धर्मही या देशात मोठ्या प्रमाणावर पसरला त्याचेच परिपाक तेथील प्राचीन हिंदू आणि बौद्ध मंदिरातून बघायला मिळतो.

पुढील भागात शिल्पशास्त्र, मंदिर उभारणी (संकल्प, कार्यवाही आणि पथ्ये) आणि मंदिराचे प्रकार बद्दल जाणून घेऊया.

– धन्यवाद
टीम एक्स्प्लोर खान्देश (Team Explore Khandesh)
आम्हना वारसा,आम्हना अभिमान.

Leave a comment